भाषेचे महत्त्व Print

सीमा सु. अभ्यंकर , शुक्रवार, २२ जून २०१२
alt निवृत्त शिक्षिका, सोशल सव्‍‌र्हिस हायस्कूल, परेल.
वर्षभरात तुम्ही शाळेच्या चिमुकल्या सुरक्षित जगातून एका विशाल भव्य, सुंदर जगतात प्रवेश करणार आहात. विविध क्षेत्रातील परिचित, रुळलेल्या वाटेवरच्या तर अपरिचित जगावेगश्या अनेक संधी तुमची वाट पाहत आहेत. तुमच्या बुद्धीचा, आजपर्यंत मिळवलेल्या ज्ञानाचा, मनापासून केलेल्या परिश्रमाचा, संयम, चिकाटी, धैर्य यांसारख्या गुणांचा आता कस लागणार आहे.

शिक्षणकाळातील ‘ही घडी’ फार महत्त्वाची आहे. दहावीचा मोठा अभ्यास! आजपर्यंत भागश: अभ्यास होता. संपूर्ण पुस्तकांचा नव्हता. दहावीच्या तीन भाषा, शास्त्र, गणित, समाजशास्त्र, आणि इतर वैकल्पिक विषयांच्या अभ्यासाने थोडे बेजार व्हालही! या स्पर्धायुगात अधिक गुणांचे महत्त्व नि:संशय आहे. गणित, शास्त्र, समाजशास्त्र हे विषय- समाजशास्त्रातील भूगोल भरपूर गुण देणारे. इतिहास किचकट पण खूप सोयीचा. तसेच इंग्लिशचे, ठराविक साचेबंद अभ्यास केला की आपलाच. राहता राहिल्या भाषा- मातृभाषा, हिंदी इत्यादी. त्याचे काय एवढे? जाता जाता थोडेफार लक्ष दिलं की बस्!
अभ्यासाचा हा आराखडा गुण मिळविण्यापुरता थोडाफार खरा आहे; पण पूर्णत: बरोबर नाही. ठरलेल्या शब्दात, मान्य असलेल्या वाक्यात उत्तरे लिहून गुण मिळतात. पण तुमची भाषा आणि तुमची विचारशक्ती यांचे काय? यामध्ये तुमच्या अंत:करणातील सर्जनशीलतेला वावच मिळत नाही. नव्यानव्या कल्पना, नवेनवे विचार येण्यासाठी अनेक भाषांचा सखोल अभ्यास याच काळात करणे आवश्यक आहे. तुमच्या विकासात भाषा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. कदाचित तुम्हाला आज ‘हे तितकंसं खरं नाही’ असं वाटेलही; पण पुढच्या आयुष्यात, प्रगतीत, स्थैर्यात भाषेचा फार मोठा वाटा आहे हे जाणवेलच. भाषेच्या कौशल्याचा, अध्ययनाचा समाजात पूर्वी आदर बाळगला जाई. पण तीन-चार दशके झाली, भाषेची अनास्था वाढायला लागली. समाजाच्या बौद्धिक व सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने ही परिस्थिती फार धोकादायक आहे. भाषेतील खोल व्यासंग, त्यातील पारंगतता याची गरज वाटेनाशी झाली आहे. भाषा कितीही ढिसाळ असली तरी बिघडत नाही, अशी समजूत झाल्यामुळे भाषा विषयांकडे विद्यर्थी उपेक्षेने पाहू लागलेत. भविष्यकाळात भाषेविना येणाऱ्या अडचणींचा धोका त्यांना पत्करावा लागतो आणि मग आपले स्थान टिकविण्यासाठी त्यांना भाषा शिक्षणासाठी अनेकविध प्रयत्न करावे लागतात.
भाषा हे सर्व प्रकारच्या ज्ञानक्षेत्राचे महाद्वार आहे. या द्वारातून प्रवेश करूनच प्रत्येकाला निवडलेल्या ज्ञानक्षेत्रात जायचे आहे. सर्वच विषय समजून घेण्याची पात्रता भाषाज्ञानानेच येते. शाळेत फक्त भाषाशिक्षक भाषा शिकवतात असे नाही, तर इतर विषयांचे शिक्षक विषयाबरोबर भाषा शिकवीत असतात, हे विसरून चालणार नाही.  विचार स्पष्ट करणारी भाषा आपण शिकतच असतो. शिक्षणात बहुविध भाषा यासाठीच असतात. भाषांची ‘उथळ जाणीव’ पार चिंताजनक गोष्ट आहे. शब्दांची जडणघडण, शब्दांचे वजन, त्याची पुरेशी जाणीव नसल्यामुळेच की काय निष्काळजीपणाने वापरलेल्या भाषेबद्दल आपण तक्रारही करीत नाही. भाषेत शब्दांची उपलब्धता जितकी अधिक तितकी आविष्कारक्षमताही अधिक! एकाच संकल्पनेसाठी सूक्ष्म भेद व्यक्त करणे भाषेमुळे शक्य होते. म्हणूनच विद्यर्थ्यांनी ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ या तुकोबांच्या अभंगवाणीतून सूचित केलेले शब्दधन याच काळात साठवायला हवे.
‘भाषा हे दैनंदिन जीवनातले संवादाचे रूप आहे’, याचा विसर पडता कामा नये. आठवी ते दहावी या स्तरावर भाषाअभ्यास समृद्ध करण्याचा हाच हेतू असतो. पाठय़पुस्तकाच्या माध्यमातून अनेक व्यक्तिरेखा भेटत असतात. अनेक घटना, प्रसंगांची यात मांडणी असते. लोकोत्तर स्त्री-पुरुषांची चरित्रे यात असतात. त्यातील देशभक्ती, त्याग, प्रेम, वात्सल्य, शौर्य, प्रामाणिकपणा, ध्येयनिष्ठा अशा अनेक सद्गुणांची ओळख होते. यातूनच विद्यर्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. नव्या जगाशी नाते जुळवताना सर्व भाषांतून, साहित्यातून प्रेरणा मिळत असते. म्हणूनच सर्व भाषांतील प्रचलित नियम पाळून निर्दोष लेखन कसे करावे व का करावे हेही समजले पाहिजे. शब्दसंपत्ती वाढवणे, अनेक शब्दांमधून नेमक्या शब्दाची निवड करून नेटकी वाक्यरचना कशी करावी हेही उमगते. भाषेतील अर्थसमूह, वाक्प्रचार, अलंकार यांचा वापर करण्याचे ज्ञानही क्रमश: मिळवता आले पाहिजे. त्यासाठी अनेक भाषांतील नामवंत लेखकांच्या पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. नंतरच्या आयुष्यात अनेकविध विषयांच्या गर्दीमुळे काहीजणांचे दहावीपाशीच भाषाशिक्षण संपते. त्यामुळे सर्व भाषांचा सखोल अभ्यास हीच जीवनवाटेवरील शिदोरी आहे.
भाषा नसती तर समाजजीवन अशक्य ठरले असते. माणसामाणसात संपर्क राहिला नसता. विचारांची देवाणघेवाण अशक्य झाली असती. ‘भाष्’ या संस्कृत धातूपासून ‘भाषा’ हा स्त्रीलिंगी शब्द तयार झाला. ‘मनातील विचार आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी मुखावाटे निघालेल्या ध्वनीचा सार्थ समूह म्हणजे भाषा’ अशी व्याख्या श्री. प्र. न. जोशी यांनी केली आहे. आज भाषा केवळ मुखावाटे निघणारी गोष्ट राहिली नसून अनेक माध्यमांद्वारे ती संपूर्ण जगात पसरत आहे. जगातील अनेक भाषा सर्वत्र अनेक प्रकारच्या अभ्यासासाठी उपयोगी पडत आहेत. व्यक्तिगत विकासाचा पाया भाषा-विकास आहे. तुम्ही तुमच्या बोलण्या- लिहिण्यातून समाजाला सामोरे जाता. तुमची वृत्ती, तुमची दानत, तुमचा स्वभावविशेष भाषेतून प्रगट होतो, म्हणूनच काही ठिकाणी काही वेळा खूप सावधपणे भाषा वापरावी लागते. या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक अशा जागतिकीकरणाच्या कालखंडात प्रगत भाषांचे विशाल जग उदयास येत आहे. भाषा ब्रह्मांडाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे साक्षात शब्दब्रह्म आहे.
केवळ वाङ्मय आणि साहित्याची भाषा म्हणून शालेय स्तरावर भाषा अध्ययन पुरेसे नाही, तर भाषेतर विषय शिकवण्याचे साधन व त्याकरिता आवश्यक असणारी तयारी भाषांच्या अभ्यासक्रमातूनच अधोरेखित व्हायला हवी. भाषिक क्षमता शालेय जीवनात व नंतरही मिळविण्याचे प्रयत्न निरंतर करायला हवेत. चुकीच्या भाषावापराने कार्यनाश होतो. तर कधी विपरीत कार्य होण्याची शक्यता असते. यासाठी शालेय जीवनात अभ्यासक्रमातील पायाभूत ज्ञान असणे गरजेचे आहे. एका भाषेची समज आली की नव्यानव्या भाषांचा परिचय करून घेणे फारसे कठीण नाही. माणसाच्या अनेक व्याख्या केल्या जातात. त्यात ‘बोलणारा प्राणी तो माणूस’ अशीही एक व्याख्या आहे. केवळ भाषेमुळेच माणूस अन्य प्राणी, पशू, पक्षी यांच्यापेक्षा वेगळा झाला आहे.
भाषेचे स्वरूप सतत बदलत असते. नदीच्या प्रवाहासारखे! हे बदलते रूप आपण समजून घ्यायला हवे. ऐहिक जीवन-व्यवहाराचा कणा भाषा आहे. जाणीव संक्रमणाची भाषाविरहित माध्यमे आहेत. उदा. वाहतुकीची संकेतचिन्हे, रंगीत दिवे, रस्त्यावरील चौकातील नियंत्रण, पर्यवेक्षकांचे हातवारे, शिट्टय़ा, आरोश्या इत्यादी इत्यादी. शिवाय बधिरांसाठी संकेत, अपंगांसाठी मुद्दाम विकसित केलेली माध्यमेही आहेत. याशिवाय अभियंते, भूगोलशास्त्रज्ञ, गणितज्ज्ञ, वैज्ञानिक, संशोधक अशांची ज्ञानक्षेत्रनिहाय भाषाविरहित माध्यमे दिसतात. पण या बहुतेक सर्व माध्यमांना संकेतार्थ देण्यासाठी भाषेद्वाराच सूचना द्यव्या लागतात. प्रशिक्षण द्यवे लागते. चर्चा घडवून संकेतार्थ निश्चित करावे लागतात. प्रशिक्षण देऊन ग्रंथ लिहावे लागतात. तेव्हा स्पष्टच आहे की, भाषाविरहित माध्यमेदेखील पुष्कळ अंशी भाषेवर अवलंबून असतात. संगणक- आंतरजाल यासारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी स्वीकारलेल्या चिन्हांकन पद्धतीमुळे भाषेची/ भाषांची गरज संपलेली नाही. रूढ भाषा हेच या माध्यमांचे अधिष्ठान आहे. या दृष्टीने या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा भाषिक विचार व अभ्यास करावाच लागेल. असेच शब्दविहीन कलाविष्काराबद्दलही म्हणता येईल. सांची- सारनाथसारखी शिल्पकला, पिकासोसारख्यांच्या जीवनदर्शन घडवणाऱ्या महान चित्रकलाकृती, संगीत इत्यादी कला सामान्यजनांना समजण्यासाठी शाब्दिक- समीक्षाच उपयोगी पडते.
भाषा उत्क्रांत होत असते. ती विकसनशील असते. अन्य भाषेतील शब्द, संज्ञा, संकल्पना आपल्या प्रकृतीप्रमाणे व परिस्थितीप्रमाणे स्वीकारत असते. म्हणूनच प्रत्येक भाषा परिश्रमपूर्वक शिकण्याचा विषय आहे. भाषाव्यवहार संपूर्ण मानवी जीवनाला व्यापून राहिलेला विषय आहे. त्यामुळे भाषाशिक्षणाच्या विचारांचा परीघही खूप मोठा आहे. भाषेची संपन्नता तिच्या आर्थिक व्यवहारातील गरज आणि महत्त्व यावर अवलंबून असते. म्हणजे अत्यंत प्रयत्नशील प्रगत समाजाची भाषा संपन्न असू शकते.
एकूणच काय, आपल्या जीवनातून भाषा वेगळी काढता येत नाही. भाषा विषयांच्या अध्ययनाचा संबंध थेट संस्कृतीशी व सामाजिक एकात्मतेसाठी आहे. तुम्ही भाषाशिक्षणाने जबाबदार नागरिक, यशस्वी व्यक्ती व्हाल यात शंकाच नाही. भाषा वाङ्मयाच्या अभ्यासाने, मनन, चिंतनाने आणि त्यानुसार केलेल्या आचरणाने देशभक्ती अंगी बाणलीच पाहिजे. देशभक्ती इतकी तरी असावी की ‘माझ्या वैयक्तिक फायद्यसाठी कोणतेही कृत्य असे नसेल की ते देशाला अहितकारक असेल’. स्वत:च्या सुखाबरोबर दुसऱ्याच्या सुखाचा विचार करता आला पाहिजे. त्याग, शौर्य, औदार्य, सहानुभूती, कृतज्ञता अशा गुणांचा अंगीकार करायला हवा. आंधळा स्वार्थ, सुखलोलुपता, क्रौर्य, अनुदारपणा टाकायला हवा. अन्यथा फुकाचे बोल काय कामाचे? यशस्वी व्हा! गुणवंत व्हा!
समन्वयक   : सी. डी. वडके, विद्य प्रबोधिनी, दादर.
उद्यचा विषय : Mathematics …. An Opulent Poetic Pleasure!