‘सनी लिओन’पासून सावधान!!! Print

प्रतिनिधी

दिवसातला बहुतांश वेळ इंटरनेटवर घालवणाऱ्या, अगदी थोडाच वेळ इंटरनेटला भेट देणाऱ्या किंवा इंटरनेटशी संबंधित काम करणाऱ्या नेटकऱ्यांनो, सनी लिओनच्या छायाचित्रापासून सावधानऽऽऽ! भारतीय सायबर जगतात घुसखोरी करण्यासाठी इंटरनेटवरील अनेक व्हायरस असलेली संकेतस्थळे हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘हॉट’ नायिकांच्या छायाचित्रांचा वापर करीत असून यात यंदा सनी लिओन सर्वाधिक ‘डेंजरस’ सेलिब्रिटी ठरली आहे. त्यामुळे तिचे एखादे ‘उत्सुकता चाळवणारे’ छायाचित्र पाहून मोहात पडणाऱ्यांचे ‘पाऊल’ एखाद्या ‘व्हायरस’ असलेल्या संकेतस्थळावर पडत आहे.
संगणकाची सुरक्षा करणाऱ्या मॅकॅफे या सॉफ्टवेअर कंपनीतर्फे गेली सहा वर्षे अशा प्रकारचे सर्वेक्षण केले जाते. चित्रपटसृष्टीली हॉट अभिनेत्री, खेळाडू किंवा सेलिब्रिटी महिलांची छायाचित्रे दर्शनी भागात ठेवून लोकांचे ‘लक्ष’ खेचण्याचा प्रयत्न अनेक संकेतस्थळे करत असतात. या छायाचित्रांवर क्लिक केल्यामुळे तुमच्या इमेल आयडीवरील तुमचा पासवर्ड, तुमचा मोबाइल क्रमांक अशी गुप्त माहिती या संकेतस्थळांना सहज कळू शकते. दरवर्षी कोणत्या सेलिब्रिटीच्या छायाचित्रावर क्लिक करून किती लोक यात फसतात, याचा अभ्यास करून त्या वर्षांतील ‘धोकादायक सेलिब्रिटी’चा शोध घेतला जातो. गेल्या वर्षी भारतीय सायबर जगतात हा मान कतरिना कैफने पटकाविला होता.
मात्र यंदा बिग बॉस, जिस्म-२ आदी गोष्टींमुळे चर्चेत असलेल्या कॅनेडियन पॉर्न स्टार सनी लिओनला सायबर जगतात सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्याखालोखाल कतरिना कैफचा क्रमांक असून तिसऱ्या क्रमांकावर करिना कपूर आहे. चंदेरी पडद्यावर करिनाशी स्पर्धा असलेल्या प्रियांका चोप्राची स्पर्धा इथेही करिनाबरोबरच असून ती ‘धोकादायक सेलिब्रिटी’मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या दहामध्ये आठव्या स्थानावर सलमान खान असून तो एकमेव पुरुष सेलिब्रिटी आहे. तर बिपाशा बासू, विद्या बालन, दीपिका पडुकोन, ऐश्वर्या राय बच्चन आणि पूनम पांडे यादेखील या यादीत आहेत.