‘कहानी’ चित्रपटाला उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार Print

प्रतिनिधी
सुजय घोष दिग्दर्शित आणि विद्या बालन अभिनीत ‘कहानी’ या चित्रपटाला समीक्षकांकडून, प्रेक्षकांकडून पसंतीची पावती कधीच मिळाली आहे. यावर्षी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात अनेक विभागातील पुरस्कारांसाठी दावेदार मानल्या जाणाऱ्या ‘कहानी’ या चित्रपटाला नुकताच उत्कृष्ट पटकथेसाठी ‘साऊथ एशियन राईझिंग स्टार फिल्म अ‍ॅवॉर्डस’चा पुरस्कार मिळाला आहे. ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’, ‘दिल्ली बेली’, ‘विकी डोनर’ आणि ‘आल्मस ऑफ द ब्लाईंड हॉर्स’ या चित्रपटांना मागे टाकत ‘कहानी’ने हा पुरस्कार पटकाविला आहे. ‘कहानी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्याला जो प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे मी भारावून गेलो आहे. लोकांनी या चित्रपटावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे, अशी आनंदाची प्रतिक्रिया दिग्दर्शक सुजय घोष यांनी व्यक्त केली. तर लोकांना ‘कहानी’ चित्रपट भावला कारण त्याची कथा त्यांना आपलीशी वाटली.  असे मत या चित्रपटाचे निर्माते ‘पेन इंडिया प्रा. लिमिटेड’चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जयंतीलाल गाडा यांनी व्यक्त केले. व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्सने वितरित केलेल्या ‘कहानी’ या चित्रपटात विद्या बालनबरोबर नवाझुद्दिन सिद्दिकी, स्वस्ता चॅटर्जी, परमब्रत चॅटर्जी आणि इंद्रनील सेनगुप्ता यांच्या भूमिका आहेत.