अवयवदानाची चळवळ रुजते आहे.. Print

विशेष प्रतिनिधी
वाढदिवसाच्याच दिवशी राजूला मोटरबाईकचा अपघात झाला. त्याला रुग्णालयात नेले मात्र त्याच्या मेंदुला जबर मार लागल्यामुळे तो ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.हातातोंडाशी आलेला मुलगा वाचत नाही, हे दु:ख पचवून राजूच्या आईवडिलांनी त्याच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय घेतला. त्याचे डोळे, मूत्रपिंड, यकृत आदी अवयवांचे दान करण्यात आल्यामुळे दोन अंध लोकांना दृष्टी मिळाली, तर दोघा रुग्णांना किडनी मिळाल्यामुळे ते आता सामान्य जीवन जगू शकतात. या रुग्णांच्याच नेत्रातून आज राजूचे आईवडील आपल्या राजूला पाहात आहेत. खऱ्या अर्थाने तो या दुनियेत नसला तर नेत्ररुपाने जिवंतच आहे. अवयवदानाचे महत्त्व आणि महात्म्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी, त्याचा व्यापक प्रसार करण्याची जबाबदारी डॉक्टरांनीही उचलली आहे.
‘इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्स्प्लांटेशन’ या संस्थेने अवयव दानाविषयी जनजागृती करण्याकरीता येत्या २७ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील लीलावती रुग्णालयाजवळील इएसआय महाविद्यालयाच्या माणेक सभागृहात सायंकाळी चार वाजता परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, सामाजिक, धार्मिक तसेच चित्रपट सृष्टीतील मान्यवर उपस्थित राहाणार असून या परिसंवादात कॅडेव्हर डोनेशन, ब्रेन डेड, तसेच अवयवदानातील अडचणी तसेच अवयवदानाची गरज असलेल्या रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या यावर व्यापक चर्चा होणार असल्याचे केईएमच्या मूत्रपिंड विभागाचे माजी प्रमुख तसेच हिंदुजा रुग्णालयातील प्रमुख डॉ. अ‍ॅलन अल्मेडा यांना सांगितले. तसेच या परिसंवादात जास्तीत जास्त लोकांना सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्स्प्लांटेशन’ या संस्थेचे डॉ. अशोक कृपलानी, डॉ. उमेश ओझा, डॉ. रसिका शिरसाट, डॉ. उमेश खन्ना, डॉ. भरत शहा आणि डॉ. अ‍ॅलन अल्मेडा यांच्या पुढाकाराने डॉक्टरांची परिषद तसेच परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. एकटय़ा मुंबईत आज घडीला सतराशेहून अधिक मूत्रपिंडाचे रुग्ण कॅडेव्हर डोनेशनच्या प्रतिक्षेत आहेत. डोळ्यांची गरज असलेल्यांची संख्या काही हजारांमध्ये आहे.
मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे डोळे, हृदयविकार, मज्जासंस्था तसेच मूत्रपिंडासह अनेक विकार होत असतात. या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या पाश्र्वभूमीवर कॅडेव्हर दात्यांची संख्या अत्यल्प आहे. आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग याबाबत कमालीची उदासीनता बाळगून असल्यामुळे डॉक्टर व रुग्णांमध्ये कमालीची नाराजी आहे. मध्यंतरी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर आरोग्य विभागाने काही बैठका घेऊन ब्रेन डेड रुग्णांची नोंद करणे रुग्णालयांना सक्तीचे केले. मात्र अशा रुग्णांच्या नातेवाईकांना अवयव दानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अजूनपर्यंत ठोस उपाययोजना कार्यान्वित करण्यात आलेली नाही. या पाश्र्वभूमीवर झेडटीसीसी, नर्मदा किडनी फाऊंडेशन, नॅशनल किडनी फाऊंडेशन, मुंबई किडनी फाऊंडेशन आणि मॅरो डोनर रजिस्ट्री ऑफ इंडिया या संस्थांनीही अवयवदानाच्या या मोहीमेत पुढाकार घेतला आहे.