संक्षिप्त Print

‘वास्तुफोरम’ तर्फे चर्चासत्र
ठाणे:वास्तुफोरम तर्फे बुधवार ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ७.३० यावेळेत ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा येथे ‘गृहनिर्माण संस्था आणि त्यांच्या समस्या’ याविषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. ठाण्याचे खासदार संजीव नाईक, ठाणे डिस्ट्रिक्ट हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यावेळी उपस्थित राहणार आहेत. ‘महाराष्ट्र गृहनिर्माण अधिनियम २०१२’, ‘डीम कन्हेन्स’, ‘मतदान प्रक्रियेत गृहनिर्माण संस्थांचा सहभाग’, ‘भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली यांसारख्या विविध विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
‘सावरकर गीते’
ठाणे:जय भवानी शक्ती मित्र मंडळ, बी केबीन, ठाणे येथे गुरुवार १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘सावरकर गीते’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सावरकर चरित्र गायक सतीश भिडे हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यावेळी तबल्यावर आप्पा आंबेकर साथ करणार आहेत.
जपानी भाषा वर्ग
डोंबिवली: संवादिनी परकीय भाषा शिक्षण संस्थेतर्फे शनिवार १० नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता डोंबिवली जिमखान्याच्या सभागृहात जपानी भाषा वर्ग आयोजित करण्यात आला आहे. हा वर्ग सर्वांसाठी खुला आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - ७५८८७२५०५५
खरेदी उत्सव
बदलापूर:महिला आणि लघु उद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते ८ यावेळेत काटदरे हॉल, गांधी चौक, बदलापूर येथे खरेदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध गृहपयोग वस्तूंचे स्टॉल प्रदर्शनात उभारण्यात येणार आहेत.
आयुर्विमा अधिकाऱ्यांचे स्नेहसंमेलन
ठाणे:भारतीय अयुर्विमा महामंडळातील विकास अधिकारी संघटनेच्या रौप्य महोत्सवीवर्षांनिमित्त रविवार ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता गडकरी रंगायतन येथे विकास अधिकाऱ्यांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन आयोजिले आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक सिंग, क्षेत्रीय अध्यक्ष थरथरे, सचिव मिहीर लोखंडवाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार अशी माहिती गणेश चिपळूणकर यांनी दिली.संपर्क - सर्जेराव सावंत - ९९८७०२८२५६
मधुमेहाविषयी शिबीर
डोंबिवली: ‘वैद्यकीय मदत निधी ट्रस्ट’ व ‘ए.डी.सी.पी.’ यांच्या संयुक्त विद्यमाने ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ४ यावेळेत ठाकूर हॉल, टंडन रोड, डोंबिवली येथे जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित शिबिरात विविध चाचण्या व व्याख्यानांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. नावनोंदणी संपर्क - डॉ. विश्वास पुराणिक ९८२१०६१८८३, डॉ. विजय नेगलूर ९८२१३२१७७२.
काव्य लेखन स्पर्धा
कल्याण: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ५ नोव्हेंबर काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांना स्वरचित कविता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, मिश्रा कंपाऊंड, सहजानंद चौक, कल्याण पश्चिम येथे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - (०२५१) - २२०१४०८