‘डेंग्यूच्या डासापेक्षा काँग्रेस धोकादायक’ Print

सत्ताधाऱ्यांमध्ये पिकली खसखस
प्रतिनिधी
बुजुर्ग निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याच्या पाश्र्वभूमीवर महापालिका सभागृहात गुरुवारी डेंग्यूच्या डासांवर झालेल्या चर्चेची गाडी घसरून ‘अधिक धोकादायक कोण, डेंग्यू की काँग्रेस?’ या प्रश्नावर आदळल्याने सभागहाचे वातावरण एकदम तप्त झाले. पण त्याचवेळी काही सदस्यांना हास्याच्या उकळ्या फुटल्याने ते वातावरण लवकरच निवळलेही.
मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी झालेल्या पालिकेच्या आरोग्य विभागाचे डेंग्यूकडे पूर्ण दुर्लक्ष झाले. त्यामुळेच मुंबईकरांना डेंग्यूचा सामना करावा लागत आहे, अशी टीका करीत समाजवादी पार्टीचे नगरसेवक याकूब मेमन अचानक काँग्रेसवर घसरले. डेंग्यूच्या डासापेक्षा काँग्रेस अधिक धोकादायक आहे, असे विधान त्यांनी केले आणि त्यास काँग्रेसच्या वकारुन्निसा अन्सारी यांनी हरकत घेतली. मात्र मेमन यांनी आडमुठी भूमिका घेतल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी गदारोळास सुरुवात केली. सपा आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली.
 विरोधकांमध्ये निर्माण झालेल्या दुफळीमुळे सत्ताधाऱ्यांमध्ये हास्याचे फवारे उडत होते. महापौर सुनील प्रभूही गालातल्या गालात हसत होते. तुम्ही विरोधकांमधील वादाचा आनंद घेताय का, असा खोचक सवाल काँग्रेसच्या एका नगरसेविकेने केल्यावर मग महापौरांनी मध्येच हस्तक्षेप केला. सभागृहात गंभीर विषयावर चर्चा सुरू आहे. परस्परांवर आरोप करण्याऐवजी डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत सूचना करा, अशी समज त्यांनी केली. मात्र मेमन यांनी काँग्रेसची माफी मागण्यास सपशेल नकार दिला. त्यामुळे काँग्रेसचे सदस्य अधिकच संतप्त झाले. अखेर महापौरांनी आदेश दिल्यामुळे याकूब मेमन यांना भाषणाची संधी गमवावी लागली. त्यानंतर सभागृहातील गदारोळ शांत झाला आणि डेंग्युवरील चर्चा पुढे सुरू झाली.

पण डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होऊनही त्याकडे दुर्लक्ष झालेला पालिकेचा आरोग्य विभाग यश चोप्रा यांच्या निधनानंतर मात्र सतर्क झाला. स्टुडिओत डासांचा प्रादुर्भाव झाल्याने यश चोप्रा यांना डेंग्यू झाल्याचे उघड झाले. डेंग्यूच्या डासांच्या शोधार्थ आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमिताभ बच्चन, धर्मेद्र आदींच्या बंगल्यावर धाव घेतली. हे अधिकारी नगरसेवकाच्या घरी जातील का? आणि गेलेच तर नगरसेवक राहात असलेल्या इमारतीतील अन्य सदनिकांमध्येही पाहणी करतील का?, अशी टीका माजी महापौर शुभा राऊळ यांनी केली. धूम्रफवारणीमुळे डासांवर कोणताच परिणाम होत नाही. मग त्यासाठी पैसे का वाया घालवता, असा  तक्रारीचा सूर संदीप देशपांडे यांनी आळवला. पालिकेकडील धूम्रफवारणीची निम्मी यंत्रे बंद आहेत, कीटकनाशकांचा पुरवठा अपुरा आहे, सायंकाळी धूम्रफवारणी होत नाही, रक्ताच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा नाही, आरोग्य सेवेतील अनेक पदे रिक्त आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित करून नगरसेवकांनी प्रशासनाला लक्ष्य केले. या सर्व मुद्दय़ांची दखल घ्यावी आणि प्रभावीपणे धूम्रफवारणी हाती घ्यावी. त्याचबरोबर जनजागृती करून डेंग्यु निर्मूलनासाठी सर्वसामान्य मुंबईकर आणि सामाजिक संस्थांची मदत घ्यावी, असे आदेश सुनील प्रभू यांनी दिले.