म्हाडातील जुनी फाईल: आता चिंताच नको! Print

* फाईली लवकरच ऑनलाईन
* रोबोटिक यंत्रणेमुळे फाईल शोधणे सोपे
प्रतिनिधी
मंत्रालयातील आगीनंतर सरकारी कार्यालयांमधील कागदपत्रांच्या सुरक्षित साठवणुकीचा मुद्दा पुढे आल्यानंतर ‘म्हाडा’ने आपल्या गोदामांमधील तब्बल दीड लाख जुन्या फायली सुरक्षित ठेवण्यासाठी महापे येथे हलवल्या आहेत. या सर्व फाईली तळघरात असलेल्या वातानुकूलित व रोबोटिक यंत्रणेद्वारे संचालन होणाऱ्या अत्याधुनिक गोदामात ठेवण्यात येत आहेत. त्यांचे ‘डिजिटायझेशन’ करण्याचे कामही होत असून संगणकावरही या फायली लवकरच ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.  मंत्रालयाला आग लागल्यानंतर ‘म्हाडा’ने कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘स्टॉक होल्डिंग कापरेरेशन ऑफ इंडिया लि.’च्या अखत्यारितील दस्ताऐवज व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या ‘शिल प्रोजेक्ट लि.’वर ‘म्हाडा’ने ही कामगिरी सोपवली आहे. महापे येथील ‘शिल हाऊस’च्या मिसाईल रोधक अशा जमिनीखालील तीन मजली अत्याधुनिक गोदामात धातूच्या पेटीत या फायली सुरक्षित ठेवण्यात येत आहेत. २००० पूर्वीच्या सुमारे दीड लाख फायली ‘म्हाडा’च्या गोदामांमध्ये धूळ खात पडल्या होत्या. पहिल्या टप्प्यात या फायलींचे जतन करण्याचे व डिजिटायझेशनचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी जुन्या फायलींवरील धूळ-कचरा साफ करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून त्या नेटक्या करण्यात येत आहेत. त्यानंतर ‘म्हाडा’चे मंडळ, विभाग, विषय निहाय त्यांचे वर्गीकरण करून त्यावर क्रमांक टाकून अ‍ॅल्युमिनियमच्या पेटीत त्या ठेवण्यात येतात. एका पेटीत सुमारे ५० ते ८० फायली बसतात. वर्गीकरणाचे काम झाल्यावर त्यांचे डिजिटायझेशन करून त्या ‘सव्‍‌र्हर’मध्ये साठवण्यात येतात. त्यामुळे ‘म्हाडा’सारख्या ‘संवेदनशील’ कार्यालयातील फाईल हरवणे व खराब होण्याच्या अडचणीवर तोडगा निघाला आहे. सर्वसामान्यांना त्याचा फायदा होणार आहे.
‘म्हाडा’ प्रशासनाला एखादी फाईल हवी असेल तर ऑनलाइन उपलब्ध होईलच, शिवाय प्रत्यक्ष ती फाईल मागवली गेली तर रोबोटिक यंत्रणेद्वारे अवघ्या तीन मिनिटांत दीड लाख चौरस फुटांच्या गोदामातून नेमक्या जागेवरून ती काढली जाईल. नंतर ‘शिल’चे अधिकारी ती फाईल वाहनाद्वारे पाठवून देतील, ‘शिल प्रोजेक्ट लि.’चे व्यवस्थापकीय संचालक संजीव विवरेकर यांनी सांगितले.    

कागदपत्रांची सुरक्षित साठवणूक व डिजिटायझेशनसाठी मुंबई महानगरपालिका, सिडको यांनीही रस घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘शिल’च्या कार्यालयात येऊन प्रक्रिया समजावून घेतली आहे.