अस्वस्थ सरनाईकांची आता राजीव हटाव मोहीम Print

प्रतिनिधी
घोडबंदर मार्गावरील ‘विहंग व्हॅली’ या गृहसंकुलातील पाणीचोरी प्रकरणी ठाणे महापालिकेचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी कारवाईचे हत्यार उगारल्याने संतापलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आता ‘राजीव हटाव’ मोहीम हाती घेतली असून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राजीव यांच्या नावाने शिमगा केल्यानंतर सरनाईक यांनी थेट राज्याचे मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल केल्याने सरनाईक आणि राजीव वाद भविष्यात आणखी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सरनाईक आणि राजीव यांचे संबंध यापूर्वीही ताणलेलेच राहिले आहेत. पाणीचोरी प्रकरणी राजीव आपल्या भूमिकेवर ठाम असून यामुळे शिवसेना नेते अस्वस्थ झाले आहेत.  
सोमवारी झालेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुंब्रा-कौसा भागातील गढूळ पाण्याच्या मुद्दय़ावरून शिवसेनेच्या आमदारांनी महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्या नावाने शिमगा करीत त्यांना राज्य शासनाकडे परत पाठविण्याची मागणी केली. ही मागणी करण्यात प्रताप सरनाईक आघाडीवर होते. राजीव हटाव यासाठी सरनाईक आक्रमक होत असताना राष्ट्रवादीचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी मात्र राजीव यांना समर्थन देत कारवाईची मागणी फेटाळून लावली. विहंग व्हॅली पाणीचोरी प्रकरणावरून सरनाईक आणि राजीव यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर नियोजन समितीची बैठक गाजली.
मुंब्रा-कौसा भागातील नगरसेवक आणि नागरिक गढूळ पाण्याने भरलेल्या बाटल्या घेऊन ही बैठक सुरू असताना सभागृहात शिरले. या बाटल्या दाखवित गेल्या तीन दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला उपस्थित असलेले महापालिकेचे उपायुक्त अशोक रणखांब हे महिनाभरापूर्वीच महापालिकेत रूजू झाले आहेत. त्यामुळे त्यांना याविषयी फारशी माहिती नाही, असा सूर शिवसेना आमदारांनी लावला. त्यावर महापालिका आयुक्तांना या संदर्भात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देतो, असे आश्वासन अध्यक्षस्थानी असलेले राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी दिले.
हे प्रकरण राजीव यांच्यावर शेकविण्याचा प्रयत्न करत आमदार सरनाईक अचानक आक्रमक झाले.नियोजन समितीच्या बैठक सुरू असताना अशा प्रकारे रहिवाशांनी सभागृहात शिरून निवेदन देणे हा प्रकार योग्य नसल्याचा मुद्दा उपस्थित करत  सरनाईकांनी सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले. नियोजन समितीच्या एकाही बैठकीला राजीव आतापर्यंत उपस्थित राहिलेले नसून त्यांनी सभागृहाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना राज्य शासनाकडे पाठविण्याचा ठराव करावा, अशी मागणी सरनाईकांनी केली. मात्र, अधिकाऱ्यांना अशाप्रकारे परत पाठविता येत नाही, असे सांगत नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या सर्वच महापालिका आयुक्तांना केवळ समज द्यावी, असे राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.