‘मंत्र्यांच्या वाहनांवरील काळ्या काचा कोण काढणार? Print

प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांनी वाहनांच्या काळ्या काचा काढण्यासाठी (कांचांवरील काळी फिल्म काढण्यासाठी) जोरदार मोहीम सुरू केली आहे. मात्र मंत्र्यांच्या वाहनांच्या काळ्या काचांविरुद्ध कारवाई कशी करायची असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला असून यातून मार्ग काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी परिवहन सचिवांना पत्र पाठवले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनांच्या कांचांवरील काळी फिल्म काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. तसेच काळ्या काचा असलेल्या वाहनाच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र अतिमहत्त्वाच्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करताना पोलिसांना दोन पावले मागे घ्यावी लागत आहेत. दरम्यान, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांवर काळ्या काचा लावण्याची सूट देण्यात येते. मात्र संबंधित समितीमार्फत त्याबाबतचे निकष ठरविण्यात आलेले नाहीत.
दरम्यान, या प्रकरणी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता सर्वावर कारवाई करण्यात येत आहे, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) ब्रजेश सिंग यांनी सांगितले. अशा प्रकारची कारवाई सरसकट सर्वावर करता येत नाही. त्यामुळे परिवहन सचिवांना पत्र पाठवून शासकीय वाहनांवरील काळ्या काचा काढून टाकाव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच मंत्री आणि सर्व शासकीय विभागांना पत्र पाठवून वाहनांवरील काळ्या काचा काढून टाकण्याची विनंती करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.