शवविच्छेदन केंद्रांत डॉक्टरांची वानवा Print

प्रतिनिधी

बोरिवलीचे भगवती, जेजे, घाटकोपरचे राजावाडी आणि पाल्र्याचे कूपर या सार्वजनिक रुग्णालयांच्या शवविच्छेदन केंद्रांतील डॉक्टरांच्या कमतरेतमुळे सामान्यांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते आहे. या चार रुग्णालयांतील शवविच्छेदन केंद्रांत मिळून डॉक्टरांची १६ पदे आहेत. पैकी सहा पदे रिक्त आहेत. बढती किंवा बदली झाल्याने रिक्त झालेली पदे वर्षांनुवर्षे भरली जात नाहीत आणि जे डॉक्टर आहेत ते वेळेवर येत नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे.
भगवती रुग्णालयात पालघर-सफाळ्यापासून गोरेगावपर्यंत रेल्वे अपघातात दगावलेल्या व्यक्तींची प्रेते शव विच्छेदनासाठी आणली जातात. या शिवाय जळीत, आत्महत्या, खून, बेवारस शव, वसई, गोराई, मालाड खाडीत सापडणारे मृतदेहदेखील येथे आणले जाते. त्यामुळे, येथील केंद्रावर शवविच्छेदनाच्या कामाचा मोठा ताण असतो. परिणामी रात्रीबेरात्री शवविच्छेदनासाठी आलेल्या नातेवाईकांना विच्छेदन होऊन शवाचा ताबा मिळेपर्यंत १२ ते १५ तास वाट पाहावी लागते.
शव लवकर मिळावे यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे चारण्याचे प्रकार या ठिकाणी सर्रास होतात. डॉक्टरांची कमतरता येथील कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचाराचे कुरण मोकळे करून देत आहे, असा आरोप होत आहे. पोलीस आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकानुसार सकाळी ८ ते रात्री ८ या काळात शवविच्छेदन करून मिळते. त्यामुळे, प्रत्येक डॉक्टर ‘एक दिवस आड’ या प्रमाणे महिन्याचे केवळ १५ दिवसच काम करतात. डॉक्टर उपलब्ध नसल्याने रात्री आलेल्यांना सकाळी डॉक्टर येईपर्यंत वाट पाहावी लागते आहे. तर दुपारी किंवा सायंकाळच्या सुमारास येणाऱ्यांचा रात्री आलेल्या शवांचे विच्छेदन झाल्यानंतर नंबर लागतो.