कचरा उचलण्यासाठी डिसेंबरपासून नवीन कॉम्पॅक्टर Print

प्रतिनिधी
कचऱ्याची समस्या अद्याप सुटली नसून शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग साठल्याचा आरोप नगरसेवकांकडून बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. त्यावर डिसेंबरपासून नवीन कॉम्पॅक्टर उपलब्ध होण्यास सुरुवात होईल, असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले. याचा अर्थ डिसेंबर उजाडेपर्यंत तरी कचऱ्याचे ढीग शहरभर साठलेले दिसतील.
यासंदर्भात स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत बरीच चर्चा झाली. तृष्णा विश्वासराव यांनी कचऱ्याच्या समस्येबाबत हरकतीचा मुद्दा मांडला आणि सर्वपक्षीय सदस्यांना त्याला पाठिंबा दिला. कचऱ्याच्या गाडय़ा कमी आहेत किंवा अपुऱ्या पडत असल्याबद्दल कंत्राटदारांवर कारवाई का करू नये, असा प्रश्न अनेक सदस्यांनी विचारला. युरो चार तंत्राचे कॉम्पॅक्टर नसले तरी जेसीबी व डम्परच्या मदतीने कचरा उचलावा असे आदेश विभागांना देण्यात आले आहेत, असे सांगण्यात आले. वांद्रे पश्चिम, दहीसर, वडाळा येथील केंद्रीय कर्मचारी वसाहत, प्रभादेवी परिसर आदी ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.