कचऱ्याच्या ढिगांमुळे कल्याण-डोंबिवलीकर हैराण Print

कल्याण/प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून कचरा वाहतुकीच्या नावाने सावळा गोंधळ असल्याने नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसर, बाजारपेठ विभाग, लाल चौकी परिसर, मुरबाड परिसर, डोंबिवलीत सम्राट हॉटेल चौक, देवीचा पाडा, महाराष्ट्रनगर, गरिबाचा पाडा, सुभाष रोड भागातील कचराकुंडय़ांमधील कचरा गेल्या आठवडाभरापासून उचलल्या गेल्या नाहीत, अशा तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या. कचरा साचलेल्या भागातील दुकानदार, पादचारी यांना दरुगधीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. पालिकेकडे कचरा गाडय़ा चालविण्यासाठी पुरेसे चालक नाहीत. सफाई कामगार व अन्य कामगार वीट भट्टय़ा, इमारतींमध्ये कचरा उचलण्याची खासगी कामे करीत आहेत. आरोग्य निरीक्षक, बीट निरीक्षक यांच्या संगनमताने हे व्यवहार सुरू असल्याने शहरातील कचऱ्याची समस्या अवघड होत चालली आहे.