विशेष गाडय़ांसाठी अनोखे रक्षाबंधन Print

प्रतिनिधी
पुण्याहून पाटण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे विशेष गाडय़ा सोडण्यात येत असून त्यासाठी प्रवाशांना वेगळ्या रक्षाबंधनाला सामोरे जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या वर्गाच्या भाडय़ात प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. पुण्याहून ९ नोव्हेंबर रोजी सुटणाऱ्या गाडीसाठी वेगळे आरक्षण नसून नियमित सुटणाऱ्या गाडीच्या प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांनाच त्या गाडीमध्ये प्राधान्याने आरक्षण देण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी सुटणाऱ्या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी १२ तास अगोदर रेल्वे स्थानकात जाऊन रांगेत उभे राहून आपले तिकीट फलाटावरील सुरक्षा रक्षकास दाखविल्यावर तो संबंधित प्रवाशाच्या हाती एक बॅण्ड बांधेल. गाडीत प्रवेश करताना प्रवाशाने हा बॅण्ड संबंधितास दाखविल्यावरच त्याला गाडीत प्रवेश देण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, मध्य रेल्वेचे पुणे येथील तिकीट तपासनीस या गाडय़ांसोबत थेट पाटण्यापर्यंत जाणार आहेत. त्यांच्यासोबत रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही जाणार आहेत. दुसऱ्या वर्गाच्या भाडय़ात प्रवाशांना प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास करण्याची संधी मिळणार असून या प्रवाशांना वाटेत तिकीट तपासनीसांनी विनातिकीट प्रवासी म्हणून दंड करू नये यासाठी हे तपासनीस आणि सुरक्षा रक्षक पाटण्यापर्यंत जातील, असे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.