जनजागृतीसाठी पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाडीत सुरू आहेत उद्घोषणा Print

प्रतिनिधी
‘अन्य प्रवाशांना त्रास होईल अशा पद्धतीने भ्रमणध्वनीवर बोलू नका किंवा गाणी लावू नका,’ अशा घोषणा सध्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांमधून करण्यात येत आहेत.  प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी या घोषणा सुरू करण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. केवळ भ्रमणध्वनीविषयकच नव्हे तर  जनजागृती करण्यासाठी सामाजिक विषयांवरील अन्य घोषणाही उपनगरी गाडीतून करण्यात येत आहेत. रेल्वेगाडय़ांमधून प्रवास करताना बहुतेक प्रवासी सतत भ्रमणध्वनीवर बोलत असतात. त्यावेळी त्यांचे संभाषण अनेकदा इतराना त्रासदायक ठरते पण यातून अनेकदा काही खासगी बाबीही उघड होत असतात. काही प्रवासी बोलताना आजूबाजूचे भान विसरून हातवारे करत तावातावाने भांडत असतात. यातूनच अनेकदा प्रवाशांमध्ये वाद आणि त्याचे पर्यवसान भांडणे व मारामारीतही होते. असे प्रकार घडू नयेत आणि प्रवाशांना शांतपणे प्रवास करता यावा यासाठी आता रेल्वे प्रशासनानेच पुढाकार घेतला असून रेल्वे महामंडळानेच अशा घोषणा देण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. भ्रमणध्वनीवर बोलताना अन्य प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा, भ्रमणध्वनीवर गाणी ऐकताना ती केवळ स्वत:च्या आनंदासाठी आहेत त्याचे भान ठेवा, अशा घोषणा पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांमध्ये सुरू आहेत.