एस.टी. कर्मचाऱ्यांचे दुहेरी शोषण Print

आधीच उल्हास, त्यात गुंतवणुकीचा फास..!
प्रशांत मोरे
कनिष्ठ वेतनश्रेणीमुळे आधीच वेठबिगारासमान अवस्था असलेले एस.टी.तील कर्मचारी आता सक्तीच्या गुंतवणूक फासात अडकले आहेत. ठाणे विभागातील काही अधिकारीच नातेवाईकांच्या नावाने विविध गुंतवणूक योजनांचे एजंट म्हणून कार्यरत असून हाताखालच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सक्तीने गिऱ्हाईक बनविले आहे. आधीच जेमतेम पगार असणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना ही गुंतवणूक दुष्काळात तेराव्या महिन्यासारखी वाटते. तरीही वरिष्ठांचा रोष नको म्हणून मुकाटय़ाने ते हा पर्याय स्वीकारत आहेत. शासनाकडून सापत्नपणाची वागणूक मिळत असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांचे सध्या अशा प्रकारे दुहेरी शोषण सुरू आहे.
कनिष्ठ सेवक म्हणून कार्यरत एस.टी. कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी जेमतेम साडेचार ते पाच हजार रुपये वेतन मिळते. त्यातील सरासरी हजार रुपये प्रतिमाह विविध योजनांमध्ये गुंतविण्याची सक्ती त्यांच्या वरिष्ठांकडून केली जाते. कोणत्याही शासकीय आस्थापनात कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे भवितव्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाती असते. एस.टी. प्रशासनात अधिकारांची ही मात्रा जरा जास्तच आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्याने केलेल्या कारवाईवर कर्मचाऱ्याला कुठेही दाद मागता येत नाही. या वस्तुस्थितीचा काही अधिकारी गैरफायदा घेऊन कर्मचाऱ्यांना वेठीस धरतात. कर्मचाऱ्यांची रजा मंजूर करणे अधिकाऱ्यांच्या हाती असते. त्यांच्या हातून कळत-नकळतपणे घडलेल्या चुकांबद्दल कोणती शिक्षा करायची हेही सर्वस्वी अधिकारीच ठरवितात. एस.टी.मध्ये अनेक कामगार संघटना असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकीचा अभाव आहे. त्यामुळे वरिष्ठांचे हे जुलुम निमूटपणे सहन करण्यापलीकडे कर्मचाऱ्यांपुढे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक उरत नाही. ते तोंड दाबून हा बुक्क्याचा मार सहन करीत असतात.

स्वप्नांच्या नावे मृगजळांचे धनी..
वरिष्ठांच्या दबावामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांनी विविध गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतविले आहेत. त्यापैकी एका योजनेचे नाव आहे- डीम्स कन्सेप्ट. वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार एका कर्मचाऱ्याने या योजनेत ३३ हजार रुपये गुंतविले. त्यापैकी तीन महिन्यांत ९ हजार ९६० रुपये त्याला मिळाले. त्यानंतर मात्र उर्वरित पैसे मात्र वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना मिळाले नाहीत. दरम्यान ३० मे २०११ रोजी त्यांना आलेले प्रत्येकी २ हजार ४९० रुपयांचे धनादेश बँकेत वटू शकले नाहीत. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीकडून कसलाही प्रतिसाद मिळू शकलेला नाही. एस.टी.चे अनेक कर्मचारी अशा प्रकारे स्वप्नांच्या नावे मृगजळाचे धनी झाले आहेत. मात्र वरिष्ठच एजंट असल्याने कुणी उघडपणे बोलू शकत नाहीत.

अधिकृत तक्रार नाही..
अशा प्रकारच्या अनेक गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतवून ‘लाखाचे बारा हजार’ करून घेतलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी ‘वृत्तान्त’कडे याबाबत आपली कैफियत मांडली आहे. असे असले तरी एस.टी. प्रशासनाकडे याबाबत एकही तक्रार नसल्याची माहिती ठाणे विभाग नियंत्रक प्रकाश जगताप यांनी दिली.