बोगस मेमरी कार्ड विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी Print

प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस, चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरासह मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील काही महत्वाच्या रेल्वे स्थानक परिसरात व्यवसाय करणाऱ्या बोगस मेमरी कार्ड विक्रेत्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बुलंद छावा मराठा युवा परिषदेने केली आहे. परिषदेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संदीप पटाडे यांनी ही मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस, दादर, कुर्ला, वांद्रे, अंधेरी आदी रेल्वे स्थानक परिसरात बोगस मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्ह विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही रेल्वे स्थानकांवर पाहणी  केली असता अवघ्या ३० रुपयात विक्रेत्यांकडून बोगस मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्ह विकण्यात येत असल्याचे दिसून आले. सर्वसामान्य लोकांची यात फसवणूक होत आहे. विविध ठिकाणी सुरू असलेल्या या व्यवहारात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस येथे एका विक्रेत्याकडून मेमरी कार्ड घेतल्यानंतर ते बनावट असल्याचे लक्षात आले. याबाबत त्याला जाब विचारला असता, आपल्याला धमकविण्याचा प्रयत्न केला असल्याचे पटाडे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी पटाडे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील, मुख्य सचिव-महाराष्ट्र राज्य, पोलीस महासंचालक-महाराष्ट्र राज्य, लोहमार्ग पोलीस आयुक्त आणि बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन दिले असून बोगस मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्ह विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.