१० वी परीक्षा : तंत्र-मंत्राच्या पलीकडे Print

altशोभना भिडे , सोमवार, १८ जून २०१२
एएससी-१५, हर्ष अश्विननगर, सिडको, नाशिक-४२२००९
मार्च २०१२ मध्ये झालेल्या इयत्ता १० वीच्या सार्वत्रिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. विविध विभागीय मंडळांनी गेल्या वर्षीच्या तुलनेने आपल्या कामगिरीचा चढता आलेख दाखवला आहे. गुणवत्ता यादी नसली तरी गुणांच्या टक्केवारीत वरच्या गटात मुलींनी मारलेली बाजी, १०० टक्के व ० ते ३ टक्के निकाल लावणाऱ्या शाळा याविषयीच्या बातम्याही वर्तमानपत्रात येऊन गेल्या आहेत.

नवीन शैक्षणिक वर्षांची सुरुवात आहे. एप्रिल व जूनचे सुट्टीचे दिवस वापरून अनेक शाळांमध्ये दहावीचा अभ्यासक्रमही सुरू झाला आहे. या पाश्र्वभूमीवर या परीक्षा, त्याची तयारी, त्यांचं बदललेलं स्वरूप, त्याकडे पाहण्याचा शिक्षक- विद्यार्थी- पालक या त्रयीचा दृष्टिकोन याचा नव्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.
लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी २५ टक्के गुणांची अट हे गुण व अंतर्गत गुण यांचे योग्य गुणोत्तर असणे अनिवार्य, विज्ञान व गणित या विषयांचा बदललेला अभ्यासक्रम व या विषयांच्या प्रश्नपत्रिकेत उच्चस्तरीय मानसिक क्षमतांवर आधारित प्रश्नांचा समावेश ही या परीक्षेची वैशिष्टय़े म्हणावी लागतील. परीक्षेच्या अगोदर यातील प्रत्येक मुद्दय़ावर पालकांनी, शिक्षकांनी, शिक्षक संघटनांनी टीका, वाद, प्रश्न अशा (स्वागतशील?) प्रतिक्रिया दिल्या होत्या. यातील कशाचाही फारसा विपरीत परिणाम निकालावर झालेला दिसत नाही. नवीन बदल, त्यामागील भूमिका समजून घेणे व त्यानुसार तयारी करणे हाच पुढे नेणारा मार्ग आहे.
आपल्या शिक्षणपद्धतीत अभ्यासक्रम निवडीचा पर्याय ११ वीच्या स्तरावर खुला होतो. यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे समान पातळीवरून मूल्यमापन होण्याच्या गरजेतून ही परीक्षा घेतली जाते. या स्तरावर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तरी सार्वत्रिकीकरण व सरसकटीकरण या दोन मुद्दय़ांचे आव्हान प्रश्नपत्रिका तयार करताना उभे राहते हे सहज लक्षात येईल. या पुढील प्रत्येक टप्प्यावर स्पर्धा आहे. गुणवत्तेचे परीक्षण आहे. कोणत्याही क्षेत्रात अत्युच्च स्थान प्राप्त करायचे असेल तर तेथे जागा कमीच असणार आहे. याची काही प्रमाणात तयारी करून घ्यायची असेल तर घोटवून घेणे, रट्टा मारणे, पाठांतर यापेक्षाही समजून घेणे, वापरून बघणे, स्वत:ची कल्पनाशक्ती वापरून नावीन्यपूर्ण उकल शोधणे याला पर्याय नाही. मुलांमधील याच क्षमता शोधून काढण्यासाठी उपयोजन, विश्लेषण, मूल्यमापन व सर्जक विचार या उच्चस्तरीय मानसिक क्षमतांवर आधारित प्रश्नांचा समावेश सध्या विज्ञान व गणित या विषयांत व २०१४ पासून इतर विषयांतही केला जाणार आहे; अर्थात विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखण्याच्या मूल्यमापन पद्धतीमधील परीक्षा हे एक साधन आहे, एकमात्र नाही हे ध्यानात घ्यावे लागेल.
आजकाल प्रत्येक शहरातील काही विशिष्ट महाविद्यालये ही ‘मेरिट सिंबॉल’ गुणवत्तेचा मानबिंदू मानली जातात. तेथे प्रवेश मिळविणे व त्यासाठी गुण, अधिक गुण, अधिकाधिक गुण अशी चढती भाजणी सुरू होते. यातच राज्यमंडळ (स्टेट बोर्ड), CBSC, ICSE यातील गुणांची खेचाखेच ही परिस्थिती अधिकच बिकट करते. १० वी ते १२ वी या मधल्या दोन वर्षांत इंजिनीअरिंग व त्यातही IT, ENTC यांच्या प्रवेशातील स्पर्धेमुळे करिअरचा रस्ता बिकट बनतो. या सर्व वाटेवर मुलांनी स्वत:मधल्या क्षमता ओळखणे, पालकांनीही त्या जाणणे, त्यांचा आदर करणे व त्यानुसार धोपटमार्गाखेरीज इतर वाटा हुडकण्यासाठी त्यांना मदत करणे यासाठीचा ‘थांबा’ कुठे लागतो हे शोधावेच लागेल.
इयत्ता आठवीपर्यंत आकारिक मूल्यमापनाच्या माध्यमातून ही संधी शिक्षक, पालक, बालक या त्रयीसाठी उपलब्ध झाली आहे; परंतु त्याविषयीही अनेक गैरसमज, मतमतांतरे ही पद्धत राबविणाऱ्यांच्या मनात आहे. ताणरहित परीक्षा, स्वत:ची स्वत:शीच स्पर्धा याचा परिचय व प्रत्यय मुलांना यायला हवा असेल तर अपेक्षांचं ओझं त्यांच्या डोक्यावरून हटवावंच लागेल.
१० वीच्या परीक्षेच्या निमित्ताने आज शाळांमधून एकाच तंत्राचे महत्त्व मुलांच्या मनावर बिंबविण्यात येते ते म्हणजे सराव. हे उत्तमच आहे. कारण एखादी गोष्ट सतत करण्यातून अचूकता, दृढीकरण या गोष्टी साध्य होतात. चुकांची संख्या कमी होते, दिलेल्या वेळामध्ये आपल्याला जे येत आहे त्याचं उत्तम सादरीकरण कसं करावं याचं प्रशिक्षण यामुळे मुलांना मिळतं. वेळेचं नियोजन, अभ्यासाची आखणी याचा सराव होतो, पण हे एवढंच पुरेसं नाही. माहितीवर प्रक्रिया व आकलन झालेल्या घटकांची पुनर्माडणी ही कौशल्ये प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने असतात, म्हणूनच नवनिर्मिती ही दुसऱ्यापेक्षा वेगळी असते, कधीकधी तर एकमेव असते. म्हणूनच ‘त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक’ या ओळीतील आत्मजागृती घडणे महत्त्वाचे असते. गुणांच्या सरसकटीकरणात हा राजहंस ज्याला गवसेल त्याला भरारी घेण्यासाठी आकाश मोकळे असेलच. म्हणूनच तयारीचं वर्ष व खरंतर त्या आघाडीचीही वर्षे ही घोकंपट्टीची न ठरता क्षमता विकासाची ठरतील व याचं भान पालक, शिक्षकांना येईल तर गुणांची रस्सीखेच थांबेल व शिक्षण हे आनंदक्षण न ठरता आनंदयात्रा बनेल.