कल्याणमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान केंद्र! Print

आयटी पार्कच्या प्रस्तावाला वेग
कल्याण/ प्रतिनिधी
मुंबई, नवी मुंबई शहरांचा झपाटय़ाने विकास होत असताना कल्याण-डोंबिवलतील माहिती तंत्रज्ञानाचे नवे केंद्र विकसित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून नव्याने उपलब्ध होत नसलेल्या आरक्षित जमिनींचा विचार करता कल्याणमध्ये उपलब्ध असलेल्या १२०० एकर हरित पट्टय़ातील जमिनीपैकी सुमारे १५० एकर जमिनीवर भव्य माहिती आणि तंत्रज्ञान केंद्र उभारण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव शासन दप्तरी वेगाने हालचाली करीत असल्याने कल्याणकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मनसेचे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भोईर यांनी दोन वर्षांपूर्वी कल्याणमध्ये आयटी पार्क उभारणीसाठी शासनाला निवेदन दिले होते. विधिमंडळात याविषयी प्रश्न उपस्थित करून शासनाला याप्रकरणी माहिती देण्याचे सूचित केले होते. मुख्यमंत्री, नगरविकास विभागाने कल्याण पश्चिमेत उपलब्ध असलेल्या सुमारे १२०० एकर हरित जमिनींपैकी सुमारे १०० ते १५० एकर जमीन या पार्कसाठी देता येऊ शकते असा निष्कर्ष काढल्याने कल्याणमधील ‘आयटी पार्क’ चा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे, असे आमदार भोईर यांनी सांगितले.
आयटी पार्कमुळे कल्याण परिसरात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जाळे विणले जाण्याची शक्यता आहे. पूरक व्यवसायावर सुमारे ५ ते १० हजारांना रोजगार उपलब्ध होईल. याशिवाय हॉटेल, वाहतूक, गृहनिर्माण या व्यवसायांना चालना मिळेल. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. स्थानिक शेतकऱ्यांना व्यापारी दराने जमिनीचा भाव व चार चटईक्षेत्र निर्देशांक मिळेल.
पालिकेला सुमारे ५० कोटींचा महसूल मिळेल, असा तज्ज्ञांनी तयार केलेला आराखडा आमदार भोईर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना सादर केला आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.