मोजुनी माराव्या पैजारा Print

अमृता गणेश खंडेराव, मंगळवार, १२ जून २०१२
ही सगळी गुणवैशिष्टय़े शिक्षणातून विकसित व्हावी असे मूलभूत शैक्षणिक  उद्दिष्ट असते. एखाद्या व्यक्तीने एखाद्या विषयावर डॉक्टरेट करणे म्हणजे उच्च शिक्षणाचे टोक गाठणे, पण प्रत्यक्षात पाहायला जावे तर साधे पायाभूत सामाजिक निकषही ही डॉक्टरेट झालेली मंडळी अनेकदा पाळताना दिसत नाहीत. मॅस्लोच्या वर्चस्वश्रेणी सिद्धांतानुसार मूलभूत जैविक गरजा पूर्ण झाल्यानंतर व्यक्ती आत्मसन्मान, आत्मसंयोजन.. अशी वर-वर चढत आत्मिक पातळीवरील उच्च गुणांपर्यंत पोहोचते.

गौतम बुद्धाने याच भूमीत ते करून दाखविले आहे. त्याला आपण ‘ज्ञानप्राप्ती’ असाच शब्द वापरतो. अत्युच्च आध्यात्मिक पातळीचे शिखर टोक गाठल्यानंतर मानवाची सामाजिक बांधीलकीची जाणीव किती विस्तृत आणि विशाल होते याचे चालते-बोलते उदाहरण गौतम बुद्धांनी घालून दिले आहे. ‘जो जे वांच्छील तो ते लाहो’ अशी वैश्विक प्रार्थना तेराव्या शतकातच करणारे संत ज्ञानेश्वरही इथेच होऊन गेले. अशा वृत्तीला संशोधक वृत्ती, चिकित्सक वृत्ती म्हणतात.
या साइटवरून त्या साइटवर उडय़ा मारून, धावाधाव करून लिहिलेले प्रबंध म्हणजे चिकित्सक वृत्तीचा विकास नसून फक्त न वाहत्या पाण्यात कागदी नावा सोडणे आहे. असल्या कागदोपत्री गुणवत्तेच्या आधारावर शिक्षकांचे मूल्यमापन होणार असेल तर आपल्या संपूर्ण शिक्षणपद्धतीचा मुळापासून पुनर्विचार व्हायला हवा. असले जबरदस्तीने शोधनिबंध आणि प्रबंध लिहवून घेऊन कुणाचीही गुणवत्ता वाढत नसते किंवा कुठलीही उच्च शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होत नसतात, असे मला नम्रपणे यूजीसीच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे.
अध्ययन आणि अध्यापनाचे कार्य, ज्ञानदान आणि संपूर्ण मानवी जीवनाचा विकास (कमीत कमी व्यक्तिमत्त्वाचा तरी विकास) अशा उच्च पातळीवर व्हायचे असेल तर असले छापेबाज आणि ठोकळेबाज निकष त्वरित बदलले पाहिजेत. ज्या शिक्षकाला ज्या विषयात रस आहे तो कुणाचीही वाट न बघता त्या विषयात घुसणार आहे. तळापर्यंत बुडय़ा मारणार आहे. नाका-तोंडात पाणी शिरले तरी खरी ज्ञानलालसा कधीही नष्ट होत नसते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या आवडीच्या विषयात निष्ठेने काम करणाऱ्यांची कमी नाही.
‘ अशी सच्ची ज्ञानलालसा विद्यार्थ्यांमध्ये उत्पन्न करणे’ हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. पदव्यांची कागदी भेंडोळी जमवणे म्हणजे शिक्षण नव्हे. अशी ज्ञानतृष्णा असणारे शिक्षक तयार होणे हे शिक्षणप्रणालीचे मूळ उद्दिष्ट असले पाहिजे. हे जबरदस्तीचे, समाजासाठी संपूर्ण निरुपयोगी संशोधक घडवण्याचे कार्य विद्यापीठांनी बंद करावे. जरासेही सामाजिक भान नसलेले उच्चशिक्षित म्हणजे ओरिगामीतल्या फुलांसारखे फुसके आणि पोकळ पुष्पगुच्छ आहेत. ना त्यांना त्यागाचा सुगंध आहे ना काही सत्कार्याचे वजन त्यांच्या ठायी आढळते.
अनेक डॉक्टरेट प्राप्त केलेले विद्वान समाजात असे वागताना दिसतात की, त्यांच्या शिक्षणाबद्दल शंका घ्यावी. मराठीत पीएच. डी. केली आहे, पण मराठी शुद्धलेखन करता येत नाही. बाणाचा ‘ण’ आणि नळाचा ‘न’ कुठे वापरायचा माहीत नाही. लिखाणही अशुद्ध आणि उच्चारही अशुद्ध. एखाद्या मराठीच्या प्राध्यापकाकडून साधी शुद्ध नागर मराठीची अपेक्षा विद्यार्थ्यांनी ठेवू नये का?
अनेक उच्चविद्याविभूषित व्यक्तींना घरात स्वत:च्या बायकोशी कसं वागावं एवढीसुद्धा अक्कल नसते. आपली पत्नी म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असून, तिला तिचे स्वत:चे विचार आहेत याची साधी जाणीवसुद्धा या महात्म्यांमध्ये नसते. अत्यंत उद्धट आणि अहंकारी भाषेत हे घरातल्या स्त्रीशी बोलत असतात. असल्या विवेकहीन, संस्कारहीन माणसांकडून कशी पिढी घडवली जाणार आहे अशी समाजाने अपेक्षा ठेवावी? असल्या तकलादू पदव्या आणि असले कचकडय़ांचे ज्ञानवंत!  वृक्ष फळांनी बहरतो तेव्हा खाली झुकतो. गोड, रसाळ फळांचे वजन फांद्यांना झुकवते. ते अशासाठी की, जमिनीच्या गर्भातून वर्षांनुवर्ष शोषून घेतलेलं हे मधुर अमृत आता दुसऱ्याला देण्याची वेळ आली आहे. ही परिपक्व फळं आता इतरांना सहजपणे तोडता यावीत, त्यांची क्षुधा शांत व्हावी, तृष्णेची तृप्ती व्हावी आणि त्या निमित्ताने पांथस्थाने थंडगार सावलीला बसावे. विश्रांती घ्यावी. दुसऱ्याचा थकवा दूर व्हावा, चालणाऱ्याला दुप्पट प्रेरणा मिळावी, त्याचा उत्साह वाढावा.
आजच्या काळातले हे ज्ञानतपस्वी महावृक्ष. त्यांच्या अंगावर ज्ञानाची फक्त झूल चढवली आहे. ज्ञानप्राप्तीनंतर फळांच्या वजनाने वाकून ते नम्र होताना दिसत नाहीत. कारण ज्ञानप्राप्तीच पोकळ आहे आणि फळं नकली, चायनामेड प्लॅस्टिकची! यांच्यापासून कुणाला ज्ञानामृत मिळावे? कुणाची ज्ञानक्षुधा तृप्त व्हावी? आणि कुणा बिचाऱ्याला प्रेरणा मिळावी?
ज्ञानप्राप्तीनंतर गौतमाचा बुद्ध होतो. ज्ञानेश्वराची ज्ञानाई माऊली होते. हा बुद्ध. तथागत! करुणेचा महासागर! जवळ आलेल्या प्रत्येकाला जगण्याची सोपी वाट दाखवतो. हा ज्ञानिया खळांची ‘व्यंकटी’ वाईट बुद्धी सांडून जावी म्हणून कळकळीची, आर्त प्रार्थना गातो.
शिक्षण क्षेत्रातले अत्युच्च टोक गाठल्यानंतर मनुष्यात कसलेही परिवर्तन होत नसेल, कसलाही अपेक्षित वर्तनबदल दिसत नसेल तर या शिक्षणप्रणीलीतच काही मूलभूत दोष असले पाहिजेत. उच्च शिक्षणाचे प्रॉडक्ट असे विवेकहीन आणि हीन दर्जाचे उत्पन्न होत असेल तर सर्व व्यवस्था मुळापासून तपासून काढायला हवी.
पदरमोड करून यूजीसी घेत असलेले शोधनिबंध-कारखाने घेण्यापूर्वी यूजीसीने एकदा पुनर्विचार करावा. घाऊक भावाने विद्वान बनवणाऱ्या विद्यापीठांनी आपल्या सर्वच प्रणाली एकदा दुरुस्त करून घ्याव्यात. होय! कारण त्या बिघडल्या आहेत. शिक्षण समाजोपयोगी तर असलेच पाहिजे पण त्यातून निर्माण होणारे संशोधक आणि संशोधनसुद्धा सामाजिक बांधीलकी मानणारे असले पाहिजे. मानवता आणि संपूर्ण वैचारिक स्वातंत्र्य हे शिक्षणाचे अंतिम ध्येय असले पाहिजे.
आपली पात्रता सिद्ध करता येत नाही म्हणून मूल्यांकनावर बहिष्कार टाकणाऱ्या तमाम प्राध्यापकवर्गाला माझा प्रश्न आहे की, तुमचा बिघडलेला कॉम्प्युटर किंवा टी. व्ही. एखाद्या तंत्रज्ञाला दुरुस्त करता येत नसेल तर तुम्ही त्याच्या हातात द्याल काय? अकुशल कारागिराकडून तुमचा संगणक बिघडला तर तुम्हाला चालेल काय? तुमची निर्जीव साधने दुरुस्त करण्याकरिता तुम्हाला कुशल तंत्रज्ञ पाहिजे. तरच तुम्ही त्याला पूर्ण मोबदला द्याल.
मग कुठल्या हक्काने आमच्या देशाची जिवंत पिढी तुमच्यासारख्या अकुशल (साधी एक परीक्षा पास न होऊ शकणाऱ्या) शिक्षकाच्या हातात आम्ही द्यावी? कुठल्या तोंडाने तुम्ही तुमच्या सेवेचा संपूर्ण मोबदला मागत आहात? नेट/सेट न होता सेवेतले सर्व फायदे मागणाऱ्या तमाम प्राध्यापकांनी स्वत्वाची जराही लाज असेल तर माझ्या प्रश्नांचा विचार करावा. शासनाकडून आमच्या करातून/सामान्य माणसाच्या घामातून निर्माण झालेले पैसे घेताना एकाही शिक्षकाचा हात थरथरला तर माझा लेख सुफळ संपूर्ण झाला असं मी समजेन.
उत्तरार्थ..

वाचण्यासाठी इमेजवर क्लिक करा.