‘कोमसाप’च्या काव्योत्सवात कवितांचा जागर! Print

प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्ह्यातर्फे आयोजित दोन दिवसांच्या काव्योत्सवात नवोदित आणि नामवंत कवी सहभागी झाले होते. या काव्योत्सवात विविध कवींनी आपल्या कविता सादर करून कवितेचा जागर केला. देवनार येथील कुमुद विद्या मंदिराच्या सभागृहात झालेल्या या काव्योत्सवाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी प्रा. प्रवीण दवणे हे होते. उद्योजक आनंद पेडणेकर यांच्या हस्ते काव्योत्सवाचे उद्घाटन झाले.  
आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. दवणे म्हणाले की, वेदना आणि कविता यांचे नाते सनातन असून चांगली कविता वेदनेपोटीच जन्माला येते. अशा प्रकारचे काव्योत्सव हे वाङ्मयीन वातावरणाला उर्जा देण्याचे काम करतात. ‘कोमसाप’चे अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांनी सांगितले की, ‘कोमसाप’चे जे विविध साहित्यविषयक उपक्रम आहेत, त्यात या काव्योत्सवाने मोलाची भर घातली आहे.
दोन दिवसांच्या या काव्योत्सवात तीन कविता सत्रांसह गझलसंध्या, बालगीते, युवोन्मेष, विडंबन गीते, विनोदी कविता, वृत्तबद्ध कविता, गीते, करिण येले यांचा ‘बाईच्या कविता’ आदी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कविता आणि वेदना, कविता आणि व्यक्तिमत्व, कविता आणि आध्यात्म, कवितेचा माध्यमातून अविष्कार आदी चर्चासत्रे आणि व्याख्यानेही झाली. अशोक नायगावकर, अनुपमा उगजरे, सिसिलिया काव्‍‌र्हालो, प्रसाद कुलकर्णी, उषा मेहता, सतीश सोळांकुरकर, रविराज गंधे, दीपक शेडगे, नमिता किर, रेखा नार्वेकर मनोहर रणपिसे, दिलीप पांढरपट्टे, ए. के. शेख, सदानंद डबीर, साहेबराव ठाणगे, सरोज जोशी, प्रतिभा सराफ आणि अन्य कवी व गझलकार सहभागी झाले होते. काव्योत्सवाचे स्वागताध्यक्ष शरद पाटील, ‘कोमसाप’च्या मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष दत्तात्रय सैतवडेकर यांनीही आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. मेघना साने यांनी उपस्थितांचे आभार मानले.