वृक्षसंपदा रोगमुक्तीसाठी फिरतोय तोतया ! Print

प्रसाद रावकर
झाडाला रोग लागलाय.. फळाचा आकारही लहान झालाय.. त्याला औषधाची गरज आहे.. रोग नष्ट होईल आणि फळाचा आकारही वाढेल.. अशा भुलथापा देऊन वसई-विरार पट्टय़ातील अनेकांना गंडा घालणारा तोतयाचा मुक्तसंचार पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे सुरूच आहे. पैसे गेल्याने ग्रामस्थांवर मात्र नशिबाला दोष देत बसण्याची वेळ आली आहे.
तीन महिन्यांपूर्वी अर्नाळा, आगाशी, चाळपेठ, उंबरगोठण, सत्पाळा, नाळा, नवापूर, कळंब, वाघोली, नंदाखाल आदी वसई-विरार पट्टय़ामधील ग्रामीण भागामध्ये नरेश पाटील नामक व्यक्ती घरादारापुढे अथवा वाडीमध्ये डोंलाने उभ्या असलेल्या वृक्षसंपदेचे निरीक्षण करीत फिरत होती. आंबा, नारळ, पेरु, चिकू, सुपारीच्या बागांवर त्याचे अधिक लक्ष होते. तुमच्या झाडाला रोग लागला आहे. त्यामुळे फळाचा आकारही रोडावला आहे. झाडाला औषधाचा डोस दिला तर ते बरे होईल आणि फळाचा आकारही वाढेल, असे आमीष तो ग्रामस्थांना घरोघरी जाऊन दाखवत असे.
जमिनीतील पोषक मूलद्रव्ये झाडांना पहिल्या दोन ते तीन वर्षांपर्यंत मिळू शकतात. मात्र त्यानंतर त्याचा दर्जा आणि आकारमान यांचा समतोल राखण्यासाठी, तसेच वाळवीपासून संरक्षण करण्यासाठी औषधाची आवश्यकता असते. सेंद्रीय खत आणि औषधाचा डोस दिल्यानंतर झाड रोगमुक्त होईल. त्यासाठी प्रतिझाड शंभर रुपये ते सव्वाशे रुपये खर्च येईल. खतामध्ये रासायनिक द्रव्यांचा वापर करण्यात आलेला नाही. हे काम स्वत:चे समजून केले जाईल, असे सांगून तो समोरच्या व्यक्तीवर छाप पाडत असे. इतकेच नव्हे तर आपण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील वृक्षलागवड तज्ज्ञ असल्याची बतावणीही तो करीत आहे. सरतेशेवटी आपल्या जवळील छापील पावत्याही दाखवून ग्रामस्थांचा विश्वास संपादन करीत असे. कमी दरात झाड सुदृढ करण्याची संधी चालून दाराशी आल्यामुळे ग्रामस्थही खूष होऊन हे काम पाटीलवर सोपवित. तसेच त्यासाठी आगाऊ पैसेही देत. परंतु एकदा का पैसे हातात पडले की मग पाटील पुन्हा त्या गावात फिरकत नसे आणि ग्रामस्थांवर मात्र त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली. त्याने पावतीवर दिलेला मोबाईल क्रमांकही आता बंद आहे. प्रत्येक गावामध्ये तो निरनिराळ्या पावत्या देत असून त्यावरील त्याच्या निवासी पत्त्यातही विसंगती असल्याचे आढळून आले आहे.
 अशा पद्धतीने वसई-विरार पट्टय़ात अनेक गावांतील ग्रामस्थांना त्याने गंडा घातला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काही ग्रामस्थांनी स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रारही नोंदवली. नवापूर येथे फिरताना एकदा तो ग्रामस्थांच्या दृष्टीस पडला. ग्रामस्थांनी त्याला पकडले आणि आगाशी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. परंतु पोलिसांनी दुसऱ्या दिवशी त्याची मुक्तता केली. त्यानंतर तो गायब झाला तो कायमचाच. आगाशी पोलीस ठाण्यातील एका महिला अधिकाऱ्याने पाटीलची हमी देत त्याची मुक्तता केली. त्यामुळे ग्रामस्थ सदर महिला पोलीस अधिकाऱ्याकडे धाव घेत आहे. परंतु त्याही आता हात झटकू लागल्या आहेत. हजारो रुपयांना फसल्यामुळे आता दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.