म्हाडा घरांचे ४५० लाभार्थी Print

गिरणी कामगार बेपत्ता!
प्रतिनिधी, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२

गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी ‘म्हाडा’ने काढलेल्या ६९२५ घरांच्या सोडतीमधील विजेत्यांकडून कागदपत्रे गोळा करण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच सुमारे ६०० सूचनापत्रे परत आल्याने नवीन घोळ सुरू झाला आहे. यापैकी सुमारे दीडशे अर्जदारांनी मुंबै बँकेतून नंतर सूचनापत्र नेले असले तरी उरलेल्या सुमारे ४५० अर्जदारांचे काय करायचे व हा प्रश्न कसा मार्गी लावायचा ही नवीन डोकेदुखी ‘म्हाडा’ प्रशासनासमोर उभी ठाकली आहे. गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्याच्या राज्य सरकारच्या आश्वासनानुसार गिरण्यांच्या जागेवर उपलब्ध झालेल्या जमिनीवर कामगारांसाठी घरे बांधण्याची जबाबदारी ‘म्हाडा’वर सोपवण्यात आली. सुमारे एक लाख ४७ हजार कामगारांकडून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले. पहिल्या टप्प्यात १८ गिरण्यांच्या जागेवरील ६९२५ तयार घरांसाठी ‘म्हाडा’ने सोडत काढली व सुमारे ४७ हजार कामगारांचा समावेश केला. जूनच्या अखेरीस बऱ्याच वादावादीनंतर ६९२५ घरांसाठी सोडत निघाली आणि विजेते जाहीर झाले. या विजेत्यांना घर मिळाल्याबाबतचे सूचनापत्र पाठवून त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याचे काम मुंबै बँकेवर सोपवण्यात आले. त्यानुसार पत्रे पाठवली गेली. परंतु सुमारे ६०० पत्रे परत आली. अर्ज भरल्यानंतरच्या मधल्या दोन वर्षांच्या कालावधीत संबंधित कामगाराचा मृत्यू होणे, मृत कामगारांच्या वारसाला पत्र देण्यास टपाल खात्याने नकार देणे, घराला कुलूप असणे अशा काही कारणांमुळे ही पत्रे परत आली. त्यानंतर सुमारे दीडशे लोकांनी बँकेत येऊन आपले ओळखपत्र, मृत्युदाखला दाखवून सूचनापत्रे नेली. पण अद्यापही सुमारे ४५० ‘बेपत्ता’ अर्जदारांचा प्रश्न कायम आहे. गिरणी कामगारांच्या घरांबाबत वारसा प्रमाणपत्राचा मुद्दा गाजत आहे. याबाबत ‘म्हाडा’ने सरकारकडे मार्गदर्शनाची विनंती केली आहे. त्यावर अद्याप उत्तर आलेले नाही. वारसाप्रमाणपत्राचा वाद प्रलंबित असताना आता या ‘बेपत्ता’ अर्जदारांच्या घरांचे काय करायचे असा नवीन प्रश्न ‘म्हाडा’पुढे उभा ठाकला आहे. विजेत्या कामगारांना वा त्यांच्या वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ऑक्टोबर अखेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत संपली की बँकेच्या सर्व शाखांमधून किती व कोणत्या अर्जदारांची कागदपत्रे जमा झाली याची माहिती हाती येईल. त्याचा आढावा व पुढील कामाचे नियोजन करण्यासाठी बैठक घेण्यात येईल व त्याचवेळी नेमके किती यशस्वी अर्जदार ‘बेपत्ता’ आढळतात याचीही माहिती घेतली जाईल. त्यानंतर याबाबत काय निर्णय घ्यायचा त्याचे धोरण ठरवले जाईल, असे ‘म्हाडा’तील अधिकाऱ्यांनी सांगितले.