अर्धवट मेटल डिटेक्टरना अखेर रामराम! Print

प्रतिनिधी

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सुरक्षा यंत्रणांनी तातडीने काहीतरी करायचे म्हणून सीएसटी आणि चर्चगेट स्थानकांवर ‘मेटल डिटेक्टर’ बसवून टाकले. बरोबर शस्त्रास्त्रे घेऊन येणाऱ्या अतिरेक्यांनी या मेटल डिटेक्टरमधून यावे, असे जणू फर्मानच या सुरक्षा यंत्रणांनी काढले असावे. त्यामुळे दोन मेटल डिटेक्टरमध्ये दोन माणसे जाऊ शकतील, एवढे अंतर ठेवून ज्यांना मेटल डिटेक्टरमधून जायचे त्यांनी त्यातून जावे अन्यथा दोन मेटल डिटेक्टरमधून जावे, असा हा खुला मामला होता. आता तर चर्चगेट स्थानकातील सर्वच मेटल डिटेक्टर काढून टाकण्यात आले आहेत. स्वाभाविकच अतिरेकी हल्ल्यांचे सावट आता दूर झाले असावे, अशी उपरोधिक चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे.
२६/११ च्या हल्ल्याच्या वेळी एका दहशतवाद्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे फलाट लक्ष्य केले होते. तेथून तो उपनगरी रेल्वे स्थानकात शिरला होता. तेथे केलेल्या अंदाधुंद गोळीबाराने अनेकांचे बळी घेतले. या घटनेनंतर सावध झालेल्या रेल्वे प्रशासनाने बहुतांश सर्वच रेल्वे स्थानकांमधील प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर्स, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर्स तातडीने बसविण्यात आले. एखाद्या प्रवाशाकडे संशयास्पद काही असेल तर ते या डिटेक्टर्समधून लगेच कळू शकेल, असे सांगण्यात येत होते.  प्रवाशांचा दररोज येणारा लोंढा पाहिल्यानंतर या प्रवाशांची तपासणी या मेटल डिटेक्टर्समुळे शक्य झाली होती. मात्र ही मेटल डिटेक्टर्स सुरू आहेत किंवा नाही, याबद्दल काही माहिती मिळू शकलेली नसली तरी किमान तपासणी होत आहे, हे समाधान प्रवाशांना मिळत होते. मात्र आता चर्चगेट रेल्वे स्थानकांतून मेटल  डिटेक्टर्स हलविल्यानंतरही रेल्वे पोलीस तसेच सुरक्षा दलाचे अधिकारी तपासणीपेक्षा आपल्या जागेवर बसण्यातच धन्यता मानत आहेत. फक्त सामान घेऊन जाणाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे.    

म्हणे, मेटल डिटेक्टर्सचा काहीही फायदा नाही..
रेल्वे सुरक्षा दलाच्या पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ उपअक्षीक्षक रुप नवल यांनी सांगितले की, ही मेटल डिटेक्टर्स रेल्वे स्थानकांमध्ये लावल्यामुळे काहीही साध्य झालेले नाही. कारण या डिटेक्टरमधून जाणाऱ्या प्रवाशांचा लोंढा इतका असतो की, प्रत्येक प्रवाशाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवणे शक्य नाही. ज्या ठिकाणी एकावेळी एकच व्यक्ती जाऊ शकेल अशा ठिकाणीच ही डिटेक्टर उपयुक्त आहेत. मात्र आम्ही त्याबरोबरच आमची अन्य सुरक्षा यंत्रणा तेथे कार्यान्वित केली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकातील सुरक्षेला धोका नाही. चर्चगेट ते विरार दरम्यान अनेक स्थानकांवर मिळून सुमारे ७० मेटल डिटेक्टर्स बसविण्यात आली आहे. त्यापैकी ४० डिटेक्टर्स बिघडलेली आहेत. त्यामुळे ती तेथून हलविण्यात आली आहेत. लवकरच त्यांची दुरूस्ती करून नवीन डिटेक्टर्स लावण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.