दैनंदिन जीवनातील सामाजिक शास्त्रांचे महत्त्व Print

मिलिंद व्ही. चिंदरकर, गुरुवार , २१ जून २०१२
सचिव, ज.ल. शिर्सेकर शिक्षण संस्था, वांद्रे (पू) मुंबई
विद्यर्थी मित्रांनो,
यंदाचे तुमचे दहावीचे वर्ष आयुष्यातल्या एका नव्या टप्प्यावर तुम्ही पोहोचला आहात. दहावीपर्यंत तुम्ही विविध विषयांचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये सामाजिक शास्त्रातले विषय अगदी तिसरीपासून तुमच्या सोबत आहेत. प्रत्येक इयत्तेनुसार सामाजिक शास्त्रातल्या विविध विषयांचा वेगवेगश्या पैलूंनी तुम्ही अभ्यास केला.

खर म्हणाल तर सामाजिक शास्त्रातले विषय केवळ अभ्यास विषय नसून दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारा तो एक विचार आहे. आपलं जीवन कसं जगावं, चांगल्या आदर्शाची जोपासणा कशी करावी, जीवनातल्या समस्या कशा सोडवाव्यात याचा दिपस्तंभ म्हणजेच सामाजिक शास्त्रे.
सामाजिक शास्त्रातला अगदी अलिकडे म्हणजे गेल्याच वर्षी परिचय झालेला विषय म्हणजे अर्थशास्त्र आज हा विषय जरी लहान वाटला तरी त्याचा आवाका मोठा आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळे अर्थशास्त्रातल्या प्रत्येक घटकाचा नीट काळजीपूर्वक अभ्यास करा. अर्थशास्त्रातील संकल्पना दैनंदिन जीवनातील घटनांतून समजून घेणे आवश्यक आहे. आर्थिक विकास समजून घेताना देशाचे राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन यांच्यात होणाऱ्या वाढीचा त्याचा आर्थिक स्तरावर होणाऱ्या परिणामांचा आणि बदलल्या समाजरचनेचा अभ्यास केला पाहिजे. आपली अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्थेकडून विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत आहे हे अभ्यासताना भारताला विकसनशील का म्हटले आहे याचाही विचार व्हायला हवा. एखाद्य गावाचे सर्वेक्षण करून गावातील लोकांचे दरडोई उत्पन्न, त्यांचे उद्येगधंदे, रोजगाराची साधने. पूरक व्यवसाय, शिक्षण व आरोग्याच्या सोयी याचा अभ्यास करायचा याचप्रमाणे गावातला पाणीपुरवठा, जल संसाधनांची उपलब्धता, वीजेचे भारनियमन, त्याचा सेती व उद्येगधंद्यंवर होणारा परिणाम या गोष्टीही अर्थशास्त्रातील समस्यांशी जोडता येतील. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तरीही या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हवा. शेती हा तोटय़ातला व्यवसाय आहे असं बहुसंख्य शेतकऱ्यांचं मत असल्याने नव्या पिढीला शेती व्यवसायात रस नाही. त्यामुळे लोक शहराकडे वळतात. एकीकडे त्यामुळे शेतजमिनी ओस पडत चालल्या आहेत तर दुसरीकडे शहरीकरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. भाववाढ महागाईने देशाला ग्रासले आहे परंतु भाववाढ का होते याचा खऱ्या अर्थाने शोध घेतला पाहिजे यासाठी मुलांनी वेगवेगश्या बाजारपेठांची प्रत्यक्ष पाहणी करायला हवी. कृषीमालाच्या किमती कशा वाढतात याचा अभ्यास केला पाहिजे. किमतवाढीच्या प्रत्येक स्तराचा विचार केला पाहिजे. मध्यस्तांची साखळी जर बाजूला केली तर शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेल आणि ग्राहकानाही वस्तू वाजवी किमतीत मिळतील याचा विचार आपणास सहजपणे करता येईल. अर्थात त्यासाठी एखादा शोधप्रकल्पही तुम्ही हाती घेऊ शकता. उद्येगातून येणाऱ्या मालाच्याही बाबतीत असाच प्रकल्प हाती घेता येईल. ग्राहक संरक्षणाचा नुसता पुस्तकी अभ्यास न करता वस्तू खरेदी विक्रीचाही डोळसपणे अभ्यास करावयास हवा. गॅरंटी, वॉरंटी यातील फरक विचारात घेतला पाहिजे. बाजारातील वस्तूंचा कृत्रिम तुटवडा, भेसळ याविषयी अगदी दैनंदिन अनुभवावरून अभ्यास करता येईल. ग्राहक मंचाकडून दिलेले निर्णय, त्याचे कार्य त्यांच्या सूचना या विद्यर्थ्यांनी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. नवीन आर्थिक धोरण आणि जागतिकीकरण संकल्पनांचा त्यातून होणाऱ्या बदलांचा आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचा मागोवा घेणेही महत्त्वाचे आहे.
अर्थशास्त्राप्रमाणेच भूगोलाचा अभ्यासही कृतीकौशल्ये, निरीक्षण क्षेत्र अभ्यास प्रकल्प मुलाखती या पद्धतीने करा म्हणजे तो निरस वाटणार नाही. हा विषय केवळ पुस्तकी ज्ञान म्हणून न शिकता तो जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून त्याच्याकडे पहा. भारताची भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक साधन संपत्ती, त्यातून उपलब्ध असणारी संशोधने आणि त्याचा योग्य वापर करून संशाधने पुढच्या पिढय़ांनाही कशी उपलब्ध होतील याचा ठोस विचार व्हावा. भारताच्या अफाट वाढणारी लोकसंख्या ही गुणवत्तापूर्ण संसाधन कसे ठरू शकेल याचाही विचार हवा. त्याकरिता शिक्षण, तंत्रशिक्षणाचा प्रसार हवा त्याचबरोबर महिला सबलीकरण व सक्षमीकरणही झाले पाहिजे. जलसिंचनाच्या बहुउद्देशीय प्रकल्पाबरोबरच स्थानिक पातळीवरही जलसंधारण झाले पाहिजे. यासाठी हिवरे बाजार, राळेगणसिद्धी किंवा जोहड यासारख्या अभिनव उपक्रमांची माहिती मिळवा. देशातील नदी जोड प्रकल्पाचा अभ्यास करून त्याची भविष्यकालीन फायदे तोटे लक्षात घ्या. वनक्षेत्राच्या अभ्यासातून परिस्थितीकीय संतुलन, अन्नसाखळी याचा अभ्यास व्हायला हवा अगदी सहलीला जातानाही निसर्गाचे नीट निरीक्षण करा, त्याला हानी पोहोचेल असे वागू नका. दरवर्षी प्रत्येकाने किमान एका झाडाचे तरी संगोपन करा. ज्यामुळे नामशेष होणारे प्राणी वनस्पती टिकतील आणि पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल.
शेतीक्षेत्राचा विचार अर्थशास्त्रातून केलेला आहे पण पशुपालन, कुकुटपालन, दुग्ध व्यवसाय यासारखे शेतीपूरक व्यवसायांची माहिती मिळवून ते तुमच्या करिअरचा भाग कसा बनू शकतील याचा विचार करा. पारंपारिक ऊर्जा संसाधनांचे संधारण करण्यासाठी सौरऊर्जा, कचऱ्यापासून निर्माण होणारी ऊर्जा असा ऊर्जा संसाधनांचा अभ्यास करा. आपल्या आजूबाजूला ऊर्जेचा अपव्यय कसा होतो. याचा अभ्यास करा आणि तो कसा टाळता येईल याचाही विचार करा. वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करताना आपल्या परिसरातील वाहतुकीची साधने आणि दळणवळण सुविधांचा अभ्यास करा. यालाच नकाशा वाचनाची जोड देता येईल लक्षात ठेवा की प्रवास करताना नकाशा असल्यास अनोळखी प्रदेशात आपला मार्ग आपल्याला अचूक शोधता येतो.
इतिहास अभ्यासताना क्रांतीची संकल्पना केवळ पाठ न करता त्याचे कार्यकारण परिणाम समजून घ्या. क्रांतीचे तत्कालीन परिणाम अभ्यासताना आजच्या काळावर त्या क्रांतीचा कसा प्रभाव आहे त्याचा विचार करा जसा औद्येगिक क्रांतीचा पहिला टप्पा तुम्ही अभ्यासाल तेव्हा संगणक क्रांती, माहिती तंत्रज्ञान क्रांती इथपर्यंत तिचा प्रवास अभ्यासणे रंजक ठरेल. अमेरिका आणि फ्रान्समधील क्रांतीचा परिणाम भारतीयांवर कसा झाला याचा अभ्यास करा. पाश्चत्य सार्माज्यवादामुळे आशिया व आफ्रिका खंडांची लूट होऊन पाश्चत्य देश कसे संपन्न झाले याचा अभ्यास करताना आज नवसार्माज्यवाद कसा फोफोवतो व त्याचा विचार व्हावा. अमेरिका व चीनच्या आजच्या काळातील आर्थिक सार्माज्यवादाचा मागोवा घ्या असे अमेरिकेमुळे इराक, अफगाणिस्तान या आशियायी देशांवर कोणते अनिष्ठ परिणाम झाले तसेच चीनी ड्रॅगनचा विळखा जगातील बाजारपेठांवर कसा पडतो आहे हे सुद्धा समजून घेतले पाहिजे. रशियन राज्यक्रांतीतून साम्यवादाचा उदय झाला आणि पुढे त्याचा झपाटय़ाने प्रसार झाला पण आज साम्यवादाची का पिछेहाट होतेय याचीही कारणे तपासून पाहा. दोन महायुद्धांच्या दरम्यान युरोपातील हुकूमशाहीची पाठय़पुस्तकात माहिती आहे पण आजच्या काळात इजिप्तमध्ये होस्नी मुबारक किंवा लिबियातील गडाफी यांच्या हुकूमशाहीविरोधात झालेल्या जनक्रांतीचा परामर्श घ्या. र्भष्टाचाराशी लढा देताना भारतात कसे जनआंदोलन होत आहे याचीही त्याला जोड द्य. संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटना आजच्या काळात कोणती भूमिका बजावत आहेत याचा विचार करा. दुसऱ्या महायुद्धानंतर विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतली. मोबाइल क्रांती, इंटरनेटचा वाढता वापर आणि त्या साऱ्यामुळे माहितीचा विस्फोट याचा विचार करा. जागतिकीकरण हा आजच्या काळात नव सार्माज्यवाद कसा बनू पाहत आहे याचाही विचार करा.
नागरिकशास्त्र हे पुस्तकी अभ्यासाबरोबरच जीवनातील विविध अनुभवातून शिका. लोकशाही प्रणाली आपल्या व्यक्तीगत जीवनात कशी रुजेल यासाठी आपल्या समस्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविणे मतदार संघातील त्यांच्या कामाचा आढावा घेणे, आपल्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करणे आणि नागरी समस्या सोडविण्यासाठी स्वयंसेवी संघटनांचा सहभाग वाढावा याचा विचार व्हावा अर्थात देशाचे भावी नागरिक म्हणून तुमचीही भूमिका महत्त्वाची आहे हे विसरू नका. आज भारतीयांना मिळालेला माहितीचा अधिकार त्यापुढे जनलोकपाल विधेयकासाठी सुरू असलेले जन आंदोलन याकडेही चिकित्सक नजरेने पहा या साऱ्यातून संसदीय प्रशासन याचा अभ्यास आपोआपच होईल. निवडणुकांतील घडामोडींची माहिती मिळवतानाच नागरिकशास्त्रातील घटकांचा आपोआप अभ्यास होईल.
एकंदरीतच इतिहासातून केवळ भूतकाळच न शिकता त्याची वर्तमानकाळाशी सांगड घालून भविष्यकालीन परिणाम आणि झपाटय़ाने होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्याची तयारी हवी. भूगोलात प्राकृतिक पर्यावरणाचा विचार करता संसाधन संधारणाचा गांभीर्याने विचार करा. नागरिकशास्त्र अर्थशास्त्र याविषयांची पाठय़पुस्तकी घोकमपट्टी न करता त्याला तुमच्या दैनंदिन जीवनाशी जोड द्य. या सर्वातून सामाजिक शास्त्रातील विषय केवळ पुस्तकी आणि परीक्षेपुरतेच मर्यादि न राहता आयुष्याच्या प्रवासात ते तुम्हाला निश्चितच मार्गदर्शक ठरतील याच शंका नाही. दहावीच्या अभ्यासासह तुमच्या परीक्षेसाठी आणि परीक्षेबरोबरच तुमच्या भावी आयुष्यासाठी असंख्य शुभेच्छा!
समन्वयक    : सी. डी. वडके, विद्य प्रबोधिनी, दादर.
उद्यचा विषय : भाषेचे महत्त्व