‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - मुलाखतीची संकल्पना Print

तुकाराम जाधव - बुधवार, ६ जून २०१२
संचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मुलाखत अर्थात व्यक्तिमत्त्व चाचणीत अधिक गुण मिळविण्यासाठी प्रथमत:  तिचा नेमका अर्थ लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुलाखतीस व्यक्तिमत्त्व चाचणी असे संबोधले आहे. म्हणूनच मुलाखतीचा अर्थ उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व संबंधित पदासाठी सक्षम आहे किंवा नाही याची तपासणी करणे होय. व्यक्तिमत्त्वाची सर्व अंगे मुलाखतीमध्ये विचारात घेतली जातात. कार्यक्षम व निष्पक्ष निरीक्षकांमार्फत लोकसेवेमधील कार्यसंधीसाठी उमेदवारांची व्यक्तिगत सुयोग्यता जोखणे हा मुलाखतीमागील मुख्य उद्देश आहे. यासाठीच्या चाचणीमागील हेतू उमेदवारांची मानसिक क्षमता तोलणे हा आहे. व्यापक अर्थाने हे फक्त त्याची बौद्धिक गुणवैशिष्टय़ांची पडताळणी करणे नसून त्याचबरोबर त्याचा सामाजिक कल व वर्तमान घडामोडीमधील त्याचा रस या संबंधातील पडताळणी करणेदेखील आहे. उमेदवार प्रत्येक गोष्टीबद्दल अवगत वा त्याला प्रत्येक गोष्टीची खडा न् खडा माहिती आहे की नाही, यात मुलाखत मंडळाला रस नसतो. उलटपक्षी एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसल्यास वा एखाद्या प्रश्नाचे उत्तर देता येत नसल्यास, तसे सांगण्याची त्याच्यातील प्रामाणिक धमक मुलाखत मंडळाला अभिप्रेत असते. या स्पष्टतेची चाचणी मुलाखतीदरम्यान घेतली जाते.
मुलाखत मंडळातील अनोळखी सभासदांसमोर तुम्ही किती सहजपणे वागू शकता आणि स्वत:ला किती आत्मविश्वासपूर्वक सादर करू शकता याची चाचणी मुलाखती दरम्यान होत असते. तुमच्या सभोवती घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांबाबत तुम्हाला माहिती आहे का? जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांमधील विविधांगी वास्तवाशी तुम्ही किती परिचित आहात? या घडणाऱ्या घटनांसंबंधी तुम्हाला मत आहे का? त्याचे स्वरूप काय? या माहितीच्या आधारावर तुमची सर्वसाधारण जाणीव कशी आहे हे मुलाखती दरम्यान बघितले जाते. एकंदर उमेदवाराची स्पष्ट व तार्किक विचार करण्याची क्षमता, मत व्यक्त करण्यातील समतोल, आवडीच्या गोष्टीमधील सखोलता आणि महत्त्वपूर्ण विषयांसंदर्भातील ज्ञान याबरोबरच त्याचा आत्मविश्वास, निर्णयक्षमता, आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्याची क्षमता इ. गुणवैशिष्टय़े तपासली जातात.
एमपीएससीची मुलाखत ही नुसती तुमच्या ज्ञानाचा आवाका मोजण्यासाठी ठेवलेली औपचारिक बोलचाल नसते. ही तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची चाचणी असते. तुमचे विषयासंबंधीचे ज्ञान हे मुख्य परीक्षेतील पेपरमध्ये दिसून आलेले असते म्हणूनच तुम्हाला मुलाखतीस बोलावलेले असते. येथे तुम्हालाच स्वत:ची ओळख आहे की नाही हे तपासण्यासाठी बोलावलेले असते. कारण मुलाखत म्हणजे तुमच्या सुज्ञतेची परीक्षा होय (A test of your wisdom) माहिती-विश्लेषण-ज्ञान-व्यवहार उपयोगाची क्षमता म्हणजे सुज्ञता होय. तुम्ही जसे आहात तसे स्वत:ला सादर करण्याचा १०० टक्के प्रयत्न म्हणजे मुलाखत होय. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटल्याप्रमाणे ''Oh god let me not present myself wrongly to the world and set it against me.' असे मुलाखतीमध्ये उमेदवाराने स्वत:ला सादर करावे लागते.  
मुलाखतीमध्ये तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, तुमचे प्रसंगावधान / हजरजबाबीपणा / समयसूचकता, तुमची निर्णयक्षमता, सामाजिक जाण व बांधीलकी, तुमचे नेतृत्वगुण, सचोटी, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी, जिद्द, लढाऊ वृत्ती, चिकाटी, तुमची प्रयत्नवादी वृत्ती व संभाषणकौशल्य इ. गोष्टी तपासल्या जातात. मुलाखतीसाठी आलेला उमेदवार काय सांगतो, याबरोबरच कसे सांगतो यासही महत्त्व आहे. म्हणजेच आशय अभिव्यक्ती मुलाखत होय.
एमपीएससीच्या मुलाखतीसाठी २०० गुण ठेवले आहेत. हे २०० गुण एखाद्यास स्पर्धेबाहेरही करू शकतात अथवा आतही घेऊ शकतात. एखाद्यास वर्ग १चे पद मिळेल की वर्ग २चे हेसुद्धा पुष्कळ वेळा या मुलाखतीतील गुणांवरच ठरत असते. त्यामुळे स्वत:ची जागा अंतिम यादीमध्ये आरक्षित करावयाची असेल तर या २०० गुणांवर नजर ठेवलीच पाहिजे.
मुलाखत मंडळ
मुलाखतीसाठी मुलाखत मंडळामध्ये आयोगाचे अध्यक्ष/ज्येष्ठ सदस्य + वरिष्ठ अधिकारी (पोलीस/इतर खाती)/सनदी अधिकारी (मंत्रालय) असतात. मुलाखतीविषयी विद्यार्थ्यांमध्ये पुष्कळ पूर्वग्रह दिसून येतात. ते असे; (१) उत्तम शैक्षणिक आलेख असल्यासच चांगले गुण मिळतात. (२) सूट-टायसह गेल्यासच चांगले गुण मिळतात. (३) मुलाखतीसाठी वशिला लावावा लागतो. अशा एक ना अनेक शंका-कुशंका स्पर्धकांच्या मनात घर करून असतात. म्हणूनच कोणत्याही पूर्वग्रहांशिवाय जाणे हा गुण मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मुलाखत मंडळे ही कोणाशीही पूर्वग्रहाने वागत नसतात. कारण त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक स्पर्धक असता. मात्र मुलाखत घेणारे इतके अनुभवी असतात की त्यांना तुमचे व्यक्तिमत्त्व सहज समजून येत असते.
‘मुलाखत’ याचा शब्दश: अर्थ म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व समोरासमोर खुले करणे. मुलाखतीमध्ये विषयातील ज्ञानाऐवजी उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेतली जाते. व्यक्तिमत्त्वाची सर्व अंगे मुलाखतीमध्ये विचारात घेतली जातात. मुलाखतीद्वारे उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मुलाखतीचा नेमका अभ्यास करताना स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक पैलू सादर करणे आवश्यक ठरते. दुर्दैवाने संभाषणकौशल्य व आत्मविश्वासाचा अभाव असल्याने मुलाखतीला सामोरे जाताना मनात न्यूनगंड निर्माण होतो. परिणामी 'Defeat before starting first bullet'  याप्रमाणे लढाईला सामोरे जाण्यापूर्वीच आपण आपले अपयश अधोरेखित केलेले असते. खरेतर स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आपल्याशिवाय इतर कोणालाही असणे शक्य नाही. त्यामुळे स्वत:ची ओळख सिद्ध करण्यासाठी मुलाखतीद्वारे आपणास सुवर्णसंधी प्राप्त होते.
वाचण्यासाठी इमेजवर क्लिक करा.