दिवाळीच्या फराळालाही महागाईचा फटका! Print

तयार पदार्थ किमान २५ टक्क्यांनी महागणार
 प्रतिनिधी

स्वयंपाकासाठी लागणारा गॅस, खाद्यवस्तू, पेट्रोल-डिझेल आदींच्या किंमतीमध्ये झालेल्या दरवाढीचा फटका यंदाच्या वर्षी दिवाळीच्या फराळालाही बसणार आहे. त्यामुळे दिवाळीचा फराळ तयार करून तो विकणारे व्यावसायिक आणि घरासाठी फराळ तयार करणाऱ्या गृहिणींना या महागाईमुळे फराळासाठी आपला हात आखडता घ्यावा लागणार आहे. तयार फराळाच्या किंमतीमध्ये किमान २५ ते ३० टक्के भाववाढ होण्याची शक्यता व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बाजारात सध्या चिवडा १८० ते २०० रुपये किलो, रवा लाडू १७ ते १८ रुपयाला एक नग, करंजी १५ ते १८ रुपयाला एक नग, साजूक तूप ३६० रुपये किलो, मुगाचा लाडू २० रुपयाला एक नग, चकली १८० ते २०० रुपये किलो अशा किंमतीत विकले जात आहेत. तसेच शेंगदाणे (१०४ ते ११० रुपये किलो), वनस्पती तूप (११० ते १२० रुपये किलो), बेसन (९६ ते ११० रुपये किलो), पोहे (४८ ते ५५ रुपये किलो), तेल (१३५ ते १६० रुपये लिटर)यांचाही किरकोळ भाव सध्या असा आहे. नवरात्र संपले की दसरा-दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर या खाद्यवस्तूंच्या किंमतीत वाढ होत असल्याचा अनुभव दरवर्षीचा आहे. त्यामुळे यंदाही यात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
सर्वच क्षेत्रात वाढलेल्या महागाईचा फटका यंदाच्या वर्षी दिवाळीचा फराळ विकणाऱ्या आम्हा व्यावसायिकानाही बसणार आहे. स्वयंपाकाच्या एका गॅस सिलेंडरसाठी आम्हाला १ हजार ४५० रुपये मोजावे लागणार आहेत. पेट्रोल-डिझेलमधील भाववाढीमुळे वाहतूक खर्चही वाढला आहे. दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी ज्या महिला काम करतात, त्यांना द्याव्या लागणाऱ्या मजुरीतही वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या फराळाच्या किंमतीत यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत किमान २५ टक्के वाढ अपरिहार्य असल्याचे ‘कुळकर्णी ब्रदर्स’चे श्रीपाद कुळकर्णी यांनी सांगितले.
दिवाळीचा फराळ घरी तयार करतानाही तसेच फराळाचे तयार पदार्थ विकत घेतानाही घरी विचार केला जाईल. अगदी मोठय़ा प्रमाणात नाही, पण फराळाचे पदार्थ घरी तयार करून ते विकणाऱ्या गृहिणींनाही महागाईमुळे थोडय़ा अधिक प्रमाणात फराळ तयार केला आणि तो विकला गेला नाही तर नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यक तेवढी नोंदणी घेऊन त्या प्रमाणात फराळ तयार करण्यावर आपला भर राहील, अशी प्रतिक्रिया एका गृहिणीने व्यक्त केली.