प्रमुख लेखापाल राम धस यांच्यावरील गंडातर टळले Print

पालिका आयुक्तांनी दिली ‘क्लीनचीट’
प्रतिनिधी
नगरसेवकांच्या टीकेचे लक्ष्य बनलेले प्रमुख्य लेखापाल राम धस यांना पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी गुरुवारी पालिका सभागृहात ‘क्लीनचीट’ दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी सदस्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली.
नगरसेवक आणि कंत्राटदार यांचे साटेलोटे असल्याचे राम धस यांनी अंतर्गत टिपण्णीमध्ये नमूद केल्याचे काँग्रेस सदस्य शीतल म्हात्रे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आणले होते. तसेच धस यांनी नगरसेवकांवरील आरोप सिद्ध करावेत अथवा राजीनामा द्यावा अशी मागणीही केली होती. त्यावेळी सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी राम धस यांच्यावर ताशेरे ओढले होते. पालिका सभागृहातही त्याचे पडसाद उमटले होते. या संदर्भात प्रशासनाकडून निवेदन करण्यात येत नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी घेतली होती.
मुख्य लेखापरीक्षकांनी प्रभागांतील कामाबाबत केलेल्या अभिप्रायांचा पुनरुच्चार राम धस यांनी आपल्या टिपण्णीत केला असून त्यात नगरसेवक आणि कंत्राटदार यांच्या संगनमताबाबत कोणताही आक्षेपार्ह उल्लेख नाही, असे सीताराम कुंटे यांनी या संदर्भात सभागृहात निवेदन करताना स्पष्ट केले. महापालिकेचा अर्थसंकल्प २६,५८१ कोटी रुपयांचा असून या रकमेचा विनियोग करताना आर्थिक व्यवहारांमध्ये आवश्यक ती दक्षता घ्यावी लागते. खर्चाच्या प्रस्तावाची पडताळणी करताना पालिकेच्या आर्थिक हिताच्या दृष्टीकोनातून भूतकाळात निदर्शनास आलेल्या गंभीर बाबी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी प्रमुख लेखापाल (वित्त) यांच्यावर असते. हे कर्तव्य राम धस यांनी योग्य प्रकारे पार पाडले आहे. नगरसेवक व कंत्राटदारांबाबत कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणी त्यांनी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता नाही, असे सांगत अनवधानाने नगरसेवकांचा अपमान झाला असल्यास प्रशासन दिलगीर आहे, असे निवेदन कुंटे यांनी केले.