संकल्पनेवर आधारित शिक्षण ही काळाची गरज Print

 altसर्जेराव जाधव , सोमवार, १८ जून २०१२
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
 ‘शिक्षणाच्या मूलभूत अधिकारा’तील सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यांकनामुळे विद्यार्थ्यांना थेट नववी-दहावीला औपचारिक परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षांना असलेले महत्त्व आणखी वाढणार आहे. किंबहुना पुढील शिक्षणाचा भक्कम पाया नववी-दहावी स्तरावरच तयार होतो.

दहावीच्या गुणांवर अभियांत्रिकी पदविका, आयटीआयसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश अवलंबून आहेत. त्या अर्थाने दहावी ही करिअरची सुरुवात आहे.
‘एनसीईआरटी’ नेमून दिलेल्या २००५ च्या मूलभूत अभ्यासक्रमानुसार आणि ‘कोप्से’ या सर्व राज्य शिक्षण मंडळांची शिखर संघटना असलेल्या संस्थेच्या मदतीने ‘राज्य शिक्षण मंडळ’ आपला अभ्यासक्रम तयार करीत आहे. सर्व राज्यांमधील अभ्यासक्रमांमध्ये समानता असावी आणि देशभरात सर्वत्र त्या त्या इयत्तेनुसार मूलभूत (कोअर) अभ्यासक्रम आत्मसात केला जावा, या दृष्टीने हे बदल केले जात आहेत. विद्यार्थ्यांला कुठल्याही राज्यात शिक्षणासाठी जायचे ठरल्यास अडचण येऊ नये या दृष्टीने आपण आपल्या अभ्यासक्रमाचा दर्जा वाढवीत आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हळूहळू त्यानुसार जुळवून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. शिक्षकांनीही यातले बारकावे, वेगळेपण, अध्यापनाचे तंत्र समजून घ्यावे आणि मुलांपर्यंत पोहोचवावे. सुधारित अभ्यासक्रमात अपेक्षित असलेले ज्ञानावर आधारित आकलन, कौशल्य, आकलनक्षमता आणि मिळालेल्या ज्ञानाची उपयोजन क्षमता यावर भर दिला तर त्याचा निश्चितच मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होईल.
यासाठी शिक्षकांनी मुलांना गांभीर्याने शिकविले पाहिजे. वर्गात शिकविताना मुलांनाही बोलते केले पाहिजे. त्यांच्या मनाताली भीती दूर केली पाहिजे. विद्यार्थिकेंद्रित वातावरण वर्गामध्ये निर्माण केले पाहिजे. त्यांना ‘अ‍ॅक्टिव्हिटी’वर आधारित असाईनमेंट दिल्या गेल्या पाहिजे. आपण सतत सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांशी आपल्या विद्यार्थ्यांची तुलना करतो. पण तेथील अध्यापनाच्या पद्धतीही पाहिल्या पाहिजेत.
अंतर्गत मूल्यांकनाचा प्रकार या शाळांमध्ये खूप जास्त आहे. सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यांकनात तेच अपेक्षित आहे. मुलांना जे शिकविले जाते, जे करून घेतले जाते, त्यात अपेक्षित गुण मिळत नसतील तर ते मुलांकडून परत करवून घेतले जाते. या प्रकारचे मूल्यांकन आपल्या शाळांमधूनही झाले पाहिजे. मुलांनीही सरावाला महत्त्व दिले पाहिजे. केवळ पोपटपंची ज्ञान उपयोगाचे नाही, तर त्याचा वापर करता आला पाहिजे, तरच हे विद्यार्थी भविष्यात टिकू शकतात.
र्सवकष सातत्यपूर्ण मूल्यांकनात चुका सुधारण्याची संधी असते. वर्षांतून एकच परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या करिअरला ब्रेक लावण्याऐवजी त्याचे तुकडे पाडा आणि मूल्यांकन करा. सीबीएसई-आयसीएसईमध्ये हा प्रकार जास्त आहे. वर्षभर या शाळांमधून छोटय़ा छोटय़ा परीक्षा होत असतात. या परीक्षा शिक्षकांनी किती घ्यायच्या यावर बंधन नसते. परीक्षा नाही म्हणून मूल वरच्या इयत्ता सहजपणे चढत जाते, हा समज चुकीचा आहे. आपल्या माध्यमिक शाळांमध्येही शिक्षकाला खूप स्वातंत्र्य आहे. पाठय़पुस्तक घोटवून घ्यायचे नाही तर अभ्यासक्रम आत्मसात करून मुलांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यासाठी ते वर्षभर निरनिराळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज् करू शकतात. वर्षभर मूल शिक्षकांच्या देखरेखीखाली असते. त्यामुळे आपल्या विषयाची तयारी त्याच्याकडून करवून घ्यायला काहीच अडचण नसायला हवी. शिक्षकांनी मनात आणले तर ते निश्चितणे करू शकतात. शाळा सुरू होतात त्या वेळी मुलांना विश्वासात घेऊन एखाद्या चाचणीद्वारे त्यांनी त्या त्या इयत्तेत येण्यासाठी कोणते मूलभूत ज्ञान आत्मसात केलेले असायला हवे हे तपासून घ्यायला हवे. याआधारे एखाद्या विषयात एखादे मूल कमी पडत असेल तर त्यावर शिक्षकांना अधिक लक्ष केंद्रित करता येईल. अशा विद्यार्थ्यांचे गट पाडून त्यांच्याकडून विशेष तयारी करवूनही हे करवून घेता येईल. त्यामुळे गुणवत्ता निश्चितपणे सुधारता येईल.
संकल्पनेवर आधारित शिक्षण ही काळाची गरज आहे. त्यामुळे शिक्षकांनाही आपल्या शिकविण्याच्या तंत्रात त्यानुसार बदल करावे लागतील. व्यावसायिक अभ्यासक्रमांना सीईटीच्या माध्यमातून प्रवेश देण्याचे धोरण आपण राबवितो आहे. याचा पाया नववी ते बारावीच्या शिक्षणात तयार होत असतो. केवळ सीईटीवर अनावश्यक भर दिल्याने मुलांचा पाया तयार होत नाही. म्हणूनच नववी ते बारावी स्तरावर शिकविल्या जाणाऱ्या संकल्पना विद्यार्थ्यांनी नीट आत्मसात करून घ्याव्यात.
आज विद्यार्थी वर्गातील अध्यापनाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. विशेषत: कोचिंग क्लासेसकडे असलेला ओढा आणि तिकडेच आपल्याला सर्वकाही मिळते ही समजूत याचा वर्गातील अध्यापनावर परिणाम होतो आहे. वर्गात जो विद्यार्थी पहिल्या दिवसापासून लक्ष देतो त्याला समजून घेण्याची खूप संधी असते. पण आता सहाध्यायींच्या मदतीने देवाणघेवाण करून शिकण्याची पद्धतही कमी झाली आहे.
हल्ली सुट्टीकाळात क्लासेस लावणे किंवा दोन-दोन महिने मुलांना इतर शहरांमधील क्लासेसमध्ये ठेवण्याचा जो काही ‘ट्रेंड’ निर्माण झाला आहे यामुळे विद्यार्थ्यांची केवळ फरफटच होते. हे विद्यार्थी वर्गातील अध्यापनाकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम आपोआपच वर्गातील उपस्थितीवर होतो आणि हळूहळू याची लागण सर्व वर्गाला होते. याचा परिणाम शिक्षकांच्या उत्साहावर होतो. उपस्थिती सातत्यपूर्ण राहण्यासाठी शाळाचालकांनी, मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी, पालकांनी सर्वानीच एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे.
दहावीच्या बाबतीत म्हणायचे तर विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसापासून वर्गात नियमित हजर राहावे. शिक्षक जे सांगतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. समजले नाही तर वेळ काढून शिक्षक किंवा सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्या शंका दूर कराव्यात. त्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची सवय लावून घ्यावी. जे समजले नाही ते समजून घेण्याची सवय आणि ऊर्मी मनात निर्माण झाली की त्यासाठी वेगळ्या कोचिंगची गरज राहणार नाही. आणि उत्तीर्ण होण्यास तर काहीच अडचण येणार नाही.