रसिकांना पाहायला मिळणार विजया मेहता यांच्या मूळ नाटकांचा खजिना Print

प्रतिनिधी

ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी आपल्या प्रतिभेला कष्ट, नियोजन आणि जिद्दीची जोड देऊन आपली कला सिद्ध केली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक नाटय़कृती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि परदेशातही गाजल्या. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील आजचे आघाडीचे अनेक कलाकार विजयाबाई यांचे शिष्य. आपल्याला विजयाबाईंनी घडविले, असे ते कलाकारही आवर्जून सांगतात. विजयाबाई यांनी काही वर्षांपूर्वी सादर केलेली नाटके मूळ कलाकारांच्या संचासह पाहण्याची सुवर्णसंधी रसिकांना उपलब्ध झाली आहे. आशय सांस्कृतिक आणि असीए एन्टरटेंटमेट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विजयाबाई आणि आपण’ या महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्रात विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. पुण्यात ६ व ७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महोत्सवाच्या निमित्ताने विजयााबाई यांनी सादर केलेली काही जुनी नाटके डीव्हीडीच्या माध्यमातून रसिकांना दाखविण्यात येणार आहेत.
‘एनसीपीए’कडे विजयाबाई यांनी सादर केलेल्या काही मूळ नाटकांचे ध्वनिचित्रमुद्रण उपलब्ध असून या निमित्ताने पहिल्यांदाच ते रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. विजयाबाई यांनी रंगभूमीवर सादर केलेली नाटके ‘मैलाचा दगड’ ठरली असून नाटकाचील मूळ कलाकारांच्या संचातील ही नाटके आत्ताच्या पिढीसाठी आणि नाटय़रसिकांसाठीही अविस्मरणीय अशी भेट ठरणार आहेत. ‘एनसीपीए’कडे असलेला हा अमूल्य खजिना त्यांच्या सहकार्याने रसिकांसाठी खुला होणार आहे. पुण्यातील महोत्सवात विजयाबाई यांच्यावरील लघुपट, ‘स्मृतिचित्रे’ ही टेलिफिल्म, ‘वाडा चिरेबंदी’ (हिंदूी नाटक), हयवदन (मराठी नाटक) आणि ‘हमीदाबाई की कोठी (हिंदी रूपांतर) यांची ध्वनिचित्रफित दाखविली जाणार असल्याचे आशय सांस्कृतिक आणि असीम एन्टरटेंटमेंटचे वीरेंद्र चित्राव आणि अजित भुरे यांनी सांगितले. पुण्यानंतर राज्यात विविध ठिकाणी ‘विजयाबाई आणि आपण’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असून यात त्यांची प्रकट मुलाखत, त्यांच्या कलाकार शिष्यांनी सादर केलेला कार्यक्रम याबरोबरच ‘लेटर्स टू माय डॉक्टर’ (इंग्रजी नाटक), पेस्तनजी (हिंदी चित्रपट), शाकुंतल (हिंदी नाटक) आदी नाटकांच्या ध्वनिफितीही दाखविल्या जाणार आहेत. विविध ठिकाणी होणारे हे कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’या तत्वावर कार्यक्रमाच्या प्रवेशिका त्या त्या वेळी रसिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचेही भुरे व चित्राव म्हणाले.