मन:शांतीसाठी पौष्टिक आहार अतिशय महत्त्वाचा -दुर्गादास सावंत Print
ठाणे वृत्तान्त

ठाणे / प्रतिनिधी
‘मन:शांती’ हा सर्व रोगांवर रामबाण उपाय असून यासाठी सकस आणि पौष्टिक आहाराचे सेवन करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वाशी येथील योगविद्या निकेतनमधील ज्येष्ठ अध्यापक दुर्गादास सावंत यांनी ठाणे येथे केले. येथील ‘प्रदीप योग साधना’ केंद्राच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पाचपाखाडी येथील प्रदीप सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ योगाचार्य अण्णा व्यवहारे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी दुर्गादास सावंत यांनी आहारात कोणत्या पदार्थाचे सेवन करावे आणि करू नये याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
जिभेचे चोचले पुरविण्यापेक्षा शरीराला उपयुक्त अशा पोषक आहाराचे सेवन करावे. आजच्या काळात मानसिक ताण सर्व रोगांचे मूळ कारण आहे. मन प्रसन्न असल्यास शरीरही प्रसन्न राहते, असे त्यांनी सांगितले. निकृष्ट आणि अनियमित आहाराने माणसाच्या शरीरातील आम्लात वाढ होऊन मानसिक ताण बळावतो असे सावंत यांनी सांगितले. शरीरात चयापचयाच्या क्रियेतून नैसर्गिकरीत्याच आम्ल तयार होत असते.

यामुळे कोणत्याही पदार्थाचे सेवन करताना शरीरातील आम्लाचे प्रमाण वाढणार नाही हे ध्यानात ठेवणे महत्त्वाचे आहे. आम्लाचे प्रमाण वाढल्याने विषसंच तयार होऊन पोटाचे विकार, सांधेदुखी, अ‍ॅसिडीटी यांसारख्या विविध आजारांची निर्मिती होत असल्याचे त्यांनी           सांगितले.
 मानसिक ताण दूर करण्यासाठी सकस आहाराचे सेवन, योगासने आणि विविध छंद जोपासण्याचा सल्ला त्यांनी या वेळी दिला. योगासनांमुळे रक्तचलनात मदत होते. साखर, मीठ आणि मैदा यांचे अतिसेवन करू नये. आहारात साखरेऐवजी लाल गूळ वापरावा. अति मीठ सेवन केल्याने उच्च रक्तदाब तसचे मूत्रपिंडाचे आजार होण्याची शक्यता असते, असे त्यांनी सांगितले. आहारात रिफाइन्ड तेलाऐवजी फिल्टर तेल वापरावे. तसेच टोमॅटो शिजवण्याऐवजी कच्चा खाणे केव्हाही चांगले असे त्यांनी सांगितले. फळे आणि लिंबू कायमच हितकारक असून रिकाम्यापोटी त्यांचे सेवन करू नये. तसेच साखर विरहित उसाचा रस अतिशय उत्तम असल्याचेही त्यांनी सांगितले.
 डॉ. वैभवी वाकचवरे यांनी ‘योग एक उपचारपद्धती’ याविषयी महत्त्वाची माहिती दिली. शरीर आणि मन यांना जोडण्याचे काम योगासने करतात. यामुळे योगासने करताना ती मनापासून करावीत, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला. मन:शांती असेल तर सर्व गोष्टी आत्मसात करता येतात, असे अण्णा व्यवहारे यांनी सांगितले.
चांगल्या आहाराने मन:शांती आत्मसात करावी आणि योगसाधनेने स्वत:ला घडवावे, असा महत्त्वपूर्ण सल्ला त्यांनी या वेळी दिला. या वेळी मोठय़ा प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी गोरे यांनी       केले.