डेंग्यू नियंत्रण आपल्या हाती.. Print

एक डासदेखील ‘संकट’ ठरू शकतो!
प्रतिनिधी ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

मलेरिया नियंत्रणाच्या एकतर्फी कार्यक्रमामुळे मुंबईतील डेंग्यूच्या फैलावाकडे पालिकेच्या आरोग्य खात्याचा कानाडोळा झाल्याने, डेंग्यूने विक्राळ रूप धारण केले आहे. दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्यावर डेंग्यूच्या आजारासाठी लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याच दिवशी पालिकेच्या आणि महानगरातील अनेक खाजगी रुग्णालयांतही डेंग्यूग्रस्तांची रीघ लागली होती. गेल्या तीनचार आठवडय़ांत एकटय़ा मुंबईतच डेंग्यूचे जवळपास दीडशे रुग्ण केवळ पालिका रुग्णालयांतील तपासणीतून आढळून आले, त्यामुळे डेंग्यूच्या साथीचे गांभीर्य वाढले आहे. हा आजार नेमका काय आहे, तो कशामुळे होतो, त्याची लक्षणे कोणती, तो रोखण्यासाठी काय केले पाहिजे, त्यावर उपचार कोणते, हा आजार बरा होतो का, आदी अनेक प्रश्नांची उत्तरे सामान्य नागरिकांना मिळण्याची गरज आहे. या उत्तरांवर एक संक्षिप्त नजर!..
डेंग्यूची लक्षणे कोणती?
* डेंग्यू हा आजार विषाणूंच्या संसर्गातून फैलावतो. या आजाराची लागण झालेल्या रुग्णास भडक तपकिरी रंगाची उलटी होते, नाक, हिरडय़ा किंवा त्वचेतून रक्तस्राव सुरू होतो. विष्ठेचा रंग काळा असेल, तर आतडय़ात रक्तस्राव सुरू झाल्याचे संकेत असतात, व तातडीने उपचार घेणे आवश्यक असते. अचानक ताप येऊन तो १०३ ते १०५ डिग्रीपर्यंत वाढणे, कपाळ दुखणे, डोळ्यामागे वेदना होणे, तीव्र अंगदुखी, त्वचेवर चट्टे, उलटय़ा किंवा मळमळणे आदी लक्षणे दिसू लागतात. हा ताप साधारणपणे आठवडाभर लांबतो. काही रुग्णांचा ताप तीनचार दिवसांनी उतरतो, पण पुन्हा चढतो. अशी लक्षणे असतील, तर तातडीने तपासणी करून घेणे चांगले..
आजार विषाणूंच्या संसर्गातून
* एकदा डेंग्यूच्या आजारातून बरा झालेल्या रुग्णास पुन्हा या आजाराची लागण होऊ शकते. कारण, डेंग्यूचा आजार वेगवेगळ्या विषाणूंच्या संसर्गातून होतो. एका विषाणू संसर्गातून झालेल्या आजारातून बरे झाल्यानंतर दुसऱ्या प्रकारच्या विषाणूमुळे पुन्हा आजार उद्भवू शकतो. डासांद्वारे या विषाणूचा फैलाव होत असल्याने, डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी धूर फवारणी करण्याने डासांचा प्रादुर्भाव रोखणे शक्य असते. मात्र, साथीचा फैलाव सुरू झाल्यानंतर फवारणी सुरू केल्यास फारसा उपयोग होत नाही. असे आजार पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी अगोदरच उपाय योजणे आवश्यक असते. साधारणपणे आठवडय़ातून दोन वेळा धूर फवारणी केली पाहिजे.
दोनतीन दिवस तापाचा चढउतार होऊ शकतो
* सखोल चाचण्यांतून डेंग्यूच्या नेमक्या विषाणूचे निदान करता येऊ शकते. डेंग्यूचे विषाणू वाहणारा डास चावल्यास हा आजार होतो. हा डास विशिष्ट रंगाचा असल्याने ओळखणे फारसे अवघड नसते. पैदास झाल्यानंतर शंभर-दीडशे मीटरच्या परिसरातच तो वावरतो. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाच्या संसर्गातून या आजाराचा फैलाव होत नाही, त्यामुळे अशा रुग्णाची शुश्रुषा करताना अशी भीती बाळगण्याची गरज नसते. डेंग्यूचा डास चावल्यास साधारणपणे चार ते सहा दिवसांत या आजाराची लक्षणे दिसू लागतात. मात्र, काही वेळा डेंग्यूची लागण होऊनही त्याची लक्षणे किंवा आजार तीव्रपणे दिसतातच असे नाही. या आजारावर घरातच उपचार करणे शक्य असते. या आजाराची लक्षणे दिसू लागल्यास, भरपूर विश्रांती, द्रव पदार्थांचे भरपूर सेवन, व पौष्टिक आहार घ्यावा. मात्र, लक्षणे तीव्र असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. प्रतिजैविके हा या आजारावरील प्रभावी उपचार ठरू शकतो, असे सांगण्यात येते. हा आजार जीवघेणा ठरतोच असे नाही. योग्य वेळी चांगले उपचार झाल्यास रुग्ण ठणठणीत बरा होतो. दोनतीन दिवस तापाचा चढउतार होऊ शकतो. अशा वेळी दुर्लक्ष न करता, डॉक्टरकडे जाणे चांगले. कारण याच काळात योग्य उपचाराची गरज असते.
* आजाराचा फैलाव रोखण्यासाठी डास निर्मूलन हाच मूळ उपाय आहे. असे डास घरातील कोंदट, अंधाऱ्या जागी, टांगून ठेवलेल्या कपडय़ांच्या आडोशाला किंवा घराबाहेर थंडावा असलेल्या जागी आढळू शकतात. साचलेल्या पाण्यात मादी अंडी घालते. साधारणत दहा दिवसांत डास उडू लागतात. त्यामुळे, पाणी साचून राहणाऱ्या जागा, म्हणजे पाण्याची साठवण, एअर कंडिशनर्सच्या आसपासची जागा, झाडांच्या कुंडय़ा, फ्लॉवरपॉट, आदी ठिकाणी पाणी साचू देऊ नये.. तसे शक्य नसेल, तर अशा जागी साचणाऱ्या पाण्यात कीटकनाशके टाकावीत.     

झोपी गेलेली पालिका जागी झाली..
मलेरियावर नियंत्रण मिळविल्याबद्दल टेंभा मिरविणाऱ्या पालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची डेंग्यूच्या साथीने झोप उडविली असून कीटकनाशकांची, तसेच धूर फवारणीमध्ये वाढ करण्याचा आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. तापाचे रुग्ण शोधण्याकरिता पालिका कर्मचारी आणि आरोग्य स्वयंसेविकांना घराघरांच्या तपासणीसाठी पिटाळण्यात आले आहे. वस्त्यांमधील घरोघरी फिरुन पाण्याने भरलेल्या पिंपांमध्ये अ‍ॅबेट औषध टाकण्याची मुदत संप्टेंबरमध्ये संपुष्टात आली होती. मात्र आता डेंग्यूचे समुळ उच्चाटन होत नाही, तोपर्यंत पाणी साचणाऱ्या ठिकाणी हे औषध टाकण्याची जबाबदारी आरोग्य स्वयंसेविकांवर टाकण्यात आली आहे. पालिकेच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या मदतीने मध्यमवर्गीय, तसेच उच्च मध्यमवर्गीयांच्या वस्तीमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे. तसेच डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांचा शोध घेऊन तेथे कीटकनाशकांची, तसेच धूम्रफवारणी करण्याचे आदेशही कर्मचाऱ्यांना दिले आहेत. डेंग्युच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा साठा रुग्णालये, आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्याची, तसेच  रुग्णालयांतील डॉक्टरांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे.