‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : भूगोलावरील नमुना प्रश्न Print

डॉ. अमर जगताप ,बुधवार, २५ एप्रिल २०१२
प्राध्यापक : द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, आजपर्यंत आपण भूगोलाच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप, त्यासाठी वाचावयाची संदर्भ पुस्तके आणि अभ्यासाची रणनीती याविषयी चर्चा केली आहे. आजच्या भूगोलासंबंधीच्या शेवटच्या लेखामध्ये आयोगाच्या प्रश्नांचे   संभाव्य स्वरूप कसे असेल याविषयी चर्चा करणार आहोत. वस्तुत: आयोगाच्या पूर्व परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या घटकात विचारले जाणारे भूगोलाचे प्रश्न हे पूर्णत: वस्तुनिष्ठ स्वरूपाचेच असतात. नव्या मुख्य परीक्षेमध्ये मात्र प्रश्नांचे स्वरूप वस्तुनिष्ठ, नकाशावर आधारित आणि चालू घडामोडींवर आधारित असेल. या लेखामध्ये आपण अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकावरील काही नमुना प्रश्न व त्यांचे स्वरूप अभ्यासणार आहोत.
प्रश्न क्र. १ - भारतातील पुढील मुख्य भूरूपांची त्यांच्या निर्मितीच्या क्रमानुसार मांडणी करा. (१) हिमालय पर्वत (२) द्विपकल्पीय पठार (३) पठारी नद्या (४) द्विपकल्पीय नद्या. या प्रश्नामध्ये भारतीय उपखंडाची उत्क्रांती व प्रमुख प्राकृतिक विभाग या घटकांचे सखोल ज्ञान तपासण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात अभ्यासक्रमामधील सर्व घटकांचा सर्वागीण अभ्यास आवश्यक आहे.
प्रश्न क्र. २ - पुढील विधाने वाचा व त्याखालील योग्य पर्याय निवडा. (१) भारतातील खनिज तेलाची सर्वात पहिली विहीर आसाममध्ये दिग्बोई येथे चालू झाली होती. (२) सद्य:स्थितीत एकूण देशांतर्गत उत्पादनापैकी ६५% खनिज तेलाचे उत्पादन ‘मुंबई हाय’ या तेल विहिरीमधून होते. पर्याय - (अ) दोन्ही विधाने बरोबर आहेत. (ब) दोन्ही विधाने चूक आहेत. (क) विधान १ बरोबर आहे. (ड) विधान २ बरोबर आहे. आर्थिक भूगोलातील हा प्रश्न वस्तुनिष्ठ माहितीवर आधारित आहे; मात्र त्याची मांडणी अशा पद्धतीने करण्यात आली आहे की अचूक उत्तरासाठी वस्तुनिष्ठ माहितीचा तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे.
प्रश्न क्र. ३ - पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. (१) २००१ च्या जगनणनेनुसार नागरीकरणामध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर होते. (२) २०११ च्या जनगणनेनुसार नागरीकरणामध्ये केरळ राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. पर्याय - (अ) दोन्ही विधाने बरोबर आहेत. (ब) दोन्ही विधाने चूक आहेत. (क) विधान १ बरोबर आहे. (ड) विधान २ बरोबर आहे. या प्रश्नामध्ये देखील वस्तुनिष्ठ माहिती तुलनात्मक स्वरूपात विचारण्यात आली आहे.
प्रश्न क्र. ४ - पुढे काही जोडय़ा जुळवून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी बरोबर जुळवलेल्या जोडय़ा ओळखा. (१) क्योटो करार - जागतिक तापमान वाढ. (२) मॉन्ट्रीयल करार - पाणथळ भूमी संवर्धन (३) रामसर करार - ओझोन वायूच्या थराचे संवर्धन. पर्याय - (अ) फक्त १ बरोबर (ब) १ व २ बरोबर (क) १, २ व ३ बरोबर (ड) फक्त ३ बरोबर.  पर्यावरणासंदर्भातील चालू घडामोडीवर आधारित असलेला हा प्रश्न विद्यार्थ्यांचे चालू घडामोडीचे ज्ञान तपासणारा आहे.
प्रश्न क्र. ५ - महाराष्ट्रातील अनियोजित नागरीकरण व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या यामागे पुढीलपैकी कोणती बाब सर्वाधिक कारणीभूत आहे? पर्याय - (अ) दारिद्रय़ (ब) साक्षरतेचा अभाव (क) वाहतुकीच्या सोईंचा अभाव (ड) प्रादेशिक असमतोल. हा प्रश्न पूर्णत: विश्लेषणात्मक स्वरूपाचा आहे. या प्रश्नामध्ये नागरिकरणाची कारणे व समस्या या संकल्पनेचा अभ्यास किती नेमका झालेला आहे यास महत्त्व आहे.
प्रश्न क्र. ६ - दूरसंवेदनासाठी भारताच्या इस्रो संस्थेद्वारे कोणता उपग्रह सोडला जातो? पर्याय - (अ)IRS (ब) INSAT  (क) GSLV   ड) PSLV . या घटकामध्ये जास्तीत जास्त प्रश्न चालू घडामोडींवर विचारले जातील. त्यामुळे चालू घडामोडींची सर्वसमावेशक माहिती गोळा करणे आवश्यक आहे.
प्रश्न क्र. ७ - पुढीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जाते? पर्याय - (अ) मध्य प्रदेश (ब) पंजाब (क) महाराष्ट्र (ड) केरळ.  या प्रकारच्या प्रश्नामध्ये नकाशाचे ज्ञान आवश्यक आहे. त्यामुळे नकाशाची (जग, भारत, महाराष्ट्र) प्रभावीपणे तयारी करणे आवश्यक आहे.
प्रश्न क्र. ८ - भारतीय मान्सून संदर्भात पुढील विधाने वाचा आणि त्यापैकी बरोबर विधाने कोणती ते शोधा. (१) एडमंड हॅले यांच्या मते भारतीय मान्सून हा खारे वारे व मतलई वारे यांची विस्तारित आवृत्ती आहे. (२) ला निना सागर प्रवाह भारतीय मान्सूनवर विपरीत परिणाम करतो.  पर्याय - (अ) दोन्ही विधाने बरोबर (ब) दोन्ही विधाने चूक  (क) विधान 1 बरोबर (ड) विधान २ बरोबर. मान्सूनसंबंधी सर्व बाबींचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.
प्रश्न क्र. ९ - ‘गॅब्रीयन पद्धतीच्या बांधाची उपयुक्तता पुढीलपैकी कोणत्या प्रदेशात आहे? पर्याय - (अ) मंद उताराचा प्रदेश (ब) मध्यम उताराचा प्रदेश (क) तीव्र उताराचा प्रदेश (ड) सपाट मैदानी प्रदेश या प्रकारच्या प्रश्नामध्ये तांत्रिक स्वरूपाचे ज्ञान आवश्यक आहे. थोडक्यात अभ्यास करताना तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करू नये.
प्रश्न क्र. १० - ठिबक सिंचन व तुषार सिंचन या जलसिंचनाच्या पद्धतीद्वारे किती टक्केपाण्याची बचत होते? पर्याय - (अ) २०-३०% (ब) २७-३५% (क) ४०-५२% (ड) ५०-६०% हा प्रश्न आकडेवारीवर आधारित आहे. अद्ययावत आकडेवारीसाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, शासनाची प्रकाशने यांच्यावर अवलंबून राहावे.
थोडक्यात विद्यार्थ्यांनी प्रत्येक घटकाचा सर्वागीण अभ्यास करावा. विविध संकल्पना, मुद्दे; त्यांचे स्वरूप व वैशिष्टय़े; त्यासंबंधी विविध स्वरूपाची वस्तुनिष्ठ माहिती; त्याविषयक संशोधन आणि तज्ज्ञांची मते आणि त्याविषयी अलीकडील काळात घडलेल्या चालू घडामोडी इ. विविध आयामांविषयी जाणून घेण्यावर भर द्यावा. त्यासंदर्भातील माहिती वर्गीकृत करून तिचे तुलनात्मक आकलन करावे. नवी मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची झालेली असली, तरी त्यात विद्यार्थ्यांच्या आकलन, विश्लेषण क्षमतेची कसोटी लागणार यात शंका नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांनी अत्यंत जागरूकपणे अभ्यास करण्यावर भर द्यावा.
बेस्ट ऑफ लक !
इमेजवर क्लिक करा.