‘जसलोक’ची ३४ वर्षांची पाणीपट्टी थकबाकी Print

न्यायालयात पालिकेची बाजू दुर्बळ  पडल्याने स्थायी समितीत गोंधळ
प्रतिनिधी

जसलोक रुग्णालयाने ३४ वर्षे पाणीपट्टी न भरल्याच्या प्रकरणी न्यायालयात पालिकेची बाजू दुर्बळ का ठरत आहे, असा सवाल स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी सर्वपक्षीय सदस्यांनी उपस्थित केला आहे. २००७ साली पालिकेने जसलोकला ३४ वर्षांची पाणीपट्टी वसूल करण्यासंदर्भात नोटीस पाठवली होती. पण तिला केराची टोपली दाखवत रुग्णालय प्रशासनाने न्यायालयात धाव घेतली. त्यावर निर्णय देताना पालिकेला न्यायालयाने फटकारले व  फक्त तीन वर्षांची पाणीपट्टी वसूल करता येईल, असे निर्देश दिले. या पाश्र्वभूमीवर स्थायी समितीच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. ३४ वर्षे पालिकेने बिल का पाठविले नाही, याची जबाबदारी कोण घेणार, त्यांच्यावर काय कारवाई करणार अशा प्रश्नांचा भडिमारच त्यांनी केला. यात भर म्हणून माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी पालिका आपली बाजू न्यायालयात सक्षमपणे का मांडू शकत नाही, असा सवालही केला. पण २००६ साली पालिकेने नियमात केलेल्या सुधारणेनुसार तीन वर्षांच्या थकित रकमेवर दावा करता येऊ शकतो. या नियमाचा आधार  रुग्णालयाने घेतला. परंतु पालिकेच्या वकिलांनी आपली बाजू ठामणे न मांडल्याने आपला पराभव झाला असल्याचा संताप सर्व सदस्यांनी व्यक्त केला. तर याप्रकरणी वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायलयात जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अडतानी यांनी सांगितले.