दरवर्षी ६२ हजार नागरिकांचे मुंबईतून शहापूर-मुरबाडकडे स्थलांतर Print
ठाणे वृत्तान्त

भगवान मंडलिक
रोजगाराच्या शोधात देशाच्या कानाकोपऱ्यातून जसे मुंबईत लोक येतात, तसेच येथील धावपळीच्या जीवनशैलीला कंटाळून पूर्णवेळ अथवा अर्धवेळ स्थायिक होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.    शहापूर येथील उप निबंधक कार्यालयात सध्या दररोज ५० ते ६० जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होत  आहेत. त्यामुळे एका वर्षांत सुमारे १२ हजार ५०० व्यवहार होतात. त्यातून मुंबई परिसरातून  शहापूर, मुरबाड तालुक्यांच्या खेडे गावात जमीनजुमला घेऊन दरवर्षी साधारण ६३ हजार नागरिक स्थलांतरीत होत असल्याचे दिसून येत आहे.
अशाच प्रकारचे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार कल्याण, मुरबाड, भिवंडी परिसरात होत आहेत. त्यामुळे शहरी भागाला कंटाळलेला सामान्य, मध्यमवर्गीय माणूस हळुहळु खेडय़ांच्या दिशेने निघाला आहे. त्यात  काळा पैसा पांढरा करण्याच्या विवंचनेत असणाऱ्या उल्हासनगर तसेच मुंबई परिसरातील धनिकांचाही समावेश आहे. काहीजण विकासकाच्या प्रकल्पातील सदनिका खरेदी करतात किंवा स्वत: दलालाकरवी दोन ते तीन गुंठे जमीन खरेदी करून फार्म हाऊस, बंगला बांधतात.
एका वर्षांच्या ३६५ दिवसांपैकी १०० दिवस रविवार, शासकीय सुट्टय़ा असतात. त्यामुळे शिल्लक २६५ दिवसात नोंदणी कार्यालयात दररोज ५० जमीन नोंदणीकृत (खरेदी विक्री व्यवहार) करण्याचे व्यवहार होतात. वर्षभरात शहापूर, मुरबाड, कल्याणच्या ग्रामीण भागात साडेबारा हजार जमिनी खरेदीचे व्यवहार होतात. एका कुटुंबात अंदाजे पाच माणसे आहेत, असे गृहित धरले तरी एका वर्षांत ६२ हजार ५०० नागरिक ग्रामीण भागाकडे स्थलांतरित होत असल्याचे दिसून येत आहेत. अर्थात त्यातील काही नागरिक विकेन्ड होम्स म्हणून या दुसऱ्या घराचा वापर करतात आणि शनिवार-रविवारी ग्रामीण भागात राहणे पसंत करतात. गेल्या दोन वर्षांत साधारण सव्वा लाख शहरी नागरिकांनी अशाप्रकारे ग्रामीण भागात घर बांधल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. या जमीन आणि घर विक्री व्यवहारातून शासनाला दर वर्षांला सुमारे ६२ ते ६५ कोटीचा महसूल मिळत आहे.
 गेल्या दोन वर्षांपासून शहापूरमध्ये शहरी स्थलांतरीतांचे प्रमाण वाढले आहे. या भागात जमीन खरेदी करणारे बहुतेक मुंबई, ठाणे, नाशिक भागातील आहेत, अशी माहिती शहापूर येथील शासन मान्य मुद्रांक विक्रेते तुकाराम कशिवले यांनी           दिली.