कुतूहल आणि विज्ञान Print

altडॉ. वैभव श्री. प्रभुदेसाई , मंगळवार, १९ जून २०१२
टाटा मुलभूत संशोधन संस्थान, मुंबई
जून महिना आला की त्याबरोबर नवीन शैक्षणिक वर्षांची सुरुवातही होते. त्यात पाल्याचे दहावीचं महत्त्वाचं वर्ष असेल तर त्याबरोबर भीती, परीक्षेचं टेन्शन, भविष्याची चिंता, करिअरविषयी धास्ती हेदेखील येते आणि जेव्हा आपण आपल्या अभ्यासाविषयी बोलतो तेव्हा आपसुक आपला आवडता विषय, नावडता विषय आणि त्यांना हाताळण्यासंबंधी आपली धोरणं हीदेखील येतात.

पण जेव्हा जास्तीतजास्त गुण मिळवून देणाऱ्या विषयांबद्दल बोलणे येते तेव्हा ते विषय आपल्या आवडीचे असोत किंवा न आवडीचे असोत, त्या विषयात पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे याचाच आपल्याला ध्यास असतो.
असाच एक विषय आहे विज्ञान. चला मी तुम्हाला या विषयाला सामान्यत: कसे हाताळावयास हवे याविषयी माझे काही विचार सांगतो. मी जसे सांगेन तसे केलेत तर विज्ञान तुम्हाला निश्चितच आवडू लागेल. जर का ते आधीच आवडत असेल तर तुम्हाला सर्वात जास्त आवडू लागेल आणि जर तसे अगोदरच असेल तर तुम्ही मी म्हणतो तसे करून तर बघा. तुमचा विज्ञानविषयीचा दृष्टिकोन चांगल्यासाठी बदलेल.
विज्ञान याचा एक अर्थ आहे सूचिबद्ध मांडलेले ज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे व्यावहारिक गोष्टींसाठी केलेला विज्ञानाचा वापर. म्हणजेच विज्ञान हे तंत्रज्ञानाच्या मुळाशी असते आणि आजचे मूलभूत विज्ञान उद्यचे तंत्रज्ञान होते. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या अभ्यासानेही काही अंशी विज्ञानाचा अभ्यास करता येतो.
विज्ञान या विषयाच्या संबोधनाने विद्यर्थ्यांमध्ये दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उद्भवतात. त्यामागे त्यांची दोन प्रकारची धोरणं कारणीभूत आहेत. काहींना विज्ञान खूप आवडते कारण आपल्या आसपासच्या विविध गोष्टींविषयींचं कुतूहल हे त्यांना विज्ञानात सापडते तर काहींना ते खूप कठीण वाटते. त्यामागे घोकमपट्टी करून परीक्षेला सामोरे जाण्याची वृत्ती कारण असते.
एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या आसपासच्या गोष्टींबद्दल असणारं कुतूहल हेच वैज्ञानिक दृष्टिकोन असण्याचं पहिलं चिन्ह आहे. विज्ञान आपल्याला तर्कशुद्ध विचार शिकवते, कार्यकारणभाव देते. विज्ञान शिकण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रश्न विचारायचा आणि त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. विज्ञान हे पद्धतशीर मांडलेले ज्ञान असल्याने, त्याच्या तर्कसंगत मागोव्याने वैज्ञानिकांनी विविध सिद्धांतांचे शोध लावले. त्यांच्या मदतीने आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींचे विश्लेषण सुसंगतपणे करता येते. आपण शाळेत विज्ञान विषयात यापैकी काही सिद्धांतांचा त्यांच्या सोप्या स्वरूपात अभ्यास करतो. याच सिद्धांतांविषयी अधिक खोलवर माहिती विज्ञानातील उच्चशिक्षणात प्राप्त केली जाते. तर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासात या सिद्धांताच्या व्यावहारिक उपयोगांविषयी शिकायला मिळते.
परंतु हे झाले पुढच्या अभ्यासक्रमाविषयी. दहावीपर्यंत या विषयाकडे न आवडीने बघू नका किंवा गुण मिळविण्याचं साधन म्हणून बघू नका. गणिताने आपण तो सिद्धान्त किती सहजपणे मांडू शकतो याचा आनंद घ्या. अशा प्रकारे जर का गणिती भाषेत तुम्ही वैज्ञानिक प्रश्न मांडायला शिकलात तर त्या पद्धतीचा भविष्यात तुम्हाला नक्कीच उपयोग होईल मग तुम्ही विज्ञानात उच्चशिक्षण घ्या किंवा घेऊ नका.
मी जे काही ‘गणिती भाषा ही विज्ञानाची भाषा आहे’ याविषयी बोललो ते पदार्थविज्ञान (Physics) आणि काही अंशी रसायनशास्त्र यांना लागू पडते. जीवशास्त्र आपल्याला जे काही शिकवते ते गणिती भाषेत जरी मांडता आले नाही तरी ते तितकेच तर्कशुद्ध असते. त्यात जीवजंतूविषयी, प्राणी व वनस्पतींविषयी माहिती असल्याने ते जास्त वर्णनात्मक शास्त्र आहे.
विज्ञानविषयी अजून एक महत्त्वाचा आणि मनोरंजक भाग म्हणजे आपण शाळेत शिकतो ते ‘प्रयोग’. हे प्रयोग आपल्याला विज्ञानाविषयी बरंच काही शिकवतात. ते आपल्याला वैज्ञानिक सिद्धान्तांची खरी ओळख करून देतात. म्हणूनच या प्रयोगांदरम्यान जास्तीतजास्त समन्वेषण केलं पाहिजे. जास्तीतजास्त प्रश्न स्वत:ला, मित्रांना आणि शिक्षकांना विचारले पाहिजेत. त्यांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. यातूनच पुढील विज्ञानाकडे आपली वाटचाल सुरू होते. तुमच्यापैकी कितीजणांनी घरी, बाहेर, शाळेत पण प्रयोगशाळेबाहेर विविध प्रयोग (वैज्ञानिक प्रयोग) करून पाहिले आहेत? तुम्ही कधी स्वत:चा सूक्ष्मदर्शक (Microscope) किंवा दूरदर्शक (Telescope) घरीच बनविण्याचा प्रयत्न केला आहे का? तुम्हाला आठवत असेल की लहान असताना तुम्हाला विविध गोष्टींचे खूप कुतूहल होते. पण जसे जसे आपण त्याविषयी पाठय़पुस्तकात शिकत गेलो तस तसे आपले कुतूहल कमी होत गेले. आपल्याला मिळणाऱ्या ज्ञानाने जिज्ञासा वाढली पाहिजे पण परीक्षा, त्यातील स्पर्धा यामध्ये आपण या महत्त्वाच्या गोष्टींना विसर पडू देतो. नकळत याचा आपल्या अभ्यासाच्या दर्जावरही परिणाम होतो. हे सर्वच विषयांसाठी सत्य आहे परंतु विज्ञानासाठी ते जास्त लागू आहे. तुम्हाला आठवतं का तिसरीत किंवा चौथीत असताना तुम्ही भिंगाच्या उपयोगाने सूर्यप्रकाश कागदावर किंवा काडय़ांवर केंद्रित करून ते पेटवण्याचे प्रयोग नक्कीच केले असतील. परंतु जेव्हा तुम्हाला भिंगाविषयी शिकवले गेले तेव्हा तुम्ही एकाऐवजी दोन भिंगांचा वापर करून काय होते हे पाहण्याचा प्रयत्न कधी केला होता का? जर केल असेल तर सूक्ष्मदर्शक आणि दूरदर्शकांचे कार्यकारण अगदी सहजपणे तुम्हाला कळेल असतील. शाळेतून घरी येताना किंवा घराभोवती दिसणारी विविध फुले, पाने तुम्ही गोळा करा. त्यातील विविधता जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांचे वर्ग करण्याचा प्रयत्न करा आणि अभ्यासा आपण पाठय़पुस्तकात शिकलेले जीवशास्त्र किती सोपे आहे. साबण आणि डिटर्जन्टमधील फरक जाणून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे धुण्याचा आणि आंघोळीचा साबण घेऊन त्यातील फरक जाणून घेणे.
हा प्रयोग तुम्ही नक्की करून पाहा. चुंबक लोखंडाला आकर्षित करते पण अ‍ॅल्युमिनियमला नाही. हे तुम्हाला माहित आहे. मग आता असे अभ्यासा एक चुंबक लोखंड आणि अ‍ॅल्युमिनियमजवळ न्या आणि पाहा काय होते ते. आता तेच चुंबक (चुंबक शक्तिशाली असावे) अ‍ॅल्युमिनियमच्या जवळ घेऊन जाऊन त्याला न चिकटवता त्याच्या पृष्ठभागापाशी समांतर फिरवा. काय अनुभव येतो? हे फिरवणे जोरात करा आणि पाहा काय फरक जाणवतो. तुम्ही सांगू शकाल चुंबक अ‍ॅल्युमिनियमपाशी फिरवताना जड का वाटते? मला खात्री आहे, तुमच्या दहावीच्या अभ्यासक्रमाशेवटी तुम्ही ते सांगू शकाल.
लक्षात ठेवा आणि स्वत:ला प्रश्न विचारा, पण ते नुसतेच विचारण्यापुरते विचारू नका. प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल तर आपसुक झोप उडू द्य. मग बघा तुम्हाला विज्ञान आवडू लागेल. माझ्या मते विज्ञानाविषयी सर्वोत्तम बाब म्हणजे ते स्वत:चे सिद्धान्त वारंवार पडताळून पाहते जेणेकरून ते अधिकाधिक अचूक होईल. लहानपणी चंद्राला पाहून किंवा ग्रहांच्या चित्रांना पाहून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की चंद्र, ग्रह असे आकाशात सूर्याभोवती कसे फिरू शकतात? आता तुम्हाला उत्तर माहीत आहे. गुरुत्वाकर्षणामुळे. आता पुढचा स्वाभाविक प्रश्न आहे की हे गुरुत्वाकर्षण कोणत्या माध्यमाद्वारे अनुभवले जाते? हा साधा प्रश्न सध्याच्या अनुत्तरित वैज्ञानिक प्रश्नांपैकी एक आहे. वैज्ञानिक त्याच्या उत्तरासाठी झटत आहेत.
प्रश्न विचारणे विद्यर्थ्यांसाठी जसे महत्त्वाचे आहे तसेच त्यांना त्यासाठी उत्तेजन देणे हे शिक्षक आणि पालक यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. अशा उत्तेजनामुळेच विद्यर्थ्यांचा नवीन विषय शिकण्याकडे योग्य दृष्टिकोन बनू शकतो.
कोणताही विषय आणि विशेषकरून विज्ञान शिकण्याचा अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आतापर्यंत लिहिल्या गेलेल्या विविध संदर्भ साहित्याचे वाचन, सध्या वैज्ञानिक प्रश्न म्हटला की विद्यर्थी (विशेषकरून शहरी भागातील विद्यर्थी) इंटरनेटचा वापर करून उत्तर शोधतात. विशेषकरून विकीपीडिया (Wikipedia) या वेबसाइटचा सर्रास उपयोग करतात, वेबसाइटवरदेखील बऱ्याचशा लेखांना संदर्भ दिलेले असतात. संदर्भ न दिलेल्या लेखांवर आपण विश्वसही ठेवू नये. पण अधून मधून या संदर्भाचा आपण पाठपुरावा आपण करावा. त्यातून आपल्याला अधिक खोलवर माहिती मिळते. कोणताही विषय शिकण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. हा मार्ग उच्चशिक्षणात नेहमीच उपयोगी पडणारा आहे मग ते शिक्षण विज्ञान, वाणिज्य असो कला शाखेत असो शेवटी मी हेच सांगेन, खूप प्रस्न विचारा त्यांची उत्तरं शोधा, प्रयोग करत राहा, वाचन करत राहा. मुख्य म्हणजे विज्ञान शिकण्याचा आनंद घ्या आणि यशस्वी व्हा!
समन्वयक : सी. डी. वडके, विद्य प्रबोधिनी, दादर.
उद्यचा विषय : गणिताचा महामंत्र