घरगुती डबे गॅसवर Print

चैतन्य पिंपळखरे ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
alt

अनुदानित दराने मिळणाऱ्या सिलेंडरवर केंद्र सरकारने र्निबध लादल्याने कामानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या व्यक्तींसाठी घरगुती जेवणाचा डबा उपलब्ध करुन देणाऱ्या महिला व्यवसायिक अडचणीत आल्या आहेत. सध्या अशाप्रकारे स्वयंपाक करणाऱ्या महिलांना अंदाजे दर दोन महिन्यांना तीन सिलेंडर लागतात. यामुळे अनुदानित दराने मिळणारे सहा सिलेंडर त्यांना फक्त चार महिने पुरणार असून उर्वरित वर्षभरात महागडय़ा दराने गॅस खरेदी करावी लागणार आहे. यामुळे त्यांच्या व्यवसायाचे गणित बिघडले असून जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी डब्याच्या दरात २५ ते ३० टक्क्य़ांनी वाढ करावी लागणार आहे.    सध्या शाकाहारी जेवणाचा डबा ५५ ते ६५ तर मांसाहारी जेवणाचा डबा ८० ते ९० रुपयांना मिळतो. दरवाढीमुळे शाकाहारी डब्यासाठी ८० ते ९० तर मांसाहारी डब्यासाठी १२० ते १३० रुपये मोजावे लागणार आहेत. यामुळे घरगुती डब्यांच्या सेवेचा लाभ घेणाऱ्या अनेक व्यक्तींचा खिसा चांगलाच कापला जाणार आहे. यामध्ये नोकरी, शिक्षणानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या व्यक्ती आणि विद्यार्थ्यांचा मोठय़ाप्रमाणावर समावेश आहे. असे असले तरी हा व्यवसाय करणाऱ्या महिलाही कोंडीत सापडल्या असून दर वाढल्याने अनेक व्यक्तींनी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असून आता व्यवसाय करायचा तरी कसा अशी खंत लोकसत्ता शी बोलताना एका महिलेने व्यक्त केली. अनेक महिला घर चालवण्यसाठी हातभार म्हणून हा व्यवसाय करतात.     

चार महिन्यांसाठी सवलतीच्या दराप्रमाणे अंदाजे ३ ते ४ हजार रुपये मोजावे लागणार असून उर्वरित आठ महिन्यांसाठी आवश्यक बारा सिलेंडरसाठी अंदाजे १० ते ११ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. यामुळे वर्षांकाठी अंदाजे फक्त सिलेंडरसाठीच १३ ते १४ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच धान्य, तेल, मांसाहारी पदार्थ यांचे दरामध्येही मोठय़ाप्रमाणावर वाढ झाली असल्याने नफ्याचे गणित योग्य रितीने साधण्यासाठी महिलांना दरात वाढ करणे आवश्यक झाले आहे.