पुन्हा एकदा अनुभवा ‘जाने भी दो यारो’चा ‘मॅड’पणा Print

रोहन टिल्लू

महापालिकेच्या ताब्यातली जमीन.. त्या जमिनीचा ताबा मिळवून त्यावर गगनचुंबी टॉवर उभारण्यासाठी चाललेली दोन बिल्डरची धडपड.. हे सर्व टिपणारी एक चाणाक्ष संपादिका आणि राजकारणी- बिल्डर लॉबी व पत्रकारांच्या संगनमतात भरडला जाणारा सामान्य माणूस.. अगदी आज, आत्ताच्या घडीला एखाद्या दिग्दर्शकाला भुरळ पडावी अशा या विषयावर ८० च्या दशकात आलेल्या ‘ब्लॅक कॉमेडी’ असलेल्या चित्रपटाने त्यावेळी अक्षरश: धम्माल उडवून दिली होती. या चित्रपटाचे नाव होते ‘जाने भी दो यारो’. हा चित्रपट आहे त्याच स्वरूपात आज, २ नोव्हेंबरपासून रसिकांच्या भेटीला पुन्हा एकदा येत आहे.
आजच्या काळाचा संदर्भ पाहता, या चित्रपटाचे कथानक आजही तेवढेच टवटवीत असल्याचे मत चित्रपटाचे दिग्दर्शक कुंदन शहा यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना व्यक्त केले. नसिरुद्दीन शाह, सतीश शहा, नीना गुप्ता, पंकज कपूर, ओम पुरी, भक्ती बर्वे वगैरे कलाकार असलेला हा चित्रपट आम्ही अत्यंत कमी बजेटमध्ये बनविला होता. दिग्दर्शक, म्हणजे मी धरून, आम्ही सगळेच नवखे होतो. अशा प्रकारचा चित्रपट डब्यात जाणार, अशीच त्यावेळी धारणा असायची. त्यामुळे त्याहीवेळी एनएसडीसीने आम्हाला पैसे दिले, हा त्यांचा मोठेपणा आहे. सुदैवाने हा चित्रपट चालला आणि प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. आता एनएसडीसी आणि पीव्हीआर संयुक्त विद्यमाने हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करत आहेत. हा चित्रपट अत्यंत मोजक्या चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून ही संख्या देशात केवळ २० एवढीच मर्यादित असणार आहे. यात मुंबईतील चार आणि दिल्लीतील सहा चित्रपटगृहांचा समावेश आहे.
 ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटातील शेवटचा ‘द्रौपदी वस्त्रहरणाचा’ प्रसंग भलताच गाजला होता. मात्र हा प्रसंग केवळ कमी बजेटपोटी चित्रित करण्यात आल्याची कबुलीही शहा यांनी दिली. चित्रपट ‘ब्लॅक कॉमेडी’च्या स्वरूपात हाताळल्याने शेवटही अशाच प्रकारे व्हावा, असे वाटत होते. बजेट कमी असल्याने आम्ही एका प्रेक्षागारात नाटक चालले आहे, असे दाखवण्याचे ठरवले. मग त्या मृतदेहाला जास्त महत्त्व मिळेल असा प्रसंग म्हणून आम्ही ‘द्रौपदीच्या वस्त्रहरण’ हा प्रसंग निवडल्याचेही शाह यांनी सांगितले.