काटई टोल नाक्यावरील गर्दीने नोकरदार हैराण Print
ठाणे वृत्तान्त

डोंबिवली / प्रतिनिधी
डोंबिवलीजवळील काटई नाका येथील टोल नाक्यावर टोल घेण्यावरून सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत वाहन चालक आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये नेहमी वाद होत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून दररोज बस, खासगी वाहने, कंपनी बसने प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला या टोल नाक्यावर २० ते २५ मिनिटे अडकून पडावे लागते.
गेल्या काही महिन्यांपासून काटई टोल नाक्यावर सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेतील गर्दीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत कल्याण-डोंबिवली परिसरातील नोकरदार वर्ग मोठय़ा संख्येने पनवेल, नवी मुंबई, तळोजा, अलिबाग परिसरात नोकरी-व्यवसायासाठी जातात. यावेळी टोल नाक्यावर अनेक मालक, चालक टोल देण्यावरून कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात. संध्याकाळच्या वेळेत परत येताना पुन्हा वाद होतात. या ठिकाणी पोलीस नसल्याने नेहमीच वाद होतात, असे अनेक नोकरदार मंडळींनी सांगितले. त्यामुळे कार्यालयात, कंपनीमध्ये जाण्यास नेहमीच उशीर होतो. दररोजचे उशिरा जाणे अनेक कार्यालयांमध्ये मान्य केले जात नाही.