शेजाऱ्याच्या सदोष वीज मीटरमुळे मृत्युमुखी पडलेल्या महिलेला न्याय कधी मिळणार? Print

प्रसाद रावकर

शेजाऱ्याच्या सदोष विद्युतसंच मांडणीमुळे घरामधील शौचालयातील नळाला विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेल्या सुगंधा साटम (५६) यांना न्याय मिळावा यासाठी त्यांचा मुलगा गेले तीन महिने वणवण करीत आहे. या प्रकरणी बेस्ट, सार्वजनिक बांधकाम खात्यातील ‘बाबू’ आणि स्थानिक पोलीस ठाण्याकडून टोलवाटोलवी करण्यात येत असल्याने त्याच्या पदरी केवळ निराशा आली आहे. त्यामुळे आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.
ताडदेव येथील दादरकर कम्पाऊंडमध्ये राहणाऱ्या सुगंधा साटम या १० जुलै २०१२ रोजी आपल्या घरातील शौचालयात गेल्या होत्या. अचानक त्या ओरडल्यामुळे त्यांचा मुलगा प्रशांत धावत शौचालयाजवळ आला. आतून बंद असलेला दरवाजा तोडल्यानंतर आई नळाला धरून असल्याचे त्याला आढळले. तिला उचलण्याचा प्रयत्न केला असता त्याला विजेचा धक्का लागला. त्यातून सावरत त्याने घरातील मुख्य स्विच बंद केला आणि आईला वाचविण्यासाठी धावला. मात्र पुन्हा त्याला विजेचा धक्का बसला. अखेर त्यांनी शेजाऱ्यांचे मुख्य स्विच बंद केले आणि नळाला चिकटलेल्या त्याच्या आईची सुटका झाली. त्याने तात्काळ तिला भाटिया रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.
विजेचा धक्का लागून सुगंधा यांचा मृत्यू झाल्यामुळे ताडदेव पोलिसांनी बेस्ट आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला त्याची माहिती दिली. त्यानंतर बेस्ट आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी साटम तसेच शेजारी वाजा यांच्या घरातील विद्युतसंचाची तपासणी केली. त्या वेळी वाजा यांच्या घरातील विद्युतपुरवठा सुरू केल्यानंतर साटम यांच्या शौचालयातील नळाला विजेचा धक्का बसत असल्याचे त्यांना आढळून आले. मात्र हे करीत असताना पोलीस उपस्थित नसल्याने तपासणीदरम्यान पंचनामा होऊ शकला नाही.
त्यानंतर १८ जुलै रोजी बेस्टने प्रकाश वाजा यांना आदेशपत्र पाठवून घरातील विद्युतसंचाची दुरुस्ती करून घेण्याची सूचना केली व वाजा यांनीही ११ दिवसांमध्ये त्यांनी आपल्या घरातील विद्युतसंचाची दुरुस्ती करून घेतली. ही बाब ताडदेव पोलीस ठाण्याच्या निदर्शनास आणून देण्यात आली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा तसेच बेस्ट, सार्वजनिक बांधकाम खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी सुगंधा साटम मृत्यू प्रकरणातील अहवाल सादर करण्यात मोठी दिरंगाई केल्याचा आरोप प्रशांत साटम यांनी केला आहे. बेस्ट व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अहवाल मिळेपर्यंत आपल्याला काही करता येत नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याचेही त्यांनी सांगितले. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे पत्राद्वारे कैफियत मांडल्यानंतरही त्यांना न्याय मिळाला नाही.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याने तब्बल तीन महिन्यांनी, १७ ऑक्टोबर रोजी आपला अहवाल सादर केला असून त्यात वाजा यांनी आपल्या विद्युतसंच मांडणीची योग्य देखभाल न केल्यामुळे हा अपघात घडला असावा, असे स्पष्ट म्हटले आहे. मात्र तरीही पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे हताश झालेल्या प्रशांत साटम यांनी आता न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.