एमएमआरडीएच्या अपघातात कंत्राटदार मोकाट सुटतात कसे ? Print

प्रतिनिधी, गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२

वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या ११.७ किलोमीटर मार्गावर उभारण्यात येत असलेल्या मेट्रो रेल्वेच्या स्थानकाचे काँक्रिटीकरण सुरू असताना स्लॅब कोसळून झालेला अपघात तांत्रिक कारणांमुळे झाल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला व या अपघातप्रकरणी मेट्रोचे काम करणाऱ्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या अखत्यारितील ‘मुंबई मेट्रोवन प्रा. लि.’ आणि कंत्राटदार ‘एचसीसी’ या बडय़ा कंपन्यांना ‘क्लिन चिट’ मिळाली. अपघात होताना तांत्रिक प्रक्रिया घडणारच; पण त्यामागील निष्काळजीपणा व बेदरकार वृत्तीचे काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबई महानगर परिसरात सुरू असलेले मेट्रो रेल्वे, मोनोरेल व पूर्व मुक्त मार्ग हे दिरंगाईबरोबरच अपघातांसाठी बदनाम झाले आहेत. कोणत्याही प्रकल्पावर अपघात झाला की पुढच्या घटनाक्रमांचा साचा आता तयार झाला आहे. अपघात घडला की अत्यंत दुर्दैवी घटना असल्याची प्रतिक्रिया द्यायची. या प्रकाराची गंभीर दखल घेत असल्याचे सांगत चौकशीचा आदेश द्यायचा, नंतर दोन किंवा तीन सदस्यीय समिती नेमायची. त्यात शक्यतो मुंबई आयआयटीच्या तज्ज्ञाचा समावेश करायचा. नंतर महिना-दीड महिन्यात अहवाल येतो व ‘अपघात तांत्रिक कारणांमुळे झाल्याचे व कंत्राटदाराचा दोष नसल्याचे अहवालात नमूद केले आहे’ असे जाहीर करायचे की प्रकरण बंद.
गेल्या वर्षीचा मोनोरेल अपघात व यंदा पूर्व मुक्त मार्ग व मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पावर झालेल्या जीवघेण्या अपघातात कामगार हकनाक मेले व अपघात तांत्रिक कारणांमुळे झाला असल्याने कोणावरही कारवाई झाली नाही.                    

*  महानगर आयुक्तांचा कठोरपणा कुठे गेला?
४ सप्टेंबरला मेट्रोच्या स्थानकावर अपघात झाला तेव्हा अशा कामावेळी अपेक्षित असलेल्या सुरक्षेच्या उपाययोजना आणि आवश्यक खबरदारी कामाच्या ठिकाणी घेतली गेली नाही, असे सांगत प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल अस्थाना यांनी कंत्राटदारांच्या निष्काळजीपणाची कबुली दिली होती. मग चौकशी अहवालात कंत्राटदार दोषमुक्त कसे ठरले, आवश्यक खबरदारी न घेतल्याबद्दल चौकशी समितीला कंत्राटदार दोषी वाटले नाहीत? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी ‘मि. क्लीन’ अशी ओळख असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना, वारंवार जीवघेण्या अपघातांच्या चौकशीअंती बडय़ा कंत्राटदारांना नेहमीच ‘क्लीन चिट’ कशी मिळते?

*  भुसभुशीत जमिनीवर बांधकाम कसे?
मेट्रो रेल्वेच्या स्थानकावरील स्लॅब कोसळण्यामागे भुसभुशीत जमिनीमुळे पक्का आधार मिळाला नाही, असे कारण सांगण्यात आले आहे. मग पक्का आधार नसताना सुमारे ६० फूट उंचीच्या जिन्याचे काम भुसभुशीत जमिनीवर करणाऱ्यांचा काहीच दोष कसा नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर पूर्व मुक्त मार्गावर गर्डर बसवताना त्याचे यंत्र बिघडले, असे सांगण्यात आले. यंत्राची अवस्था बघणे कुणाची जबाबदारी?

* एमएमआरडीए प्रकल्पांवरील प्रमुख अपघात
 २००८ - अंधेरी पश्चिमेला मेट्रो रेल्वेच्या कामावर पाया खणण्यासाठी आणलेल्या यंत्राचा भाग रिक्षावर कोसळला व एक जण ठार तर एक जण जखमी झाला.
२००९ - अंधेरी पूर्वेला मेट्रोच्या काँक्रिट खांबाला आधार देणारा भाग कोसळला व चार मजूर जखमी झाले
२०११ - दोन जुलै आर. सी. मार्गावर रोजी मोनोरेलचा गर्डर बसवताना तो कोसळला व दोन कामगार ठार व तीन जखमी.
२०१२  - १९ जुलै पूर्व मुक्त मार्गावर गर्डर पडला व एक ठार, सात जखमी. आणि ४ सप्टेंबर २०१२ मेट्रो रेल्वे स्थानकाचा स्लॅब कोसळला एक ठार १६ जखमी. शिवाय मोनोरेलच्या कामावर असलेल्या क्रेनच्या धडकेत एक जण ठार.
या बरोबरच कधी क्रेनची रुग्णालयाच्या इमारतीला धडक, तर कधी लालबाग उड्डाणपुलाचा खालचा भाग कोसळणे अशा कोणाचा जीव सुदैवाने गेला नाही अशा अनेक छोटय़ा मोठय़ा घटना घडल्या.