कळवा-मुंब्रावासीयांना दिवाळीपासून पाइपलाइनद्वारे गॅस Print

ठाणे / प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे सिलिंडर टंचाई सहन करणाऱ्या कळवा-मुंब्रावासीयांना अखेर येत्या दिवाळीपासून पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅस मिळणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून येथील रहिवासी पाइपलाइनद्वारे गॅस मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांनी आवश्यक ती अनामत रक्कमही महानगर गॅसकडे भरली आहे,. मात्र तरीही पाइपलाइन प्रकल्प मार्गी लागला नव्हता. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने या प्रश्नाचा पाठपुरावा केला. संबंधित अधिकाऱ्यांची वारंवार भेट घेतली. त्याचे फलित म्हणून अखेर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात कळव्यातील मनीषानगरमधील काही सोसायटय़ांमध्ये पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा केला जाईल, असे आश्वासन महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर टप्पाटप्प्याने खारीगाव, पारसिकनगर, विटावा आदी परिसरांत पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरविला जाणार आहे.