नारायण यांच्या ‘कोचरेथी’ला ‘द इकॉनॉमिस्ट क्रॉसवर्ड बुक’ पुरस्कार Print

प्रतिनिधी
मल्ल्याळी लेखक नारायण यांच्या ‘कोचरेथी: द आर्य वुमन’ इंग्रजी भाषांतरित पुस्तकाला प्रतिष्ठित अशा ‘द इकॉनॉमिस्ट क्रॉसवर्ड बुक पुरस्कारा’ने अलीकडेच गौरविण्यात आले आहे.मुंबईत एका समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  
गेल्या वर्षी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे ‘कोचरेथी: द आर्य वुमन’ची इंग्रजी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली होती. आदिवासी जीवनाचे दर्शन घडविणारी ही भारतातील पहिलीच पुरस्कारप्राप्त कादंबरी आहे. नारायण यांच्या या कादंबरीचे कॅथरीन थंकम्मा यांनी इंग्रजी भाषांतर केले आहे. ही कादंबरी प्रामुख्याने २० व्या शतकाच्या आधीच्या काळातील आर्य समाजाच्या जीवनावर प्रकाश टाकते. ही कादंबरी कॅनडा येथील कॅलगॅरी विद्यापीठामध्ये शिकवली जाते. याशिवाय कालिकत विद्यापीठात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातही तिचा समावेश आहे.  ‘ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक रंजन कौल यांनी या पुरस्काराबाबत समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वीही ‘ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या तीन पुस्तकांना पुरस्कार मिळाले असून ‘कोचरेथी’च्या निमित्ताने पुरस्कारांची संख्या चार झाली आहे.
‘ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’तर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भाषांतरित पुस्तकांची वाढतच असून आतापर्यंत १३० पुस्तके भाषांतरित करण्यात आली आहेत. या यादीत प्रसिद्ध आणि पुरस्कारविजेत्या समकालीन लेखकांचा प्रामुख्याने समावेश असल्याबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.
पुस्तकाचे लेखक नारायण यांनीही पुस्तकाला पुरस्कार मिळाल्याबाबत आपण खूप आनंदी असल्याची प्रतिक्रिया दिली. या पुस्तकाचे भाषांतर करणाऱ्या कॅथरिन यांनीही हा पुरस्कार म्हणजे आपल्यास मिळालेला मोठा सन्मान असल्याचे म्हटले आहे.