टीवायबीकॉमला गुणांची उधळण; आणखी महाविद्यालयांची चौकशी होणार! Print

प्रतिनिधी
२०११-१२ या शैक्षणिक वर्षांत झालेल्या ‘टीवायबीकॉम’च्या परीक्षेत अंतर्गत मूल्यांकनाच्या नावाखाली गुणांची उधळण करणाऱ्या महाविद्यालयांचा छडा लावण्यासाठी आणखी काही महाविद्यालयांची तपासणी करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षीपर्यंत ६० ते ६५ टक्क्य़ांच्या आसपास लागणारा टीवायबीकॉमचा निकाल २०११-१२ या वर्षांत ८१ टक्क्य़ांवर गेला. अचानक निकालात झालेल्या या वधारणेस विद्यापीठाने लागू केलेला मूल्यांकनाचा ६०:४० फॉम्र्युला कारणीभूत ठरला आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. कारण, १००पैकी ४० टक्के गुणांची जबाबदारी अंतर्गत मूल्यांकनाच्या नावाखाली महाविद्यालयांवर सोपविण्यात आली होती. काही महाविद्यालयांनी ‘मुक्तहस्ते’ या गुणांची उधळण केल्यानेच निकाल वधारल्याची तक्रार आहे. या सगळ्याचा छडा लावण्यासाठी मुंबई विद्यापीठाने वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता मधू नायर, व्यवस्थापन समितीचे सदस्य दिलीप करंडे आणि हिंदुजा महाविद्यालयाचे प्राचार्य टी. ए. शिवारे यांची त्रिसदस्यीय समिती चौकशीसाठी नेमली होती. बोरिवलीचे वर्तक, कांदिवलीचे प्रकाश मालाडचे लॉर्डस महाविद्यालयांची या समितीने चौकशी केली. यापैकी वर्तक महाविद्यालयातील अंतर्गत मूल्यांकन नियमानुसार झाले होते. तसेच मूल्यांकनाच्या दस्तावेजांचे जतनही या महाविद्यालयाने व्यवस्थित केले होते. परंतु, अन्य दोन महाविद्यालयांमध्ये अंतर्गत मूल्यांकन नियमानुसार झाले नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. समितीने ४ जुलैला आपला अहवाल विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत सादर केला.
लॉर्डस महाविद्यालयाने तर अंतर्गत मूल्यांकनच केले नसल्याचा ठपका समितीने आपल्या अहवालात ठेवला आहे. तसेच, निष्कर्षांवर येण्यासाठी समितीला आणखी काही महाविद्यालयांची तपासणी करायची आहे. यासाठी परीक्षा विभागाकडे परवानगी मागितली असून विभागाच्या मान्यतेनंतर समिती या महाविद्यालयांना भेट देऊन चौकशी करेल. अर्थात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच महाविद्यालयांची चौकशी करणे समितीला शक्य होणार आहे. त्यामुळे वाणिज्य अभ्यासक्रम चालविणाऱ्या विद्यापीठाशी संलग्न सुमारे ३२५ महाविद्यालयांमधील अंतर्गत मूल्यांकनाचे गौडबंगाल विद्यापीठ कसे शोधून काढणार असा प्रश्न आहे.