‘झोपाळू’ सुरक्षारक्षकांवर आता मुंबई पोलिसांची नजर Print

एजन्सींवर होणार कारवाई
प्रतिनिधी - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२

ज्यांच्या हातात सुरक्षा सोपवून मुंबईकर सुखाने झोपतात, त्या सुरक्षा रक्षकांच्या डुलक्या धोकादायक ठरत असल्याचे उघड झाले आहे. सुरक्षा रक्षकांच्या डुलक्यांमुळेच मुंबईत रात्रीच्या गुन्'ाात वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आता या ‘झोपाळू’ सुरक्षा रक्षकांविरोधात मोहीम उघडली आहे. रात्री कामाच्या वेळी एखादा सुरक्षा रक्षक झोपल्याचे आढळल्यास त्याला पोलिसांकडून ‘प्रसाद’ मिळेलच. या शिवाय संबंधित सुरक्षा एजन्सीवरही कारवाई केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि दरोडय़ांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सुरक्षा रक्षक असूनही चोऱ्या का होतात, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. मागील आठवडय़ात माहिमच्या आंध्र बॅंकेच्या एटीएममध्ये तिघांनी चोरीचा प्रयत्न केला होता. त्यावेळी डय़ुटीवर असलेला सुरक्षा रक्षक गाढ झोपला होता. त्यामुळेच चोरांना आतमध्ये सहज प्रवेश मिळविता आला. मात्र एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न फसला. हा सुरक्षा रक्षक जागा असता तर हा प्रसंग टळू शकला असता, अशी माहिती उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
सुरक्षा रक्षकांच्या डुलक्या चोरांसाठी पर्वणी ठरू लागल्या आहेत. त्यामुळे या झोपाळू सुरक्षा रक्षकांविरोधात उघडण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. इमारती, बँका, एटीएम, कंपन्या आदी ठिकाणच्या सुरक्षारक्षकांवर गस्तीवरील पोलीस खास नजर ठेवणार आहेत. यावेळी सुरक्षा रक्षक झोपलेला आढळल्यास त्याला पोलिसांचे दंडुक्यांचा ‘प्रसाद’ मिळेलच. या शिवाय संबंधित सोसायटी, कंपन्यांना कळवले जाणार आहेत. ज्या सुरक्षा एजन्सीत तो कार्यरत असेल, त्या एजन्सीला यासाठी जबाबदार धरुन कारवाई केली जाईल, असेही उपायुक्त कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
स्वत:च्या सुरक्षेसाठी पैसे खर्च करुन सुरक्षा रक्षक नेमले जातात. सध्या व्यावसायिक सुरक्षा एजन्सी इमारतीच्या सुरक्षेसाठी
नेमली जाते. त्यांच्यावर कामाचा ताण पडू नये म्हणून १२ तासांची डय़ुटी दिली जाते. त्यांना इतर कामे करण्यास मनाई करुन फक्त सुरक्षेवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात येते. परंतु रात्रपाळीत काम करणारे सुरक्षा रक्षक दिवसा काम करतात आणि त्यामुळे रात्री ते डुलक्या काढत असतात. रात्री कुणाचेही लक्ष नसल्याने ते मस्त ताणून देत असल्याचेही निदर्शनास आले आहे. इमारतींच्या बाहेर उभी करण्यात आलेल्या वाहनांच्या चोरीच्या तपास प्रकरणात ही बाब प्रामुख्याने समोर आली आहे. इमारतीत सुरक्षा रक्षक झोपले असल्याने वाहन चोरी होत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. ही मोहीम सध्या वरळी- दादर परिसरात सुरू करण्यात आली असली तरी यापुढे मुंबईच्या सर्व भागातील पोलिसांना त्याबाबत सुचना देण्यात येणार आहे. आपल्यावर पोलिसांची नजर आहे, हे लक्षात आल्यानंतर किमान त्या भीतीपोटी तरी ते जागे राहतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. इमारतीच्या सदस्यांनी सुद्धा झोपाळू सुरक्षा रक्षकांवर अधूनमधून नजर ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.