संक्षिप्त Print

संपर्क सूचीसाठी आवाहन
वीरशैव माहेश्वर जंगम समाजाच्या वतीने माहेश्वर जंगम समाजाची संपर्क सूची पुन:प्रकाशित करण्याचे काम सुरू झाले आहे. समाजातील संबंधित व्यक्तींनी बदललेले पत्ते आणि दूरध्वनी, तसेच नवीन नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी समाजाच्या घाटकोपर येथील कार्यालयात अथवा मन्मथ स्वामी- ९३२२२६६३२५ किंवा लक्ष्मण जंगम ९८१९२२३८०४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘बाराखडी दिल से..’
स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या ‘बाराखडी दिल से’ या उपक्रमाला अलीकडे चार वर्षे पूर्ण झाली. ‘बाराखडी दिले से’  च्या व्यासपीठावर अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांनी आपले विचार, संघर्ष गाथा, नावीन्यपूर्ण कल्पना तसेच अनुभव सादर केले आहेत. या सर्व स्वप्नगाथा इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यू टय़ूब, ब्लॉग आणि फेसबुकवरून या उपक्रमाची माहिती लोकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती उल्हास कोटकर यांनी दिली. याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क - ९८२१०३३७३६ किंवा सुवर्णा गुरव - ९८७०२३३७३६.
श्रीगंगा विशेषांक
श्रीसदगुरू साईकृपा अंकाच्या ‘श्रीगंगा’ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा नुकताच वाराणसी येथे संपन्न झाला. दश्वाश्वमेध या गंगेच्या घाटावर पूजा करुन आणि आरती करुन हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्रातून काशीला पेशव्यांच्या जोडीला गेलेल्या व पिढय़ानपिढया स्थायिक झालेल्या मराठी बांधवाना मराठी साहित्य उपलब्ध करुन द्यावे, यासाठी श्रीसदगुरू साईकृपा अंक प्रसिद्ध करण्यात येतो. ‘श्रीगंगा’ या विशेषांकात महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांना मार्गदर्शनपर माहिती देण्यात आल्याचे संपादक बाळ जाधव यांनी म्हटले आहे.
मिल मजदूर संघाचा वर्धापन दिन
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा ६६ वा वर्धापन दिन व दसरा संमेलन परळच्या महात्मा गांधी सभागृहात पार पडले. यावेळी एमएमआरडीएअंतर्गत मुंबई आणि परिसरात गिरणी कामगारांना अधिकाअधिक घरे उपलब्ध करुन देण्याच्या आश्वासनांनची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिली. दिवाळीपर्यंत गिरणी कामगारांना घरे देण्याचे आश्वासन पूर्ण झाले नसले तरी पात्रतेसंबंधीच्या अडचणी दूर केल्या गेल्याचे अहिर यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भिलारे यांनी केले.
जागतिक आयुर्वेद परिषद संपन्न
अमेरिकेतील अपना ( असोसिएशन ऑफ आयुर्वेद फिजिशिएन ऑफ नॉर्थ अमेरिका) या संस्थेची चौथी जागतिक आयुर्वेद परिषद सप्टेंबर महिन्यात लॉस एंजिल्स येथे संपन्न झाली. पेनसिल्वानियाचे अध्यक्ष डॉ. शेखर अन्नाबोटला यांनी ही परिषद भरविली होती. या परिषदेत भारतातील दहाजणांना मानपत्रे देण्यात आली तर पुण्याच्या आयुर्वेद शिक्षण मंडळाच्या सदस्या डॉ. मीरा परांजपे यांना आयुर्वेदातील विशेष कामगिरीसाठी आंतरराष्ट्रीय धन्वंतरी पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
प्रमोद महाजन वादविवाद स्पर्धा
दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या जंयतीनिमित्त ३० ऑक्टोबरला उस्मानाबाद येथे वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमोद महाजन प्रतिष्ठानतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी ०२४७२-२२७१५९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निबंध स्पर्धेचा निकाल
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत कनिष्ठ गटात सायली पेशवे (नागपूर), प्राची सिंह (नाशिक) आणि रेवती देशमुख (सोलापूर) यांना तर वरिष्ठ गटात अवधूत शिंदे (सातारा), तुषार सोमकुंवर (नागपूर) आणि अजिंक्य चौधरी (अंबरनाथ) यांना पहिल्या तीन क्रमांकांची पारितोषिके जाहीर झाली आहेत.
गोरेगावात ‘काश्मीर’वर व्याख्यान
काश्मीरचे महाराजा हरिसिंग यांनी २६ ऑक्टोबर १९४७ रोजी स्वतंत्र भारतात सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. मात्र त्यानंतर  काश्मीरचा बराच मोठा भूभाग पाकिस्तानने गिळंकृत केला. तेव्हापासून  आजही काश्मीरला स्वायत्तता द्या, अन्य राज्यांपेक्षा वेगळा दर्जा द्या, अशा मागण्या सरकारचे संवादक तसेच तथाकथित बुद्धिवादी करीत आहेत. या साऱ्या पाश्र्वभूमीवर   गोरेगाव (पूर्व) येथील मसुराश्रमातर्फे ‘काश्मीर : एक दृष्टिक्षेप उद्यावर’ या विषयावर एक व्याख्यान, शनिवार, २७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. हरियाणातील देवीलाल विद्यापीठातील काश्मीरविषयक तज्ज्ञ प्रा. वीरेंद्र चौहान व्याख्यान देणार असून सायंकाळी ७.०० वा मसुराश्रमात हा कार्यक्रम होईल. अधिक माहितीसाठी ९२२३४४३६७२ या क्रमांकावर संपर्क साधावा.