हलाव पूल वर्षअखेपर्यंत पूर्ण होणार Print

प्रतिनिधी
कुर्ला पश्चिमेकडील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असललेला हलाव पूल वर्षअखेपर्यंत बांधून पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुर्ला पश्चिमेकडील ताकियावाड, संभाजी चौक आदी परिसरांतील वाहनांना न्यू मिलमार्गे लालबहादूर शास्त्री मार्गापर्यंत जाणे सुकर होणार आहे.
  कुर्ला पश्चिमेस रेल्वेस्थानकाजवळ असलेला ब्रिटिश कालीन हलाव पूल सुमारे शंभर वर्षे जुना होता. शिवाय वाढत्या वाहनांच्या गर्दीमुळे तो अपुरा पडत होता. त्याची लांबी व रूंदी वाढवण्यासाठी नवीन पूल बांधण्याच्या दृष्टीने मागील वर्षी हा दगडी पूल तोडण्यात आला. काँक्रिटचा पूल बांधण्याचे काम ‘एमएमआरडीए’तर्फे हाती घेण्यात आले. आता ४८.५ मीटर लांबीचा आणि ११.४ मीटर रूंदीचा पूल बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुमारे नऊ कोटी ८० लाख रुपयांचा खर्च होणार आहे. नवीन पुलामुळे लांबी वाढल्याने पुला खालच्या रस्त्याची रूंदी वाढली आणि कुर्ला पश्चिम स्थानकाकडे येणाऱ्या व तेथून जाणाऱ्या बस, रिक्षा आदी वाहनांसाठी मोठा रस्ता उपलब्ध झाला आहे. तेथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली.
कुल्र्यातील तकियावाड, संभाजी चौक, शिवाजी चौक आदी भागांतील सुमारे १६०० घरगुती आणि ६५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक दशकानुदशके हलावपूल मार्गे जाते. त्यामुळे या मिरवणुकांचा ताण लालबहादूर शास्त्री मार्गावर येत नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आणि नंतर नवरात्रोत्सवात हलाव पुलावर पोलादी पत्रे टाकून हलाव पूल तात्पुरता उपलब्ध करून देण्यात आला होता.
आधीच्या नियोजनाप्रमाणे ऑक्टोबरअखेपर्यंत या पुलाचे काम संपणार होते, पण गणेशोत्सव आणि नंतर नवरात्रोत्सावाच्या मिरवणुकींसाठी हा पूल तात्पुरता उपलब्ध करून देण्यात आल्याने अंतिम टप्प्यातील बांधकामास थोडा विलंब होत आहे. आता पोलादी पत्रे जोडण्यासाठी केलेले वेल्डिंग काढण्यात आले असून पुलाच्या पृष्ठभागाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू होत आहे. डिसेंबर २०१२ अखेपर्यंत हे काम संपेल व नवीन वर्षांच्या आरंभीच हलाव पूल लोकांसाठी खुला होईल, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.