ताम्रपटातून कोकणच्या इतिहासावर प्रकाश. Print

ठाणे/प्रतिनिधी
कल्याण येथील बाजारपेठेत चोरीचा ऐवज शोधणाऱ्या पोलिसांना भंगाराच्या दुकानात एक ताम्रपट सापडला होता. हा ताम्रपट शिलाहारांचा तेरावा राजा छितराजा यांच्या काळातील असल्याची माहिती कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी यांनी दिली. तसेच ताम्रपटावरील मजूकरावरून कोकणातील इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या महत्वाच्या बाबी समोर आल्याचेही त्यांनी सांगितले.
एप्रिल महिन्यात कल्याण पोलीस बाजारपेठेत चोरीचा ऐवज शोधत असताना एका भंगाराच्या दुकानात त्यांना नवा तीन पत्र्यांचा ताम्रपट सापडला होता. हा ताम्रपट पोलिसांनी पुरातत्व विभागाकडे सुपूर्द केल्यानंतर कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी, उपाध्यक्ष रवींद्र लाड, सचिव सदाशिव टेटविलकर तसेच कल्याण शाखेचे काका हरदास आणि प्रा. जितेंद्र भामरे यांनी त्याची पाहणी केली होती. या ताम्रपटाची निमिर्ती सवंत ९४१ म्हणजे इ.स.१०१९ मध्ये करण्यात आली असून हा ताम्रपट शिलाहारांचा तेरावा राजा छितराजाच्या काळातील आहे. तसेच छितराजाच्या काळामधील सापडलेल्या पाच ताम्रपटांपैकी हा पहिला ताम्रपट आहे, अशी माहिती दळवी यांनी दिली. या ताम्रपटावर त्यावेळेपर्यंतच्या सर्व राजांची नावे, त्यांची कार्य आणि त्यांची बिरुदे यांचे उल्लेख आहेत.
शिलाहारांचे ‘गरूड’ हे राजचिन्ह असलेल्या एका संयुक्तीमध्ये अडकवलेल्या तीन पत्र्यांवर यातील मजकूर कोरलेला आहे. संस्कृत भाषेमधील हा मजकूर देवनागरी लिपीमध्ये लिहिला असून यातील भाषा अलंकारिक असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीच्या पानावर गणपती आणि शंकर यांची स्तुती करणारा संदेश कोरण्यात आला आहे. तसेच यामध्ये शिलाहारांच्या त्या काळातील राज्याचा विस्तारही देण्यात आला आहे. यात उत्तरेकडील चिंचणी, तारापूरपासून दक्षिणेकडील चिपळूणपर्यंत शिलाहारांचे राज्य होते, असे कोरण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. तिसऱ्या पानावर राजाने केलेल्या दानपत्राचा उल्लेख कोरण्यात आला आहे. मूळचे कऱ्हाडचे असलेल्या पण ठाण्यात स्थायिक झालेल्या दोन विद्वान ब्राह्मणांना रायगड येथील गावे दान देण्यात आली होती. गावाच्या उत्पन्नातून त्यांनी देवळाची देखभाल आणि स्वत:चा खर्च करावा असे आदेश तसेच राजाची आज्ञा न मानणाऱ्यासाठी शापवाणीही कोरण्यात आली आहे. तसेच त्यावेळेच्या राजांसाठी छितराजाने दिलेला ‘ऐशो आराम करू नका’ असा संदेशही कोरण्यात आल्याचे दळवी यांनी सांगितले.