विरारच्या डॉक्टरची फ्रान्समध्ये ‘सायकल दौड’! Print

सायकल प्रसाराचा वसा..
सुहास बिऱ्हाडे

आरोग्य जपण्यासाठी सायकल चालवा, असा सल्ला डॉक्टर सर्वानाच देत असतात. परंतु विरारच्या नितीन थोरवे या अवलिया डॉक्टरने सायकलींचा छंद लोकांमध्ये रुजविण्यासाठी केवळ सल्ले न देता स्वत: सायकल प्रसाराची मोहीम उघडली आहे. ती आता केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नसून सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. चार युरोपीय देश सायकलींवरुन पालथे घातल्यानंतर डॉक्टरांची सायकल आता फ्रान्सच्या प्रसिद्ध ‘टूर दी फ्रान्स’ या सायकल ट्रॅकवर धावणार आहे.
मूळ पुण्याचे असलेले डॉ. नितीन थोरवे यांना अस्सल पुणेकरासारखीच सायकलवर भटकंती करण्याची सवय होती. महाविद्यालयात असतांना सायकल हेच प्रवासाचे साधन. तेव्हाही अनेक मोहिमा सायकलवरूनच फत्ते केल्या होत्या. शिक्षण आणि व्यवसायानिमित्त विरारला स्थायिक झाल्यानंतर सायकलशी संबंध सुटला, पण नंतर पुन्हा ते आपल्या छंदाकडे वळले. १२ वर्षांपूर्वी त्यांनी पुन्हा सायकल चालवायला घेतली. सायकलवाला डॉक्टर म्हणून अनेक जण हसायचे. पण त्यांनी मित्रांनाही सायकलचे महत्व सांगून सायकल चालविण्यासाठी प्रवृत्त केले. गेली १२ वर्ष ते सकाळी न चुकता १२ किलोमीटर लांबवरच्या तरण तलावात पोहण्यासाठी सायकलनेच जातात. हा प्रवास इथे थांबला नाही.. सायकलप्रसाारासाठी त्यांनी मोहीमच हाती घेतली. सायकल चालवा, आरोग्य जपा या मंत्राचा प्रसार ते करु लागले. सायकली विकत घेता घेता विविध प्रकारच्या सायकली ते जमवू लागले.  सायकल चालवा असा कोरडा सल्ला न देता ते स्वत: सायकल चालवून देत आहेत. त्यांनी चीन मधून ३२ विविध प्रकारच्या सायकल आणल्या. घराबाहेरच्या मोकळ्या जागेत सायकलींचे विशेष दालन उघडण्यात आले आहे. त्यांच्याकडे फोल्डिग, क्रुझर, डबल रायडर, रेसर अशा विविध देशविदेशातल्या सायकलींचा संग्रह आहे. सायकल वापरास उत्तेजन देण्यासाठी डॉक्टरांनी आपल्या क्लिनिकमध्ये विशेष योजना सुरू केली आहे. जो सायकल वरुन कामाला येईल, त्याला अर्धा तास उशिरा येण्याची सवलत तर आहेच, याशिवाय त्याला पगारात दोन हजार रुपयांची वाढही देण्यात येते. डॉक्टरांनी आपल्या मित्रांचा ग्रुप तयार केला आहे. सुरुवातीला कु णी केवळ सल्ला ऐकून सायकल चालवत नव्हते. मग त्यांनी मित्र आणि नातेवाईकांना भेट म्हणून सायकल द्यायला सुरुवात केली. जवळपास ३०० हून अधिक सायकली स्वखर्चाने वाटून इतरांना सायकल चालवायला त्यांनी प्रोत्साहन दिले आहे.     
फन सायकल..
डॉक्टरांनी अनेकांना सायकल चालवायला प्रवृत्त केल्याने विरार मध्ये सायकलची विक्रीही वाढली आहे. आता दर रविवारी एकत्रितपणे शहरात सायकलने फिरण्यासाठी त्यांनी ‘फन सायकल’ ही मोहीम सुरू केली असून त्याला ही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.