मोजुनी माराव्या पैजारा Print

अमृता गणेश खंडेराव - सोमवार, ११ जून २०१२

नव्याने नेट/सेट पास झालेल्या नवोदित प्राध्यापकाला जेव्हा त्यांच्यापेक्षा अधिक लाभांश मिळताना दिसू लागले, तेव्हा या प्रस्थापित गुरुजनांचा सेवाज्येष्ठतेचा अहंकार उफाळून आला. त्या क्रोधाग्नीतून वारंवार आंदोलने आणि शेवटी हा बहिष्कार घडला.नुकताच नेट-सेटग्रस्त प्राध्यापकांचा दीर्घकालीन बहिष्कार संपला. अनेक  वर्षांपासून रखडत पडलेल्या त्यांच्या मागण्या शासनाने लेखी मान्य केल्या. आता मोठय़ा जोमाने प्राध्यापकदळ पेपर तपासणीच्या कामावर तुटून पडले आहे.

विद्यापीठांच्या मूल्यांकन विभागात ‘न भूतो, न भविष्यती’ गर्दी झाली आहे. ‘जरा सरकून घ्या’ म्हणत गुरुजन रक्तवर्णी लेखण्या सरसावून आपापले गठ्ठे घेऊन बसले आहेत. मूल्यांकनाचे कार्य मोठय़ा आनंदात आणि उत्साहात सुरू झाले आहे. लग्नाच्या दर वाढदिवासाला मागणी करून थकल्यानंतर लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाला नवऱ्याने पदरावर मोर नाचणारी पैठणी भेट दिल्यावर जसे ऐन म्हातारपणाच्या उंबरठय़ावर बाईला ऐन पंचविशीत असल्यासारखं वाटावं तशी अ‍ॅरिअर्सची थकबाकी मंजूर झालेल्या प्राध्यापकांची अवस्था झाली आहे. नव्या नवलाईने ते पैशांबद्दल स्वप्नं पाहू लागले आहेत.
पण इथे मूळ मुद्दा आहे हे सगळं व्हायची वेळ का आली? नवऱ्याने पंचविशीतच पैठणी का नेसवली नाही? विद्यापीठ अनुदान आयोगाने नेट/सेट परीक्षा अनिवार्य केल्या त्या काही काल-परवा नव्हे. प्राध्यापक पदासाठी नेट/सेट अनिवार्य केल्यानंतर जे अध्यापनसेवेत होते त्यांना एका विशिष्ट जी.आर.द्वारा ही माहिती कळवली गेली होती. गेल्या कित्येक वर्षांत त्या महानुभावांना नेट/सेट पर्वत ओलांडता आला नाही. वर्षांमागून वर्षे गेली आणि त्यांच्या डोक्यावर ही टांगती तलवार लटकत राहिली. सेवाज्येष्ठता असूनसुद्धा नेट/सेटवरून उडय़ा न मारता आल्यामुळे त्यांना सेवेतल्या अनेक लाभांपासून वंचित राहावे लागले. नव्याने नेट/सेट पास झालेल्या नवोदित प्राध्यापकाला जेव्हा त्यांच्यापेक्षा अधिक लाभांश मिळताना दिसू लागले, तेव्हा या प्रस्थापित गुरुजनांचा सेवाज्येष्ठतेचा अहंकार उफाळून आला. त्या क्रोधाग्नीतून वारंवार आंदोलने आणि शेवटी हा बहिष्कार घडला.
मुळात पदव्युत्तर शिक्षण घेऊन एखाद्या विषयात पारंगत झाल्याशिवाय, त्यातही उच्च श्रेणी असल्याशिवाय कुणाही ऐऱ्या-गैऱ्याची प्राध्यापक या पदावर नियुक्ती होत नसते. एखाद्या विषयात उच्च श्रेणीत पारंगत पदवी प्राप्त केल्यानंतर आणि वर्षांनुवर्षे अध्यापनाचे कार्य करूनसुद्धा त्याच विषयातली एक परीक्षा उत्तीर्ण होता येत नसेल तर तमाम प्राध्यापकांसाठी ही मोठी नामुष्कीची आणि शरमेची गोष्ट आहे. ज्या देशाला गुरुशिष्य परंपरेचा महान वारसा लाभलेला आहे, ज्या देशात शिक्षकदिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांने दिलेली साधी सुपारी शिक्षक देवघरात स्थापित करतात, त्या मातीत असली मातीमोल परंपरा उदयाला यावी, हीच मोठी लाजिरवाणी बाब आहे.
तुम्ही एखाद्या विषयात पारंगत होता म्हणजे काय करता? परीक्षेपुरता अभ्यास करून उत्तीर्ण होणाऱ्याला पारंगत म्हणत नाहीत. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करणे, त्या विषय कौशल्यांमध्ये कुशल होणे, त्या विषयावरचे प्राचीन ते अर्वाचीन ज्ञान प्राप्त करून घेणे. त्या विषयात येणाऱ्या अद्ययावत ज्ञानाबद्दल, नवनव्या प्रवाहांबद्दल सदैव जागरूक राहणे म्हणजे पारंगतता. आपल्या समाजात शिक्षकी पेशाला अजूनही सन्मान दिला जातो. प्राध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्रात काम करणारा ज्ञानयोगी, ज्ञानतपस्वी! शिक्षणमहर्षी हा शब्द आता अर्थभ्रष्ट झाला आहे, पण गुरुजनांना आजही आदराने वंदन केले जाते. ‘सर्व समाज स्वार्थी झाला आहे, भ्रष्टाचाराने किडला आहे, तर मग आम्ही शिक्षकांनीच काय घोडं मारलं आहे..’ कृपा करून शिक्षकांनी असं विधान करू नये.
गुरू म्हणजे मार्गदर्शक, वाटाडय़ा, ज्ञानी! गुरू साक्षात परब्रह्म! सेवेत कार्यरत असताना तो अक्षरश: हजारो विद्यार्थ्यांचा ज्ञानविधाता असतो. परीक्षार्थी विद्यार्थी निर्माण करायचे की अभ्यासू, जिज्ञासू, विवेकपूर्ण पिढी निर्माण होण्यासाठी प्रेरणा द्यायची हे आजही सर्वस्वी त्याच्या हातात आहे. गुरू प्रेरणास्रोत आहे. तो ऊर्जास्रोत आहे. त्याने त्याची बांधिलकी कदापि विसरता कामा नये. जो स्वत:च एक परीक्षा उत्तीर्ण व्हायला लायक नाही त्याने विद्यार्थ्यांना काय शिकवावे? आणि विद्यार्थ्यांनी त्याच्याकडून काय शिकावे? क्षेत्र कुठलेही असो गुरूचे महत्त्व कधीच कमी होत नसते.
आज यू.जी.सी.च्या नियमावलीनुसार प्राध्यापकांना संशोधनात कार्य करणे अनिवार्य आहे. त्यांना विविध सेमिनार्समधून पेपर रीडिंग करणे अनिवार्य केले आहे. हे पेपर सादर केल्यानंतर त्यांना त्यांच्या सेवेत अधिक गुण प्राप्त होतात. विशिष्ट प्रमाणात गुण प्राप्त केल्याशिवाय त्यांचे इन्क्रिमेंट्स लागू होत नाहीत. मग प्राध्यापक काय करतात? जिज्ञासूंनी एकवेळा हे सेमिनार आयोजित करणाऱ्या महाविद्यालयांनी एकत्रितपणे छापलेले शोधनिबंध उत्सुकता म्हणून वाचून पाहावेत. म्हणजे गुरुजन किती अभ्यासू आहेत हे तातडीने समजेल. पेपर सादर केल्यावर अमुक एक सेवागुण मिळतात म्हटल्यावर अनेक प्राध्यापक नेटाने इंटरनेटवर बसतात. गुगलून-उगलून माहित्या जमवितात. त्या केबलप्राप्त ज्ञानाची संकलित प्रत म्हणजे त्यांचा स्वयंसिद्ध पेपर असतो. कुठल्याही प्रकारचे अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि विवेचन त्यात आढळून येत नाही. संशोधन करण्यासाठी उपजत वृत्ती असावी लागते. एखाद्या विषयाची जन्मजात आवड आणि वेड असावे लागते. मग संशोधन करण्यासाठी गो. नी. दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे उन्हातान्हात, उपाशी-तापाशी गड-दुर्ग धुंडाळत फिरतात. ना त्यांना दुसऱ्याने प्रेरणा देण्याची गरज असते; ना त्यांना यूजीसीच्या स्पॉन्सरशिपची गरज वाटते. एखादा संशोधक शुद्ध विसरून, बाडं धुंडाळत, गावोगाव धांडोळा घेत राहतो. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे समाजाचे आर्थिक, मानसिक, वैचारिक, सामाजिक, अभिसरण लक्षात घेऊन एखाद्या विषयावर चिंतन करून नवा विचार मांडणे. आपण राहत आहोत त्या समाजाला नवी दिशा देणे. बदलत्या काळानुसार बदलणाऱ्या सामाजिक गरजा लक्षात घेऊन समाजाला योग्य ते दिशादर्शन करणे.
पूर्वार्ध..

वाचण्यासाठी इमेजवर क्लिक करा.