रीकॅलिब्रेशन ; रिक्षाचालक अंधारात असल्याचा युनियनचा कांगावा ! Print

प्रतिनिधी
alt

मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा-टॅक्सीच्या करण्यात आलेल्या भाडेवाढीनंतर मीटरमध्ये रीकॅलिब्रेशन करण्याबाबत कोणतीही सूचना अथवा माहिती चालकांना किंवा मालकांना देण्यात आली नसल्याचा आरोप मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी केला आहे. मात्र परिवहन विभागाने त्यांच्या विभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या आवारात ई-मीटर कॅलिब्रेशन करण्याचे काम सुरू केल्यास युनियन सहकार्य करेल अशीही भूमिका राव यांनी घेतली आहे.
मीटरचे रीकॅलिब्रेशन करण्यासंदर्भात परिवहन विभागाने कोणतीही माहिती रिक्षाचालकांना दिली नसल्याचे राव यांनी अवीकडेच एका पत्रकार परिषदेत सांगितले. ३१ मार्चपूर्वी सर्व रिक्षांसाठी लागणारे ई-मीटर उपलब्ध नाहीत, त्यांच्या कॅलिब्रेशनसाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नाही, कॅलिब्रेशनसाठी लागणारा वेळ, पैसा, कार्यपद्धती याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे रिक्षाचालक संभ्रमित अवस्थेत आहेत, असे सांगून राव म्हणाले की परिवहन विभागाने वडाळा आणि अंधेरी येथील कार्यालयांच्या आवारात असलेल्या मोकळ्या जागांवर ई-मीटरबाबत सर्व माहिती देण्यासाठी तसेच मीटर दुरूस्तीसाठी मॅकॅनिक उपलब्ध केले तर युनियनच्या वतीनेही सहकार्य करण्यात येईल. त्याचप्रमाणे मीटर खरेदीसाठी रिक्षा चालकांच्या संबधत पतसंस्थांना परिवहन विभागाने अतिरिक्त कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करावी, असेही आवाहन राव यांनी परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांना पाठविलेल्या पत्रात केले आहे.
४० हजार रिक्षा बेकायदा?
मुंबईत ४० हजार बेकायदा रिक्षा धावत असल्याची कबुली स्वत राव यांनी प्रथमच जाहीरपणे दिली. या बेकायदा धंद्याला परिवहन विभागाने आळा घालावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सर्व रिक्षांना विशेष बार कोड असलेली ओळखपत्रे द्यावीत. ती प्रत्येक रिक्षांच्या दर्शनी भागावर लावण्यात यावीत आणि दरवेळी सीएनजी इंधन भरण्यासाठी वाहन येईल तेव्हा त्याची तपासणी करून नंतरच त्यांना इंधन पुरवठा करावा अशीही सूचना राव यांनी केली आहे.